Search in Google

Thursday, March 21, 2019

जेफ बेझॉस आणि अ‍ॅमेझॉन... भाग - २

१९९४ मध्ये जेफने डी. ई. शॉ. कंपनीच्या उपाध्यक्ष पदाची नोकरी सोडली. त्याने वॉशिंग्टनला जाऊन पुढील व्यवसायाचा प्लॅन आखला. ५ जुलै १९९४ रोजी जेफने सुरुवातीला वॉशिंग्टनमध्ये कॅडबरा या कंपनीची स्थापना केली. इंटरनेट आणि कॅडबराच्या माध्यमातून केवळ पुस्तके विकण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. सुरुवातीच्या काही दिवसांत, कंपनी बेल्वे, वॉशिंग्टन मधील जेफच्या घराच्या गॅरेजमधून चालविण्यात आली.  सप्टेंबर १९९४ मध्ये बेझोसने 'रिलेन्टलेस डॉट कॉम' डोमेन नाव विकत घेतले आणि थोडक्यात त्याच्या ऑनलाइन स्टोअरला उपयुक्त असे नाव देण्याचे विचार झाले. अंतिम नाव ठरवण्यासाठी त्याने अनेक मित्रांना विचारपूस केली. जेफने शब्दकोश शोधून 'अ‍ॅमेझॉन' हे नाव निवडले. जगातील सर्वात मोठी नदी असलेली अमेझॉन नदी त्या प्रमाणेच सर्वात मोठे पुस्तकांचे दालन म्हणजे अमेझॉन! अशी त्यामागची युक्ती होती. 

इंटरनेटच्या भविष्यातील अनेक प्रमाणात वार्षिक वेब कॉमर्स प्रोजेक्टचा अंदाज लावायचा अहवाल वाचल्यानंतर, बेझोसने २० उत्पादनांची एक यादी तयार केली, जी ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध  केली जाऊ शकते. सी. डी. कॉम्पुटर हार्डवेअर, कॉम्पुटर  सॉफ्टवेअर, व्हिडिओ आणि पुस्तके यासारख्या पाच सर्वात आश्वासक उत्पादनांची यादी त्यांनी संकलित केली. शेवटी पुस्तक विक्रीपासून सुरुवात करण्याचा निर्णय अंतिम झाला. जेफच्या पालकांनी स्टार्टअपमध्ये सुमारे २५०००० डॉलर्स गुंतविले. जुलै १९९५ मध्ये कंपनीने ऑनलाइन बुक स्टोअर म्हणून सेवा सुरू केली. 'अ‍ॅमेझॉन डॉट कॉम' वर विकली जाणारे  पहिले  पुस्तक 'डग्लस होफास्टास्टरज फ्लुइड कॉन्सेप्ट्स अँड क्रिएटिव्ह अपॉलॉजीज' होते. हे पुस्तक कॉम्पुटर थिअरीशी संबंधित होते. व्यवसायाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्येच अ‍ॅमेझॉनने आसपासच्या ५० राज्यात आणि ४५पेक्षा जास्त देशांत अनेक पुस्तके विकले.

दोन महिन्यांच्या आत अ‍ॅमेझॉनची विक्री २०००० अमेरिकन डॉलर्स प्रतिआठवडाप्रमाणे अशी कमाई केली. ऑक्टोबर १९९५मध्ये कंपनीने स्वतःला पब्लिक कंपनीच्या यादीत गेल्याचे जाहीर केले.  अ‍ॅमेझॉन आणि डेलवेअर कंपन्यात मिलनाचा करार झाला. यासाठी अ‍ॅमेझॉनने १५ मे १९९७ रोजी १८ डॉलर प्रतिशेअरवर त्याची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर जारी केली होती. १९९५ मध्ये अ‍ॅमेझॉनने प्रथम प्रकाशन क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. द न्यू यॉर्कर या वृत्तपत्राच्या मते, अ‍ॅमेझॉनकडून "सिलेक्टेड विथ नो अपिअरन्ट थॉट्स" पुस्तक प्रकाशित झाले. पुढे काही कारणास्तव अ‍ॅमेझॉनचा प्रकाशनाचा व्यवसाय बंद पडला. १९९९ मध्ये टाईम मॅगझिनने जेफ बेझॉसला 'द पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान केला जेव्हा ऑनलाइन शॉपिंग लोकप्रियतेत कंपनीच्या यशास मान्यता मिळाली होती.

१९ जून २००० मध्ये अ‍ॅमेझॉन कंपनीचे रीब्रॅण्डिंग झाले आणि नवीन लोगोमध्ये अमेझॉनच्या स्पेलिंगमध्ये A पासून Z पर्यंत एक बाण देण्यात आला. अ‍ॅमेझॉन या  A पासून Z पर्यंत उपयुक्त वस्तूची ऑनलाईन विक्री करू लागली होती असा त्याचा अर्थ होता. खरे तर या तुलनात्मकदृष्ट्या मंद वाढीमुळे शेअरधारकांनी तक्रार होत असते की कंपनी त्यांच्या गुंतवणूकीला न्याय देण्यासाठी किंवा दीर्घ काळापर्यंत जगण्यासाठी पुरेसे नफा मिळवत नाही. पण अ‍ॅमेझॉन वाढत होती आणि टेक क्रॅशच्या पलीकडे पुढे जाऊन ऑनलाइन विक्रीमध्ये एक मोठी कंपनी बनत होती. २००१च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने कमावलेला पहिला नफा ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका होता. २००१ ते २०१० अ‍ॅमेझॉन या कालावधीत जगभरात वाढत होती. नफ्यात भरभराटीच्या वाढ होत होती. या कालावधीत वाहतुकीच्या अनेक कंपन्यांशी करार झाले ज्यामुळे ग्राहकांपर्यंत वस्तू पोहचवणे सोपे झाले होते.

