
मार्कचे तीन रूममेट्स मनमोकळे होते. त्याला आवाराआवरीचा जाम कंटाळा यायचा, त्यामुळं त्याच्या पलंगाच्या आजूबाजूला कायम पसारा असायचा. मार्कने हार्वर्डमध्ये येताच केवळ दोन वर्षात 'कोर्स मॅच' ही वेबसाईट केवळ गमतीखातर तयार केली होती. ही वेब साईट वापरणारा विध्यार्थी कोणत्याही विषयाच्या तासामध्ये इतर कोणते विद्यार्थी हजर असणार, हे पाहून त्या तासांना आपणसुद्धा हजेरी लावायची कि नाही हे ठरवू शकत असत. यातून कोणत्या सुंदर मुली कोणत्या तासांना बसणार आहेत, याचा अंदाज घेऊन मुलं त्या तासांना हजेरी लावत असत. यासाठी कोणत्या मुलीने कोणते विषय निवडले आणि ती कोणत्या तासांना हजर राहणार आहे, हे मुलं त्यातून तपासत असत. ही वेबसाईट हार्वर्ड विद्यापीठात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. 'कोर्स मॅच' या वेब साईटची कल्पना मार्कला आधीच्या 'बडी झू' या वेब साईटवरून सुचली होती. एडम डीएंजलो या मार्कच्या मित्रानेच 'बडी झू' ही वेब साईट बनवली होती. सुरवातीला तीही साईट बरेच विद्यार्थी वापरायचे. नंतर एडमला त्या वेबसाईटमध्ये जास्त दम वाटला नाही म्हणून त्याने ती बंद केली. पुढे फेसबूक मोठी झाल्यावर तिथं एडम डीएंजलोनं तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख म्हणून काम बघणं चालू केलं, तसेच इंजिनीरिंग विभागाचा प्रमुख म्हणूनही काम बघितलं. पुढे म्हणजेच काही दिवसापूर्वी (या सहा-सात वर्षात) फेसबूकमधून बाहेर पडून एडम डीएंजलोनं स्वतःची 'क्वोरा' नावाची सोशल नेटवर्किंग साईट असलेली कंपनी चालू केली.
कोर्स मॅचच्या यशामुळे मार्कच्या डोक्यात नवनव्या कल्पनांचं वादळ उठलं. मार्कने कोर्स मॅचमध्ये 'हॉट ऑर नॉट' या नावाच्या कार्यक्षमतेची भर घातली, गेम बनवली होती. ज्यामध्ये मुलामुलींचे फोटो अपलोड करून, त्यामधे तुलना होत असत आणि युझर्सकडून मिळालेल्या रेटिंगमधून चांगला फोटो निवडला जात असत. या साईटला 'फेसमॅश' असे नाव होते. ही वेब साईट कशी वाटते? ती नीट चालते का? त्यात काय दुरुस्त्या हव्या आहेत का? हे जाणून घेण्यासाठी या वेब साईटची लिंक त्याने ई-मेलद्वारे मित्रांना पाठवली, परंतु या वेबसाईट मधल्या चुका काढायचयं सोडून ही वेब साईट मार्कचे मित्र एकामागून एक नुसते वापरातच सुटले. तसेच ती लिंक त्या मित्रांनी त्यांच्या इतर मित्रांनाही पाठवली. असं करत 'फेसमॅश' ही वेबसाईट आख्या हार्वर्ड विद्यापीठात अगदी झपाट्याने लोकप्रिय झाली. बऱ्यापैकी सगळे विद्यार्थी ही वेबसाईट अगदी मनसोक्त वापरत होते, परंतु मार्कला मात्र याची कल्पना नव्हती. ही साईट कॉलेज कॅम्पसच्या इंट्रानेटमधे जोरात पसरली, परंतु काही कारणास्तव हार्वर्ड विद्यापीठाने ती बंद केली. नंतर राहुल जैन या उद्योगपतीकडून फेसमॅश.कॉम ही साईट ३०२०१ अमेरिकन डॉलर्सला विकली गेली. पुढे हार्वर्ड विद्यापीठाचे मार्क झुकरबर्गने फोटो अपलोड करून शेअर करण्यासाठी नवीन साईट बनवण्याचे एक प्रकारचे आव्हानच स्वीकारले. तो 'दी फेसबूक डॉट कॉम' (TheFacebook.com) या वेब साईटसाठी कोड लिहू लागला.

