Search in Google

Friday, November 23, 2018

करिअर - आर्टिफिशियल इंटीलिजन्समधील संधी

दिवसाबरोबर बदलत जाणाऱ्या जगाबरोबर आपण स्वतःला बदलले पाहिजे. जुना अभ्यासक्रम बाजूला सारून नवीन तंत्रज्ञान आत्मसात केला पाहिजे. आज विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात बरेच संशोधन होत आहे, हे आपल्याला ठावूक आहे. त्यातच आर्टिफिशियल इंटीलिजन्स हेही एक क्षेत्र आहे.  'आर्टिफिशियल इंटीलिजन्स' म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता.  अर्थात कसलाही मानवी हस्तक्षेप न करता संगणकाला, मोबाईलला किंबहुना एखाद्या मशीनला स्वत:चे नियोजन आणि समोर आलेल्या प्रश्नांची उकल करण्याची क्षमता उपलब्ध करून देणे म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्स होय. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असते अर्थात ती आज आपण अनेक सिनेमांमध्ये बघतही आहोत. आज सध्या ही संगणक अभ्यासक्रमामधील एक महत्त्वाची शाखा बनली आहे. 

संगणक आणि यांत्रिकी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेंस हा करिअर घडवण्याचा अजून एक उत्तम मार्ग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आता एक विशिष्ट मुख्यप्रवाह म्हणून संगणक, विज्ञान व अभियांत्रिकी उपशाखेमध्ये बदलली आहे. मशीन लर्निंग, प्रोसेस आटोमेशन संकल्पना वापरून  बुद्धिमान मानवाप्रमाणे विचार करण्याचे हे तंत्रज्ञान जोर घेत आहे. अशी अपेक्षा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील करियर ऑटोमेशनसारख्या भागात नवीन आयटी विकासाच्या केंद्रस्थानी असेल. यामुळे आज सिलिकॉन व्हॅलीमध्ये एक प्रकारची स्पर्धाच निर्माण झाली आहे आणि गुगल, फेसबूक, लिंक्डइन, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या दिग्गज आयटी कंपन्या आणि इतर बरेचजण 'करिअर इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स'साठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी भरभराटीला येणार आहे, यात शंका नाही.

सॉफ्टवेअर इंजिनीरिंगनंतर आईटीमध्ये  करिअर करण्यासाठी बरेच पर्याय असतात, त्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंस जर करिअरमार्ग निवडला तर त्यातही पुन्हा आपल्याला अनेक उपशाखा पाहाव्या लागतात. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मशीन लर्निंग, प्रोसेस अटोमेशन, कोग्निटीव्ह रोबोटिक्स असे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. यामध्ये रोबोटिक्स अटोमेशन इंजिनीअर, अल्गोरिदम स्पेशालीस्ट, रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम पाहावे लागते.  खाजगी कंपन्या, विमा कंपन्या, सार्वजनिक संस्था, शिक्षण, कला, आरोग्य सुविधा, सरकारी एजन्सी आणि लष्करी ई. या सर्व सेवामधले होताने करावे लागणारे काम कॉम्पुटर प्रोग्रामिंगद्वारे स्वयंचलित करून द्यावे लागते आहे . डेटा एन्ट्री, डेटा मेन्यूपुलेशन अशी कामे रोबोटद्वारे आटोमेट करावी लागतात. यामुळे कंपन्यांचा वेळ, पैसा, मनुष्यबळ वाचत आहे. त्यामुळेच कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसला प्राधान्य देत आहेत. डेटा एन्ट्री यांसारख्या नोकऱ्यांचे काम आता रोबोट करत आहे आणि त्यामुळेच डेटा ऑपरेटर, डेटा एन्ट्री अनॅलिस्ट अशा नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे असे जुने तंत्रज्ञान शिकून काही फायदा होणार नाही आणि हे अभ्यासक्रमातूनही बरखास्त होत आहे, त्यामुळेच आपण नेहमीच नवीन तंत्रज्ञानाकडे वळले पाहिजे. 

आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये करियर करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी इंजिनीरिंग पदवी आणि एखाद्या कॉम्पुटर प्रोग्रामिंग भाषा अशी मूलभूत तत्वे असणे आवश्यक आहे आणि रिसर्चसाठीचा तर्क, दार्शनिक आणि संज्ञानात्मक पायांबद्दल आपण दृढ असणे गरजेचे आहे. याच आधारवर बहुराष्ट्रीय कंपन्यांमधल्या मुलाखती असतात, या मुलाखतीतून पास होणे अनिवार्य असते.  आपल्याला या क्षेत्रात अनुभव असेल तर चांगले पॅकेज मिळते. काही दिवसापूर्वीच टी. सी. एस., कोग्नीजंट अशा कंपन्या या आर्टिफिशियल इंटेलिजेंसवरील अनुभवी लोकांना इतर कौशल्याच्या तुलनेत दुप्पट वेतन देण्याचे घोषित केले आहे. पुढील काही वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा जागतिक श्रमिक बाजारपेठेवर मूलभूत प्रभाव असेल, हे यावरून स्पष्ट होते. 

महाविद्यालयातून नुकतीच पदवी घेवून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी याचे ट्रेंनिंग पुणे, हैद्राबाद, बंगळूरू, चेन्नई, नोईडा अशा शहरांमध्ये खाजगी इन्स्टिटयूड मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये काम करण्यासाठी यु-आय पाथ, ब्ल्यू-प्रीजम, अटोमेशन एनीव्हेअर असे अनेक टूल आहेत. आपण याच्या ऑनलाईन परीक्षा पास होवून कौशल्यधारक बनू शकतो. यामधल्या काही परीक्षांसाठी शुल्क आकारण्यात आलेले आहे तर काही ऑनलाईन ट्रेनिंग मोफत आहे. आणि यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पकेजसह नोकरी मिळते.  आज आर्टिफिशियल इंटेलिजेंस कौशल्यधारकांची मागणी वाढत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील करियर हे एक वेगवान आणि आव्हानात्मक क्षेत्र जरी असले, तरी आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये दृश्यमान मार्ग तयार करत आहे त्यामुळेच हे तंत्रज्ञान अवगत असलेल्या नोकरदारांची मागणी वाढत आहे.

Published in Dainik Sakaal on 20-12-2018