२०११ मध्ये अ‍ॅमेझॉनमध्ये अमेरिकेतील ३०००० पूर्ण-वेळ कर्मचारी होते आणि २०१६ च्या शेवटी १८०००० कर्मचारी होते. जून २०१७मध्ये अ‍ॅमेझॉनने घोषित केले की ते १३.४ दशलक्ष डॉलर्सच्या ४०० गोडाऊनसह होल फूड, एक भली मोठी  बाजारपेठच  विकत घेतली. ई -व्यापार क्षेत्रात काम करणाऱ्या वॉलमार्ट कंपनीसाठी अ‍ॅमेझॉन एक स्पर्धक म्हणून उभी राहिली. न्यू यॉर्क, क्रिस्टल सिटी  येथे दुसरे कार्यालय बांधण्याचा निर्णय झाला. २०१७ च्या शेवटी, अ‍ॅमेझॉनमध्ये जगभरात ५६६००० कर्मचारी होते.

सध्याच्या  घडीला अ‍ॅमेझॉनमध्ये ६१३३०० इतके कर्मचारी काम करतात आणि २, ३२,८८७ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी किमतीची आहे. ई-व्यापाराबरोबरच २०१८-२०१९मध्ये  अ‍ॅमेझॉन-प्राईम, अ‍ॅमेझॉन-गो, अ‍ॅमेझॉन-फोर स्टार अशाही सेवा अ‍ॅमेझॉन आज पुरवत आहे. तंत्रज्ञान म्हणून सुद्धा अनेक संकल्पना, थिअरी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आणल्या आहेत.   

जेफ बेझॉस आणि अ‍ॅमेझॉन... भाग -१

अ‍ॅमेझॉन कंपनीचा संस्थापक असलेल्या जेफ बेझॉसचे बालपण खूप बिकट परिस्थितीचं आहे. अमेरिकेत न्यू मेक्सिको राज्यात अलबुकुरेक गावात जेफ बेझॉसचा जन्म झाला. जन्माच्या दाखल्यामध्ये त्याचं नाव जेफ्री प्रेस्टन जॉर्गनसेन असं नोंदवलं गेलं. त्याच्या आईचं नाव जॅकलिन गिज जॉर्गनसेन होतं. लोक तिला जॅकी असेही म्हणत.  ती बँकेत नोकरीला होती. ती सतरा वर्षाची असताना तिनं जेफ बेझॉसला जन्म दिला. तो अठरा महिन्याचा होताच जेफच्या वडिलांनी तिला घटस्फोट दिला आणि ते घर सोडून निघून गेले. पुढे  त्यांच्याविषयी जेफला कधीच काही समजलं नाही, असं तो आजही सांगतो. मग या जेफ जॉर्गनसेनचा  जेफ बेझॉस कसा? प्रथम आपण हे जाणून घेऊया.  

१९५९ साली क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रोचा उठाव चालू होता. त्यामुळे तिथं खूप गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रत्येकाला पालकांना आपल्या मुलाची काळजी असते, त्यांच्या शिक्षणाची काळजी असते. म्हणून तिथल्या बऱ्याच क्युबन नागरिकांनी आपल्या अमेरिकेत स्थलांतरण करण्याचे ठरवले होते. क्युबन ख्रिस्ती सेवकांनी त्यातच एक बेझॉस नावाच्या मुलाला अमेरिकेत आलं होतं. मिगेल उर्फ माईक नावाचा १५ वर्षाचा मुलगा होता. माईक बेझॉसने अमेरिकेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा तो अतिशय गरिबीचं जीवन जगत होता.  डेलावेअर राज्यात एका अनाथ आश्रमात तो राहत होता. तेव्हा त्याला फक्त स्पॅनिश भाषा येत होती. हळूहळू त्यानं इंग्लिश भाषेवर प्रभूत्व मिळवलं. त्यानं आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण करून इंजिनीरिंगला प्रवेश घेतला. शिक्षण घेत असतना तो तिथल्या एका बँकेत नोकरीही करू लागला. त्याच बँकेत माईकची भेट जॅकी जोगनबर्गशी झाली. पुढे माईक बेझॉस आणि जॅकी जोगनबर्ग यांच्यात मैत्री वाढत गेली. जेफ चार वर्षाचा असताना माईकने जॅकीशी लग्न केलं. माईकने लग्नाआधी जन्मलेल्या जेफचा आनंदाने स्वीकार केला. त्याला स्वतःच आडनाव दिलं आणि  जेफ जोगनबर्गचा जेफ बेझॉस झाला. 

पुढे जॅकी आणि माईकला अजून दोन मुले झाली, ख्रिस्तीयाना आणि मार्क. आपले खरे वडील कोण हे जेफला खूप उशिरा, जवळपास वयाच्या  दहाव्या वर्षी समजलं. 

इंजिनीरिंग पूर्ण झाल्यानंतर माईकला एका तेलाच्या कंपनीत नोकरी मिळाली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागलं. आपल्या कुटुंबाला घेऊन ते ठिकठिकाणी स्तलांतरित होत असत आणि त्यातूनच जेफला बरेच अनुभव मिळत गेले.  जेफ बेझॉस आपल्या आजोबांकडे म्हणजेच आईच्या वडिलांकडे टेक्ससमधील कॉटुला गावात राहू लागला. त्याला तिथला निसर्गरम्य परिसर खूप आवडत असे. जेफचे आजोबा रॉकेटच्या संदर्भातलं संशोधन करत होते. त्यांनी 'डिफेन्स ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजेन्सी' या संस्थेत इंटरनेटसंबधीही काम पाहिलं होतं आणि काही दिवस ते अमेरिकेतील अणूऊर्जा खात्यातील पश्चिम विभागाचे प्रमुख होते. त्यांची खूप शेतीही होती.  निश्चितच, या सर्व गोष्टींतून जेफ भरपूर अनुभव मिळत गेला. निसर्गरम्य भागात जेफ गाई-गुरांची निगा राखणं, आणि शेतीतली बरीच कामं करत असत.    