त्यावेळी हार्वर्डच इंटरनेट खूप हळू चालायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याबद्दल तक्रारही केली होती. त्यामुळे मार्कने ही वेबसाईट एका कंपनीला भाड्याने चालवायला दिली. ८५ अमेरिकन डॉलर्स इतकं भाडं देऊन त्या कंपनीच्या सर्वरवरून ही वेबसाईट चालवली जात होती. काही कालांतराने 'दि फेसबुक' वेबसाईट यशस्वी होईल असं मार्कला वाटायला लागलं. यातून पैसे कसे कमवायचे याकडे त्याच लक्ष वळलं आणि या विचाराने त्याला भेडसावून सोडलं. यासाठी त्यानं एदुआर्दो सव्हेरीन नावाच्या एका वर्गमित्राला सहभागी होण्याविषयी विचारलं. त्याला उद्योगधंद्यातील चांगली जाण होती. या दोंघांनी १००० अमेरिकन डॉलर्स ओतून 'दि फेसबुक डॉट कॉम' सर्वांसाठी खुली करण्यात आली. मार्कने ४ फेब्रुवारी २००४ या दिवशी 'दी फेसबूक' साईट लाँच केली. या साईटमध्ये सहभाग घेताना हार्वर्डचा ई-मेल आय-डी असणं गरजेचं होतं. फेसमॅशपेक्षा ही साईट विध्यार्थ्यांना जास्त सुरक्षित वाटत होती. कारण यात मार्कने मागच्या त्रुटी दुरुस्त केल्या होत्या आणि माहितीसाठी हार्वर्डनेही काही बंधनं घातली होती. आपली माहिती कुणाला दिसावी किंवा दिसू नये अशा बऱ्याच सोयी मार्कने यात वाढवल्या होत्या.
ही वेबसाईट डेटिंगसाठी बनवलेली नसली तरी विद्यार्थी एकमेकांना भेटीसाठी साईटचा वापर होत गेला. नवीन विद्यार्थी तर याचा वापर जोरात करू लागले. याबरोबरच 'दि फेसबुक डॉट कॉम'चा वापर विधायक कामासाठीही करायचयं ठरलं. उदाहरणार्थ, आभ्यासामधल्या शंका सोडवणं, एकत्र जमून एकाद्या विषयावर चर्चा करणं. याबरोबर क्लब्ज, पार्ट्या यासाठीही साईट वापरली जाऊ लागली. बरेचजण मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी याचा वापर करत असत. वेबसाईटवर नाव नोंदवण्याचे प्रमाण विलक्षण वाढले. दी फेसबुकची अशी प्रचंड वेगानं वाढ होत असल्यामुळं आपल्या एकट्याला याचा डोलारा सांभाळता येणार नाही असं मार्कच्या लक्ष्यात आलं. त्यामुळे मार्कने हार्वर्डमध्ये आपला रूममेट असलेल्या डस्टीन मॉस्कोविजला एकूण भांडवलापैकी ५ टक्के वाटा देवू केला. पुढे मार्कने अशीच विभागणी करत ६५ टक्के वाटा स्वतः कडे ठेवत ३० टक्के सॅव्हेरिनकडे ठेवला आणि मॉस्कोविजला ५ टक्के दिला. सुरुवातीलाच ही वेबसाईट हार्वर्डपुरती मर्यादित न ठेवण्याचं मार्कने ठरवलं होतं. विद्यार्थ्यांना आता इंटरनेटवरूनच प्रवेश मिळावा अशा हार्वर्डला ई-मेल्स येत असत आणि मार्कलाही हेच हवे होते. पुढे ही वेबसाईट इंटरनेटवर लाँच करण्यात आली. या कामात मॉस्कोविजने बरीच मदत केली. पुढे बाकीच्या विद्यापीठाचे, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थीही 'दी फेसबुक डॉट कॉम'चा वापर करू लागले. इतर विद्यापीठामध्ये या साईटचा प्रचार करत असताना दिसून आलेली मार्कची हुशारी आणि त्याला असलेली व्यवसायाची जाण या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.
