Search in Google

Monday, January 27, 2020

2020 आणि महासत्तेच भंगलेलं स्वप्न...

'इंडिया व्हिजन 2020 -अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' डॉ. अब्दुल कलामांनी हे पुस्तक लिहिले होते. आपण 2020 मध्ये महासत्ता होऊ, जेव्हा भारतरत्न अब्दुल कलाम असं म्हणाले होते त्याच्यापेक्षाही आज देशाची खूप बिकट परिस्थीती आहे. जीडीपी 4.5 वर घसरला आहे, शेतकरी आजही आत्महत्या करतोय, देशासमोर आर्थिक मंदीच संकट उभं ठाकलं आहे. कलामांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आपण सपशेल अयशस्वी ठरलोय, हे आपल्याला मान्य करावे लागेल. आजही विचार केला तर भविष्यातही भारत कधी महासत्ता होईल की नाही याची हमी आपण देऊ शकत नाही. 2020मध्ये भारत महासत्ता का झाला नाही, यावर आज विचारमंथन आणि प्रयत्न होणं गरजेच आहे. 1947 रोजी भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारत देश म्हणून टिकेल की नाही? असा प्रश्न तोंड वर काढत होता.

बीबीसीच्या मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, भारतात लोकशाही टिकेल की नाही, याबाबत शंका आहे. परंतू आज भारताच्या दृष्टीने या दोन्ही प्रश्नांचे उत्तर सकारात्मक आहे.  मग महासत्तेच्या बाबतीत आपण कुठं कमी पडलो ? स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतरही अनेक जातीसमुहाला आरक्षण, कर्जमाफी मागण्याची वेळ येते. शेतकऱ्यांना पिकाच्या हमीभावासाठी भांडावं लागतं, या सगळ्या कारणासाठी वेळोवेळी मूक किंवा हिंसक आंदोलनेही होतात. खरचं आपण महासत्त्ता होण्याच्या वाटेवर चालत होतो का ? आपण महासत्ता म्हणून जगासमोर येवू शकलो नाही याचे विनोदात्मक मिम्स कारण याला ट्रोल करण्यापेक्षा आजच्या तरुणांना  चिंतन करायला लावणारा हाविषय आहे .

अर्थ, क्रीडा , शिक्षण, नविन रोजगारनिर्मिती, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात आपण पिछाडीवर आहोत. आम्ही क्रिकेट नेहमीच जिंकत असतो खरे, परंतु ओलम्पिकमध्ये भारताचे स्थान काय? सैनिक शहीद होण्याचे कधी थांबणार ?शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबणार? आपल्या देशाला विज्ञानवादी लोकांनी ग्रासायला हवे होते, तिथे आज धर्मवादी लोकांनी ग्रासले आहे. आज अनेक सरकारी संस्था विकायची का आली ?

या सर्व प्रश्नांच्या मुळाशी आणखी एक प्रमुख  कारण दडलेलं आहे, भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेची मूळं आहेत इथल्या शिक्षणपद्धतीमध्ये आणि शेतीविषयक धोरणांमध्ये! कलाम म्हणाले होते आजचा तरुण वर्ग भारतला महासत्ता घडविण्याचा पाया आहे. तरुण वर्ग अर्थताच शिक्षित असलेला आणि शिक्षण घेत असणारा. म्हणजेच शिक्षण देण्याच्याबाबतीत आपण अपयशी ठरतोय. बिजे रोवून त्याला योग्य खतपाणी नाही घातले, तर मधूर फळे चाखायला मिळणार नाहीत, हे साधे समीकरण आहे.

शिक्षणपद्धती आणि योग्य शिक्षण हाच नवा समाज घडवण्याचा ताबा असतो. येत्या काही  वर्षांत इंग्लंडमधील अनेक विद्यापीठे ज्ञानाची प्रमुख उर्जाकेंद्रे बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरु झालेले आहेत. जर्मनी ,कोरिया, रशिया यासारखे बलाढ्य देश अमेरिकेचे महासत्तापद काबीज करण्यासाठी नेमके काय करावे लागेल याचा विचार करत शिक्षणात त्या दृष्टिकोनातून बदल घडवत आहेत. चीनही स्वतःची शिक्षणपद्धती जागतिक दर्जाची बनवण्यासाठी चीकाटीने प्रयत्न करत आहे. शिक्षणात चीनी भाषेचा वापर वाढवत आता काही संगणकीय भाषाही चीनी केल्या आहेत. आणि याची फळे चीनला मिळतही आहेत. आपण असा विचार करणे तर सोडा, आजच्या समस्या कशा सोडवायच्या या प्रश्नाच्या गर्दीत अडकलो आहोत. सध्याचा तरुणांमधील बेरोजगारी , त्याबद्द्ल त्यांचा संताप आणि नैराश्य ही त्याचीच अटळ फलश्रुती आहे. याला इथले राजकीय वातावरण ही तितकेच कारणीभूत आहे. असे होण्यामुळे तरुणांची शिक्षणाबद्दलची अवस्था निर्जीव झाली आहे. ज्या पद्धतीने ते शिकले आहेत त्यात स्वत:च आळशी राहिल्याने, जिज्ञासेची साथ सोडल्याने त्यांना जगण्याचे कोणतेही कौशल्य कमावता आलेले नाही. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाचे उद्धिष्ठ काय हेच नेमके माहीत नाही. आपण देशाच्या हितासाठी नव्हे, तर स्वतःला रोजगार मिळवण्यासाठी नोकरी करणार आहोत असा अनेकांचा भ्रम असतो. अर्थात पोट भरण्यासाठी किंवा कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सक्षम बनवणे, स्वावलंबी बनवणे हे जेवढे आवश्यक आहे तेवढेच, किंबहुना त्याबरोबरच जास्त आवश्यक असते ते हे कि भावी पिढ्यांना एक प्रगल्भ विकासशील नागरीक बनवणे. आणि हेच आपली शिक्षणपद्धती विसरली आहे आणि आजही असे आम्ही करत नाही आहोत. आजचा अमेरिका हा नोकऱ्या निर्माण करणारा देश आहे, तर भारत नोकरदार तयार करणारा.

आज  केवळ उदारनीरवाह या अज्ञानाच्या व्यामोहात सापडलेलो आहोत...जसे मध्ययुगात होतो त्याच मानसिकतेत आहोत. त्यामुळेच कि काय आम्ही अपवादात्मक एखादं-दुसरं उदाहरणं वगळता जागतीक ज्ञानात भर घालु शकलेलो नाही. आणि आमची शिक्षणपद्धती मुळात तशी इच्छाही निर्माण होवू देत नाही. जगभरात जितके संशोधन झाले त्यात भारतीय संशोधक बोटावर मोजण्याइतकेच आहेत.

स्वत:चे व्यक्तिगत भविष्य हे जर केवळ रोजगारासाठी भूकेलेल्या स्पर्धकाचे असेल तर आम्ही अनेक वर्षापासून कोणत्या जोरावर महासत्ता बनण्याच्या वल्गना करत होतो? हे खरे आहे की महासत्ता ही ज्ञानसत्तेच्याच जोरावर बनू शकते. ज्ञानसत्ताच अर्थसत्ता निर्माण करू शकते

- गणेश आटकळे