शेतीची कामं करण्याबरोबरच तो तिथं स्वावलंबी झाला. आजोबांकडून त्याला खूप काही शिकायला मिळालं. तो त्यांना  विज्ञानातील गोष्टीबद्दल प्रश्न विचारत असे. पुस्तकं वाचत असे. तसंच कुठलाही प्रश्न पुढं आला कि गडबडून न जाता तो हिम्मतीने सोडवायची जिद्द त्याला यातूनच मिळत गेली, कारण त्याचे आजोबा  खंभीर स्वभावाचे होते, त्यांच्याकडूनच हे सगळे गुण आल्याचं जेफ आजही सांगतो.  लहान असताना जेफ वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असे. शाळेत वाचन-लेखानाच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेसाठी त्याने तब्बल जवळजवळ ३० पुस्तकं वाचली,  तरीही त्या स्पर्धेत तो विजयी झाला नाही. जेफच्या शाळेत मेनफ्रेम संगणक नेटवर्कमध्ये जोडलेली अनेक टर्मिनल्स होती. अर्थात टर्मिनल्स म्हणजे संगणक नाही. टर्मिनल्स काम फक्त संगणकाचे प्रॉग्रॅम संबधी माहिती देणे होय. ही टर्मिनल्स कशी जोडली गेलेली आहेत, याबद्दल शाळेतल्या कोणाही माहिती नव्हती. जेफने आणि त्याच्या काही मित्रांनी बरीच खटपट करून आणि माहितीपुस्तिकेतून याबद्दलची माहिती मिळवली.  त्यामुळं त्यांना टर्मिनल्सवर बसून मेनफ्रेमचा संगणक चालवता येऊ लागला. संगणकावर तो आणि त्याचे मित्र गेम खेळत असत. हे होत असतानादेखील त्यानं वाचनापासून स्वतःला दूर नेलं नाही. दिवसेंदिवस त्याचं वाचन वाढतच होत.   

जेफला विज्ञानकथा वाचायला खूप आवडायच्या. आयझॅक असिमाव्ह या लेखकाच्या विज्ञानकथा बरोबरच थॉमस एडिसन, वॉल्ट डिजनी आणि इतर शास्त्रज्ञांची चरित्र तो मन लावून वाचत असे. नकळत बेझॉसला  यातूनच खूप प्रेरणा भेटत गेली.  हे सगळं होत असताना तो इतर मित्रांप्रमाणे मित्रसमूहात मिळून मिसळून राहत नसे. त्याऐवजी त्याला वेगवेगळं वाचन करणं, लिखाणं करणं, वेगवेगळ्या विचारात गर्क राहणं, नवीन उद्योगधंद्यांच्या कल्पना करणं हे सारं त्याला खुप आवडत होतं. त्याच्या या स्वभावामुळं पुढं त्याच्या आयुष्यात अडचणी येतील असं त्याच्या आई-वडिलांना वाटत असे. त्याला यातून थोडस वेगळेपण मिळण्यासाठी आई-वडिलींनी त्याला एका फुटबॉल शिबिरात घालायचं ठरवलं. तो तिथंही चमकदार कामगिरी दाखवत संघाचा कर्णधार बनला.  पुढे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर जेफने मॅकडोनाल्डमध्ये बटाट्याचे वेपर्स तळण्याचे काम केलं. याच काळात त्याची ओळख उर्सुला उर्फ उर्सी  हिच्याशी झाली. उर्सुला ही जेफच्या पुढच्या वर्गात शिकत होती. पुढे दोघांनी मिळून शिकवणीसारखा उद्योग चालू केला. 

ड्रीम इन्स्टिट्युट असे त्यांच्या क्लासचे नाव होते, खरे तर हे उन्हाळी वर्ग होते. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ते १५० डॉलर्स शुल्क आकारत होते. या क्लासला चांगलेच यश मिळू लागले. बातम्या वर्तमानपत्रात झळकू लागल्या. उर्सुला आणि जेफमध्ये मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. पुढे ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेल्यामुळे हे प्रकरण थांबलं. अंतराळवीर बनण्याचे जेफचं स्वप्न होतं. त्यानं पुढील शिक्षणासाठी प्रिन्स्टनमध्ये प्रवेश केला. तो विज्ञान आणि गणित विषयात खूप हुशार होता. परंतु, शिक्षण घेत असताना 'क्वांटम मेकॅनिक्स' या विषयात त्याला अपयश आलं. त्यामुळं त्यानं प्रिन्स्टनसोडून कॉम्पुटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. कॉम्पुटर सायन्समधले सर्व  विषय जेफला आवडले. कॉम्पुटर कसा चालतो, प्रोग्रामिंग करणे अशा सर्व विचारामध्ये तो गर्ग असत. त्याने कॉम्पुटर सायन्स आणि इलेक्ट्रिक इंजिनेरिंगमध्ये पदवी मिळवली. १९८४ साली जेफच्या वडिलांची नॉर्वेला बदली झाली. तो उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी तिथंही गेला. तेलाच्या कंपनीत काम करणाऱ्या आपल्या वडिलांना हिशोबासाठी त्यानं एक कॉम्पुटर प्रोग्रॅम बनवून दिला. जेफने सिलिकॉन व्हॅलीमधल्या आईबीएम कंपनीमध्ये तात्पुरती नोकरी जॉईन केली.