मार्कने विद्यापीठाचीही वेबसाईट बनवली ज्यामध्ये विद्यापीठातील सर्व लोक एकमेकांशी जोडले जाऊ शकत असताना याबरोबरच दुसऱ्या बाजूला स्टानफोर्ड, डार्टमाउथ कोलम्बिया, कोर्नेल आणि येल या विद्यापीठांमध्ये त्यांच्या स्वतंत्र साईटचा प्रचार चालू केला होता. या सोशल नेटवर्किंग साईट येवढ्या खास नव्हत्या, त्यात फेसबूकसारख्या सोयी-सुविधा नव्हत्या, तेव्हा तिथेपण फेसबूकने वेगाने भरारी घेतली. हार्वर्डच्या सामाजिक संपर्कांमधून इतर शाळा, कॉलेजमध्येही याचा प्रसार तर होतच होता. या साईट्सच्या पूर्णतेनंतर केवळ सहा महिन्यातच कॉलेजचे तीन सिनिअर विद्यार्थी दिव्य नरेंद्र, कॅमेरॉन विंकलवॉस, टेलर विंकलवॉस त्यांच्या 'हार्वर्डकनेक्शन डॉट कॉम' (HarvardConnection.com) या वेबसाईटसाठी मदतीसाठी मार्कला यांच्या टीममध्ये आमंत्रित करत होते.

मार्क झुकरबर्गबरोबर मॉस्कोविज, पालो आल्टो आणि अन्य सहकारी कॅलिफोर्नियाला गेले. तिथं त्यांनी भाड्यानं छोटं घर घेतलं जे त्यांचं पहिलं ऑफिस ठरलं. सुरुवातीला काही महिने 'दी फेसबूक' फ्लोरिडा नावाने चालू राहिली. पीटर थिएल या मार्कच्या मित्राने फेसबुकसाठी बराच पैसा लावला. पुढे एडुआर्डो सेव्हरिन याही मित्राने बराच पैसा लावला आणि दिवसेंदिवस फेसबुक वाढत चालली. पीटर थिएल यांनी ५००००० अमेरिकन डॉलर्स इतका पैसा एंजल इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या माध्यमातून जोडला गेला. हा पैसा फेसबूकच्या १०.२ % इतका होता. पुढे पेपल, नॅपस्टर याही कंपन्यानी काही पैसा गुंतवला. करारामध्ये काही कंपन्यानी अशा काही अटी घातल्या की जर फेसबूकचे युझर्स वाढले नाहीत तर ते पैसा काढून घेतील. परंतु तसे काही घडले नाही. फेसबुकचे युझर्स वाढतच गेले किंबहुना आजही वाढत आहेत.
२४ ऑक्टोबर २००७ ला फेसबुकचा मायक्रोसॉफ्टशी करार झाला, फेसबुकच्या २४० दसलक्ष डॉलर्समधील १.६ % शेअर्स मायक्रोसॉफ्टने घेतले. म्हणजेच १५ अब्ज डॉलर्सचे शेअर्स मायक्रोसॉफ्टकडे आहेत. फेसबूकने पुढे 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणून योजना चालू केली, ज्यामध्ये अनेक कंपन्या फेसबूकमध्ये पैसा गुंतवू लागल्या. त्याचा अनेक कंपन्यांना फायदा होत गेला. अनेक कंपन्यांचे शेअर्स वाढले. यामध्ये याहू, गुगल, ऍपल, ऍमेझॉन अशा अनेक मोठ्या कंपन्यांचा सहभाग आहे. २००९ मध्ये फेसबुकने सर्व सोशल मिडिया साईट्सचे रेकॉर्ड तोडले. फेसबुक जगातील सर्वाधिक वापरली जाणारी सोशल मिडिया साईट बनली. सध्याच्या घडीला फेसबूकमध्ये केवळ २०६५८ कर्मचारी काम करतात. जो आकडा मोठ्या कंपन्यांच्या तुलनेने खूप कमी आहे. २०११ साली फेसबूकचे मुख्य कार्यालय मेनलो पार्क, कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाले.