जेफने आईबीएमची नोकरी सोडली आणि डी. ई. शॉ नामक नामक कंपनीमध्ये तो नोकरी करू लागला, तिथे पुस्तकांबद्दल जिव्हाळा असणाऱ्या जेफची भेट कादंबरीकार मॅकेन्झी टटल या तरुणीशी झाली. दोघांची मैत्री झाली. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९९३ मध्ये दोघांचं लग्न झालं. सध्या त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी अशी चार मुले आहेत.

Friday, March 15, 2019

डिजिटल चलन आणि भविष्यातील आर्थिक व्यवहार

आजचे चलन हे आपल्या कामाचे मूल्यमापन करणारे साधन आहे. चलन  वापरात येण्यापूर्वी मनुष्य आपल्या उत्पादनाची देवाणघेवाण करून काम करत होता. काही गोष्टी खरेदी करण्यासाठी  वस्तूंचा वापर केला जात असे. उदा. प्राणी ,भाज्या, धान्य इत्यादी. इ. स. ६०० सालामध्ये पहिल्यांदा  तुर्कस्तानमधील लिडिया प्रांतातील बादशाह एलीट्सने चलन वापरले होते. सुमारे ३००० वर्षांपासून पैसा मानवी इतिहासचा एक भाग आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक राष्ट्र स्वतःचे चलन वापरतो आहे. जागतिक पातळीवर प्रत्येक चलनाचे मूल्य ठरलेले आहे. आजच्या नोटा, नाणी हे केवळ माध्यम आहे. जुन्या काळी  बँकात खात्यावरची सर्व रक्कम ही कागदावर नोंदवहीत नोंदवलेली असत, पुढे कॉम्पुटर आणि इंटरनेटने चित्र बदलले आणि हेच चलन आता बदलणाऱ्या जगाबरोबर डिजिटल होत चालले आहे. जसजसा इंटरनेटचा वापर वाढत आहे, तसतसे मोठ्या आर्थिक व्यवहाराबरोबर किरकोळ आर्थिक व्यवहारदेखील ऑनलाईन होत आहेत. सध्या सर्व प्रकारचा हिशोब हा कॉम्पुटरवर, मोबाईलवर होतो.  पेटीएम, भीम, गूगल-पे अशा मोबाईल ऍप्पच्या वापराचे प्रमाण वाढत आहे.

जेव्हा आपण आपल्या देशाचे चलन एखाद्या दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये रुपांतरीत करत असतो, तेव्हा चलन बदलाचा जो दर असतो, तो जगाच्या तुलनेत आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीशी धरून असतो. सध्या 'डिजिटल चलन' म्हणून एक प्रकारचे नवीन चलन उपलब्ध आहे. हे भौतिक चलनांप्रमाणेच सर्व गुणधर्म दर्शविते, परंतु ते तात्काळ व्यवहार आणि अमर्यादित हस्तांतरण मालकीची परवानगी देऊ शकत नाही. 

इथं असं एक उदाहरण देता येईल, ते म्हणजे बिटकॉईनचं! बिटकॉईनवर सामान्य माणसाचे नियंत्रण नसते, त्यासाठी इंटरनेटवर सयंभू संगणकीय जाळे असते. अर्थात याचा कोणी मालक नाही म्हणजेच कोणालाही या जाळ्यात प्रवेश करता येतो. कोणीही बिटकॉईनचा व्यवहार करू शकतो, विकू शकतो, खरेदी करू शकतो आणि त्याला हवे तेव्हा यातून बाहेरही  पडता येते. आजच्या पेटीएम, भीम ऍप्पप्रमाणे याचाही क्यूआर कोड असतो. व्यवहारासाठी एक पब्लिक कोड आणि प्रायव्हेट कोड असतो. यात नवीन बिटकॉइन जिंकण्यासाठी नेटवर्कवरील संगणक संगणकीय रेसमध्ये भाग घेतात, ज्या प्रक्रियेला बिटकॉईन मायनिंग ( बिटकॉईन खाण)  म्हणतात.  बीटकॉईनद्वारे केले जाणारे सर्व व्यवहार ब्लॉक नावाच्या फाईलमध्ये नोंदवले जातात आणी इंटरनेटवर कोणीही हे ब्लॉक पाहू शकतात. सर्व ब्लॉक एका शृंखलेत जोडलेले असतात, कोणताही व्यवहार घडल्यावर सर्वसाधारणतः ६ ब्लॉक्समध्ये नोंद झाल्याशिवाय तो व्यवहार प्रलंबित ठेवण्यात येतो. सध्या इंटरनेटवर २,९०,००० ब्लॉक्स आहेत, ज्यात दर १० मिनिटांनी भर पडत आहे. संबंधित सॉफ्टवेअरवरून आपण हे व्यवहार करू शकतो. या सॉफ्टवेअरसाठी कसलीही रक्कम द्यावी लागत नाही.  सध्या या चलनाला अधिकृत मान्यता जरी नसली, तरी देशांतर्गत चलनामध्ये याला रुपांतरीत करता येते, म्हणजेच हे एक आभासी चलन आहे.

बिटकॉइनची किंमत ही खुल्या बाजारावर आणि नेटवर्कमध्ये सहभागी होणाऱ्या संगणकांवर म्हणजेच ब्लॉकचेनवर अवलंबून असते. सुरुवातीला बिटकॉइनची किंमत हिस्सेदारांच्याच मतांवर ठरवलेली होती आणि ती पुढे वाढत  गेली. भारतीय रुपयांमध्ये सध्या बिटकॉइनची किंमत २ लाख ७५ हजार इतकी आहे.  सांकेतिक भाषेबद्दल आपल्याला माहिती असेल, अगदी आपण जशी गंमत म्हणून 'स'ची भाषा, 'र'ची, 'फ'ची भाषा  वगैरे बोलत असतो. अशाच सांकेतिक भाषेचे सध्याचे आधुनिक रूप म्हणजे ब्लॉकचेन. थोडक्यात, सांकेतिक भाषेत माहितीची साठवण आणि देवाण-घेवाण! सध्या डिजिटल चलन म्हणून बिटकॉइनसारख्या 'क्रिप्टोकरन्सी' आणि एका शेअर मार्केटसारख्या करन्सीपर्यंत सगळीकडे या एनक्रिप्शन बद्दलचा वापर आणि कुतूहल वाढत आहे. अर्थात जगभरात बिटकॉइनसारख्या बऱ्याच डिजिटल चलनांचा जोर वाढत आहे. डिजिटल चलन या कल्पनेच्या केंद्रस्थानी 'इन्क्रिप्शन' आणि 'डिक्रिप्शन' या तांत्रिक संकप्लना दडलेल्या आहेत, म्हणजेच ही एक बिटकॉइन सुरक्षित ठेवण्यासाठीची ही संगणकीय प्रकिया आहे. बिटकॉईन, लाईटकॉईन, नेमकॉईन, पीअरकॉईन, ग्रीडकॉईन, डॅश, एनईओ, इथिरिम क्लासिक अशी अनेक डिजिटल चलनं ही क्रिप्टोकरन्सीमध्ये मोडतात म्हणजेच ब्लॉकचेन या प्रक्रियेतूनच याचे मूल्य ठरते. ही सर्व चलनं २००९ पासून ऑनलाईन व्यवहारात  आलेली आहेत, तर  बिंज, ई-गोल्ड, रँड आणि वेन हे सर्व विना-क्रिप्टोकरन्सीमध्ये मोडतात.

थोडक्यात आपण असे म्हणून शकतो कि आभासी चलनासाठी इंटरनेटवरची एक प्रकारची आभासी अर्थव्यवस्थाही आहे जी आपल्या प्रत्यक्षातल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करते. परकीय चलनाप्रमाणे काही आभासी वस्तू या नवीन शोधलेल्या गेलेल्या बाजारपेठेमध्ये  मोठ्या प्रमाणात विकल्याही जातात आणि यात शेकडो कंपन्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्या आहेत. जसे कि गेम्स,  खरेदी-विक्रीच्या सेवा, अशाच इतर काही सेवा आणि शेअर मार्केटचाही यावर परिणाम होत आहे. अमेरिकेसारख्या देशाने अशा आभासी अर्थव्यवस्थेसाठी अनेक आर्थिक धोरणं आखलेली आहेत. यातील गुन्ह्यांकरता काही नवीन कायदेही अमलांत आणले आहेत. या आभासी अर्थव्यवस्थेतील गुन्ह्यांबद्दल  जागृतीसाठी सरकारकडून वेळोवेळी अवाहनही केले जाते.  जेव्हा आभासी चलनाचे रुपातंर राष्ट्रीय अधिकृत चलनात होते तेव्हा काही देशांत नियमाप्रमाणे याचा करही भरवा लागतो.

भविष्यात डिजिटल साक्षर आणि सुज्ञ नागरिकच याचे व्यवहार करत राहतील, अर्थात पुढे याचा वेगही वाढेल. आजच्या अनेक आर्थिक तज्ञाच्या मते, डिजिटल चलनाचा भाव एक दिवस नक्की ढासळणार आहे, म्हणून  त्यापासून लांबच राहिलेलं बरं! अनेक देशांत याला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. कॅशलेस व्यवहारासाठी भविष्यात अनेक कल्पना पुढे येतील. जुनी चलनही बदलत राहतील परंतु सर्वसामान्य नागरिकांचा विचार करता आजच्या भौतिक नोटा, नाणी कायमस्वरूपी राहतील, हे नक्की!

Published in Masik Adhunik Sarthi, Solapur. May 2019.
Published in Dainik Pudhari on 17 May 2019. 

Wednesday, March 13, 2019

संरक्षणदलामधील तंत्रज्ञानाचा वाढता वापर

आज कोणत्याही देशाची ताकद पडताळण्याची वेळ आली तर त्या देशातील संरक्षणदलात होणारा तंत्रज्ञानाचा वापर हा एक पर्याय बघीतला जातो. सध्या बऱ्याच देशांनी आपल्या संरक्षणदलात बरेच आधुनिक तंत्रज्ञान आणले आहे. एकोणिसाव्या शतकात काही देशांच्या संरक्षणदलात  सैनिकांकडे केवळ रायफली,  साध्या बंदुका, मोजकेच रणगाडे आणि मोजकीच अणुशस्त्रे असत, परंतु आजचे चित्र वेगळे आहे. समुद्रातून मारा करणारी क्षपणास्त्रे, आकाशातून मारा करणाऱ्या मिसाईल्स, जेट विमाने, अणुबॉम्ब, ड्रोन्स असे अनेक तंत्रज्ञान मानवाने मिळवले आहे. भविष्यातही ड्रोन्स, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, रोबोटिक्स या तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. काही दिवसापूर्वी भारताने केलेल्या एअरस्ट्राईक नंतर भारतीय सैन्यांनी घुसकोरी करणारी पाकिस्तानची दोन ड्रोन्स पाडले होती, हे आपण ऐकले असेलच. जेवढे आधुनिक तंत्रज्ञान पुढे येत राहील, भविष्यात आपल्या समोर तेवढीच अवघड आव्हाने असतील. अशा तंत्रज्ञानाचा वापर दहशतवादी संघटनांकडूनही मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक दहशतवादी संघटनांमध्ये अनेक इंजिनीअर, हॅकर, तज्ज्ञ जोडले गेलेले आहेत. सध्या हीदेखील प्रत्येक राष्ट्राला चिंतेत टाकणारी बाब आहे. प्रत्येक देश दहशतवादापासून सुरक्षित राहण्यासाठी आपली ताकद वाढवत आहे. त्याचबरोबर दहशतवादी संघटनांमध्येही तंत्रज्ञानाचा वापर तितक्याच प्रमाणात वाढत आहे. तंत्रज्ञान निर्मितीची आणि त्याच्या वापराची एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. हिंसक दहशतवादाचा खात्मा प्रतिहिंसेने करावा हा मतप्रवाह सध्या सर्वच समाजघटकांवर पडत चाललेला आहे आणि हीच चाहूल एखाद्या राष्ट्राला आपली ताकत दाखवण्यासाठीचा मार्ग ठरतो.