आजतागायत फेसबूकचे अर्थकारण खूप मोठे आहे. ८४.५२४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतिकी ही मोठी कंपनी आहे. फ्रेंडफीड, कनेक्टयू , फ्रेंडस्टार पेटंट, नेक्सटॉप, चाय लॅब्स, शेअर ग्रूअ अशा अनेक कंपन्या फेसबुकने विकत घेतल्या. २०१२ साली शर्लिन सँडबर्ग यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सध्याचे फेसबूकचे मुख्य कार्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे. दिवसेंदिवस फेसबूक आपल्या साईटमध्ये आणि ऍपमध्येही चालणाऱ्या कार्यक्षमतांमध्ये वैशिष्ठपूर्ण बदल करतच राहते. जे युझर्सच्या दृष्टीने महत्वपूर्ण बदल असतात. २०१४ मध्ये फेसबूकने वॉट्सअप मेसेंजर ही कंपनी १९ अब्ज अमेरिकन डॉलर्सला विकत घेतली त्यामुळेच फेसबूक आणि वॉट्सअपमध्ये अनेक नाविन्यपूर्ण बदल होत गेले. असाच करार फेसबूक आणि इंस्टाग्राममध्येही झालेला आहे, इंस्टाग्राम १ अब्ज डॉलर्सला विकत घेतली गेली. कनेक्टयु ३१ दसलक्ष डॉलर्सला, फ्रेंडफीड ४७.५ दसलक्ष डॉलर्सला, फ्रेंडस्टार ४० दसलक्ष डॉलर्सला, फेस डॉट कॉम १ अब्ज डॉलर्सला अशा अनेक कंपन्या फेसबूकने विकत घेतल्या आणि काही कंपन्या विकत घेतल्याच्या किमती फेसबूककडून गोपनीय ठेवल्या गेल्या आहेत. आज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या फेसबूकबरोबर अनेक लहानमोठ्या कंपन्या पैसा गुंतवतच असतात. अनेक लघुउद्योगांना फेसबूकवरून स्वतःच्याही बिझनेसचा प्रसार करता येतो. राजकारणातील प्रचारासाठीही फेसबूकसारख्या सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. आजही अनेक कंपन्या जाहिरातीसाठी पैसा गुंतवत आहेत. फेसबूक एक सोशल मिडिया साईट तर आहेच, परंतु छोट्या कंपन्यांची वाढ होण्यासाठी एक व्यासपीठसुद्धा आहे. मागच्या चार-पाच वर्षात फेसबूकने आर्टिफिशिअल इंटीलिजन्सच्या बऱ्याच कार्यक्षमतांची भर घातली आहे. युजर्ससाठी चॅटिंग, फोन कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग असे अनेक बदल घडवून आणले आहेत.
फेसबुकने चॅटिंगसाठी स्वतंत्र मोबाईल ऍप बनवले आहे. त्यास फेसबूक मॅसेंजर म्हणून ओळखले जाते. या ऍपनेही कमी वेळात जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. सध्याच्या स्मार्टफोन मोबाईलच्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे फेसबूक ऍपचा, फेसबूक मेसेंजरचा वापर वाढत आहे. मेसेंजरबरोबरच फेसबुक वॉच हेही फेकबुकचे व्हिडिओ पाहण्यासाठीचे एक उत्पादन आहे. हे ९ ऑगस्ट २०१७ या दिवसापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. व्हिडिओ पाहताना युवजर्सला जाहिरात दाखवून फेसबुक पैसा कमवू लागली. टाईमलाईन इव्हेंट्स, फोटो, व्हिडीओ असे बरेच काही फेसबूकच्या माध्यमातून शेअर करता येते. ऑर्कुट, फ्रॉपर, मायस्पेस, सिक्सडीग्रीज, हायफाय अशा अनेक सोशल नेट्वर्किंग साईट्सनी फेसबूकपुढे अक्षरशः मान टाकली. फेसबूकसारख्या साईट्समुळे सामान्य नागरिकही पत्रकार बनला, असे म्हणायला हरकत नाही. तो आपल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा वापर करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतो. अर्थात फेसबूकमुळे सामाजिक जागरूकता वाढत आहे, दुसऱ्या बाजूला त्याचे काही प्रमाणात तोटे असतानादेखील फेसबूकने सकारात्मक दृष्टीने जग बदललं म्हणायला हरकत नाही. २६ वर्षीय मार्क झुकरबर्गला २०१० ला अमेरिका टाईम्सकडून 'पर्सन ऑफ दी ईअर'चा पुरस्कार देण्यात आला. जग बदलून टाकण्यासारखं काही करायची संधी असताना शिकत बसण्यात काय अर्थ आहे? स्वतःला असा प्रश्न वयाच्या १९-२० वर्षी विचारणाऱ्या मार्क झुकरबर्ग नावाच्या विलक्षण बुद्धीच्या, प्रचंड इच्छाशक्ती असणाऱ्या अमेरिकन युवकानं फेसबूक नावाची वेबसाईट सुरु केली आणि बघता बघता ती जगव्याप्ती झाली. जवळजवळ दोन अब्ज लोक फेसबूकचे युजर्स आहेत म्हणजेच काही देशाच्या लोकसंखेपेक्षा फेसबूकचे जास्त नागरिक आहेत असं आपण म्हणू शकतो. भविष्यातही फेसबूक अनेक नाविन्यपूर्ण बदल आणतच राहील यात शंका नाही.
Published in Masik Sahitya Chaprak, Pune. December 2019.