परवाच भारतीय सैन्यदलाने एअरस्ट्राईकमध्ये डसॉल्ट मिराज २००० या फाईटर प्लेनचा वापर करून
मिराज-२०००
पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हल्ला केला. १९६५ मध्ये पहिल्यांदा फ्रांसने डसॉल्ट मिराज २०००ची निर्मिती केली. जगातील नऊ देशाच्या संरक्षण दलात या जेट विमानाचा वापर होत आहे.  आता भारत स्वतः याची निर्मिती करू लागला आहे. याचा वेग तासी २०४९५ किलोमीटर इतका आहे आणि हे जेट ६००० किलोग्राम वजनाच्या मिसाइल्स घेवून वाहतूक करू शकते. डसॉल्ट मिराज २०००साठी १९६५ मध्ये  फ्रांसकडून  सिंगल-शाफ्ट, टर्बोफन इंजिन विकसित करण्यात आले होते. या प्रकल्पात अशा २० इंजिनची तरतूद केली होती. १९७०मध्ये याची पहिली चाचणी झाली. यात 'एव्हीयन डी कॉंबॅट फ्यूचर' या फ्रेंच कंपनीचा मोलाचा वाटा होता. या जेटची जुलै १९७३ मध्ये कॅरेव्हेल टेस्टबॅकवर फ्रांसच्या सीमेरेषेवर हवाई वाहतूक झाली. डेसॉल्ट एव्हीयशन कंपनीने डिसेंबर १९७४ पासून मिराज एफ १ई टेस्टबॅड्स वापरून एम ५३-२ आवृत्तीचे पुन्हा उड्डाण परीक्षण केले आणि तेव्हापासून त्यात वैशिष्ठपूर्ण नाविन्याची बर घालून डसॉल्ट मिराज- जी, मिराज जी-८, मिराज -२००० डी अशा अनेक आवृत्त्या निघत गेल्या. सध्या भारताकडे ५० हून अधिक अशी जेट विमाने आहेत आणि अग्नी, पृथ्वी, निर्भय, शौर्य, प्रहार अशा अनेक प्रकारच्या मिसाईल्स त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्याही भारताकडे आहेत.  
Rafale - राफेल

याबरोबरच १२६ डसाल्ट राफाले जेट विमानाने विकत घेण्याचा फ्रांसशी करार झाला आहे. याचीही निर्मिती फ्रान्समध्ये डसाल्ट अव्हिएशन ही कंपनी करते. हा भारतीय संरक्षण दलासाठी आजपर्यंत सर्वात मोठा व्यवहार आहे. राफेल पाकिस्तानच्या एफ-१६, चीनच्या सुखोई-३०, अमेरिकेच्या एफ-२२च्या किंबहुना मिराज-२००० पेक्षा केत्येकपटींनी सरस आहे आणि राफेल जेट अतिवेगामुळे शत्रूराष्ट्राच्या रडारमध्येही सापडू शकत नाही. या जेट मधून जमिनीवर किंवा हवेत असे दोन्ही प्रकारचे हल्ले करता येतात आणि याच्या बाजूला असेलेल्या मिसाईल याला अजून वेगळ रूप देतात. या जेटची दृष्टीक्षमता ३६० डिग्रीमध्ये आहे, त्यामुळे चारी बाजूने शत्रू शोधता येतो किंबहुना शत्रूवर लक्ष ठेवता येते,  याबरोबर याच्यामधील ईलेक्ट्रॉनिक वार फेअर सिस्टममुळे शत्रूच्या ठिकाणाची अचूक जागा समजते. लवकरच हे विमान भारतीय हवाई दलामध्ये सामील होणार आहे.

याबारोबरच तेजस हेही युद्धात वापरले जाणारे भारतनिर्मित जेट आहे. भारतीय नौदल आणि वायुदल दोन्हीकडून वापरले जाणारे हे जेट विमान आहे आणि कसल्याही वातावरणात याचा वापर केला जाऊ शकतो. इतर राष्ट्राच्या संरक्षण दलात अनेक शक्तिशाली जेट आहेत. ग्रीपेन हे स्वीडनचे सर्वात शक्तिशाली विमान आहे. हे अमेरीकेच्या एफए-१८ सुपर होर्नेट आणि ग्रासीसी राफेलपेक्षाही भेदक आहे. इतर जेटच्या तुलनेत याच्या वापरासाठी कमी खर्च येतो. एफ-१५ इगल हे जेट विमान अमेरिकासह आणखी चार देशामध्ये आहे. काही वर्षापूर्वी अमेरिकेने इराकवर हल्ले करण्यासाठी या विमानाचा वापर  केला होता.  युरोफाईटर टायफून हे जेट विमान जर्मिनी, अर्जेन्टिना, इटली, स्पेन या देशांच्या सैन्यदलात याचा समावेश आहे. २०११ मध्ये फ्रांस आणि इटलीने लिबियावर केलेल्या हल्ल्यात या जेट मोठा वाटा होता. युरोफाईटर टायफून या जेटआमध्ये रडार असून हे राफेलच्या तोडीचे विमान समजले जाते. सी-हारीअर हेही  एक  जेट विमान असून, हे समुद्रातून हल्ले करण्यासाठी वापरण्यात येते. भारताकडे अशी विमाने मोठ्या संखेने आहेत. एफ-२२ राफ्टर हे जेट केवळ अमेरिकेकडेच आहे आणि सध्या काही कारणास्तव संयुक्त राष्ट्राने याच्या निर्मितीवर निर्बंध लादले आहेत. हवेतल्या हवेत शत्रूच्या विमानावर याने हल्ले करता येतात.   चेंगडू जे-१० हेही जेट विमान युद्धकाळात वापरले जाणारे विमान आहे, यामध्ये लेझर गाईडर याबरोबर साटेलाईट गाईडर बॉम्बची सुविधा केलेली आहे, हे या जेटचे सर्वात अनोखे वैशिष्ठ्य आहे आणि याचा समावेश साधारणतः सध्याच्या प्रगत राष्ट्रांच्या संरक्षण दलात आहे. टी-५० सुखाई पी. ए. के. - एफ. ए. या जेट विमानाच्या निर्मितीसाठी सध्या भारत आणि रशिया या दोन देशामध्ये करार झाले आहेत. वायूसेना बरोबरच नौदलामध्येही याचा समावेश करता येईल यादृष्टीने याची निर्मिती होत आहे अर्थात भारत आणि रशिया या दोन्ही देशाची सैन्यदलातील ताकत वाढणार आहे. एफ. ३५ लायटनिंग हे सध्या अमेरिकेकडे असलेल्या राफ्टर फायटर जेटची पुढची आवृत्ती आहे. ऑस्ट्रेलिया, फ्रांस, जपान अशा देशांशी या जेटच्या विक्रीचे करार झालेले आहेत. ही विमाने आतापर्यंत जगभरात १५०च्याच संखेने उपलब्ध आहेत.

संरक्षण दलात वापरल्या जाणाऱ्या इतर उपकरणांबरोबर सध्या रोबोटिक्स आणि ड्रोन्सचाही वापार वाढत आहे. जर तिसरं महायुध्द घडलं तर रोबोटिक्स त्यामध्ये अग्रभागात असेल. होणाऱ्या हल्ल्यांमध्ये रोबोटिक्सचा मोठा वाटा असेल.  हे तंत्रज्ञान वापरून शत्रूराष्ट्रात घूसकोरी करता येते. रोबोटिक्स आणि ड्रोन्ससाठी वेगळे अंतरराष्ट्रीय कायदे असावेत यासाठी संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्र समिती यांच्यामध्ये विचारविनीमय बैठका चालू आहेत. दहशतवादी संघटनांकडेही या शस्त्राचा वापर वाढत आहे. प्रत्येक देशाने असे तंत्रज्ञान केवळ दहशतवादाविरुद्धच वापरावे, नव्हे तर निष्पाप मानवी जीवन संपवणाऱ्या हिरोशिमा आणि नागासाकी हल्ल्यांचा इतिहास अजून तरी  कोणीही विरलेला नाही.  

Published in Dainik Surajya, Solpaur on 2 May 2017.
 

Saturday, March 9, 2019

नव्या क्रांतीची सुरुवात एका स्त्रीकडून!

समता, स्वातंत्र्य आणि न्याय यापासून दिशाहीन राहिलेल्या सामाजिक प्रवाहाविरुद्ध बंड केला तरच इतिहास आपली दखल घेतो. आज आपल्यासमोर किंवा आपल्याकडून काही चुकीचे होत असताना किंबहुना आपल्याला काही चांगले काम करण्याची संधी असताना, आपण मूग गिळून म्हणा किंवा मूग न गिळता म्हणा गप्प राहतो, गप्प बसतो हे वेगळे सांगायची गरज नाही परंतु, काही दिवसापूर्वीच असा बंड केला आहे तामिळनाडूतील तिरुपाथुर या शहारातील एका स्त्रीने! एम. ए. स्नेहा यांनी! या अशा पहिल्या भारतीय नागरिक आहेत ज्यांना कसली जात नाही आणि कसला धर्म नाही! तामिळनाडूमध्ये वकीली करणार्‍या स्नेहाताईंनी देशातील पहिले ‘नो कास्ट, नो रिलीजन’ प्रमाणपत्र मिळविले असून देशातील अनेक भागातून त्यांचे कौतुक होत आहे.

माणसाची ’जात’ हा तसा खूप संवेदनशील विषय आहे. त्यावर प्रहार करायला आणि त्यावर यश मिळवायला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षाहून अधिक काळ लागावा ही आश्चर्याची गोष्ट आहे किंबहुना भारताला अजून त्यात यश मिळालेले नसले, तरी जे आज कोणालाच जमले नाही, ते काम एका स्त्रीने केलेले आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण त्यामागची त्यांची दृढ आणि सकारात्मक इच्छाशक्ती. स्नेहाताईंनी जातीनिहाय प्रमाणपत्र मिळविले आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे प्रमाणपत्र मिळवणे त्यांच्यासाठी खूप कठीण काम होते. त्या स्वतःला केवळ भारतीय समजतात. गेली 9 वर्षे त्या यासाठी लढा देत होत्या. स्नेहाताईंच्या आईवडिलांनीही त्यांच्या लहानपणापासून शाळेचा दाखला किंवा कोणताही अर्ज भरताना धर्म आणि जात हे रकाने रिकामे ठेवले होते. जातीनिहाय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी 2010 मध्ये पहिला अर्ज केला. त्यांचे वेळोवेळी अर्ज करणे आणि त्याचा पाठपुरावा करणे हे काम चालूच होते. शेवटी स्नेहा यांनी अधिकार्‍यांना हे पटवून दिलं की या प्रमाणपत्राच्या आधारे त्या कसलाही फायदा उचलणार नाहीत किंवा शासनाकडून कुठलेही अधिक अधिकार मिळवणार नाहीत. या प्रमाणपत्राद्वारे त्या कुणाच्याही अधिकारांवर गंडांतर आणणार नाहीत. हे प्रमाणपत्र केवळ त्यांची ओळख असेल असेही त्यांनी पटवून दिले आणि जातीनिहाय प्रमाणपत्र त्यांना 2019 मध्ये मिळाले. या प्रवासात त्यांना अशा बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला.

खरे म्हणजे, जाती प्रत्येक समूहवर्गाच्या कामाच्या प्रकारामुळे पडल्या आहेत. आज बहुसंख्य लोक जातीनिहाय व्यवसायातून बाहेर पडले असले तरी जातींची बंधकता आपल्याच वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्थेमुळे तोडता येत नाही हे खरे आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, बर्‍याचजणांना आपल्या जातीवर भलताच गर्व असतो आणि प्रत्येक जात ही जातीअभिमानाने भारलेली असते. ते अन्य कोणत्याही जातींपेक्षा आपलीच जात कशी श्रेष्ठ आहे याचे गोडवे गातात. आजवर जातीवर बरंच काही लिहिलं गेलं. आज जातीवर अभ्यास करणारे विचारवंत भरपूर आहेत. जातीभेदाविरुद्ध प्रचारही होतो. तरीही जातीसंस्थाविरोधी असणारा कथित वर्ग लग्नासाठी ब्राह्मण बोलावतो. स्वजातियांचे कसेही असले तरी स्वीकारायचे आणि इतर जातियांचे धिक्कारायचे किंवा दुर्लक्षीत ठेवायचे ही प्रवृत्ती एकविसाव्या शतकात कळसाला पोहोचली आहे. दुसर्‍या बाजूला त्यांच्याचकडून ‘जातीभेद हा अमानवीय आहे’ असाही प्रचार होतो.

खरे तर भौतिकशास्त्राच्या नियमाप्रमाणे, एखाद्या पिस्टनवर तुम्ही जितका दाब द्याल त्याच्या अनेकपट तो दाब बाहेर फेकतो. असेच चित्र जातीच्या बाबतीत आहे. आज आपण जितके जाती नष्ट करण्याचा प्रयत्न करतो तितक्याच प्रमाणात त्याला खतपाणी मिळत असताना आपणास आढळते. आज जातीवर एवढे राजकारण होत असताना, त्यात स्वतःची जात कायमचीच नाकारणे ही एक प्रकारची क्रांतीच म्हणावी लागेल. या सकारत्मक कार्याची सुरुवात एका महिलेकडून होणं ही देखील अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा क्रांतीची इतिहास कायम दखल घेत आला आहे. याउलट आज प्रत्येक जातीच्या आणि पोटजातींच्या अनेक संघटना आहेत. प्रत्येक संघटना आपापल्या जातीच्या संतांची व महामानवांची तळी उचलत जातीअंतर्गत विवाहांसाठी वधु-वर मेळावे घेत असताना आपण पाहत आहोत. स्वार्थापोटी प्रत्येक संघटना आपल्या जातीच्या महापुरुषांचा वापर करत राजकारण करतात. अर्थात याला अपवादही असतील परंतु मोठ्या प्रमाणातले आजचे चित्र असेच आहे. बहुतांशी जातीच्या संघटना आपापल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक मागण्यांसाठी पुढे सरसावत आहेत आणि यात अशा एका आव्हानात्मक आणि सकारात्मक बदलाला सुरुवात होत आहे आणि त्यात आपल्यालाही सामील होण्याकरताची चाहूल देणारी ही गोष्ट आहे.

आज आपण आधुनिक जगात जगत आहोत. भारत सॉफ्टवेअर निर्मितीत अग्रेसर आहे. अमेरिका, रशिया, कोरिया आणि इतर प्रगत देशाप्रमाणे भारतातही तंत्रज्ञान जोर घेत आहे. म्हणूनच तर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी ’जय जवान, जय किसान’ या घोषवाक्याला ’जय विज्ञान’ हाही जयघोष जोडला होता. बदलत्या जगाबरोबर पुराणपंथीपणा झुगारत सकारात्मक गोष्टी स्वीकारल्या पाहिजेतच. भारतासारख्या देशाला हे जातीविरुद्धचे बंड भविष्यासाठी आमूलाग्र परिवर्तन ठरेल, असा विश्वास आहे.

स्नेहाताईंच्या या धाडसी पावलाचा विचार करताना आजतागायत राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून जातीव्यवस्था नष्ट करण्याचे प्रयत्न अयशस्वी का झाले? यावर गंभीर विचार व प्रयत्न करण्याची करण्याची ही वेळ आहे, हे जाणवते. असे झाले तरच जात नष्ट होईल. जात नसलेले प्रमाणपत्र मिळवता येते आणि जातीतून बाहेर पडून माणूस म्हणून जगता पण येते हे स्नेहाताईंनी अवघ्या देशाला दाखवून दिले. खरोखरच आपण स्नेहाताईंचे अभिनंदन करूया आणि आपल्या देशात ही क्रांती मोठे रूप धारण करेल अशी अशा बाळगूया.

Published in Dainik Surajya, Solapur.
Published in Saptaahik Chaprak, Pune. 
On the occasion of International Women's day (08 March)