Search in Google

Thursday, December 27, 2018

सोशल मीडिया आणि राजकारण

सध्याच्या राजकारणाचा एकूणच, केंद्रबिंदू जुन्या घडामोडीपासून, मूल्यांपासून, प्रतीकांपासून व निष्ठांपासून दुसरीकडे सरकलेला आहे. त्या सरकण्याच्या मुळाशी सकारात्मक आणि नकारात्मक पैलूआहेत. त्या दोन्ही संदर्भातून सोशल मीडियाचा प्रभाव आणि परिणामकारकता आजच्या राजकारणात कशी दिसते, हे तपासनं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं आहे. जगभरात पार पडत असलेल्या निवडणुकीत फेसबुकचा एकाच वेळी एकाच यंत्रणाकडून दुहेरी वापर झालेला आहे. ज्यांनी दुसर्‍याच्या बदनामीच्या जाहिराती दिल्या, त्यांनीच स्वतःच्या कौतुकाच्या जाहिराती दिल्या. त्यामुळे आज सोशल मिडियावर नियंत्रण नसणं अन ते ठेवणं अतिशय कठीण आहे, ही या माध्यमाची उणीव आहे. आजचं राजकारण बेभरवशाचं होण्यातही याच माध्यमाचा मोठा वाटा आहे.
सोशल मीडियावरचा विस्कटलेला चेहरा हा आजच्या समाजमनाचा आरसा आहे. तरीही लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य अशी दोन हत्यारं वापरून हे माध्यम राजकारणात यशस्वी ठरलेही आहे, असे मानण्यात शंका नाही. खरं तर, दिवसाप्रमाणे राजकारणाचं स्वरूप बदलत नाही, परंतु दिवसेंदिवस माध्यमं बदलत गेलेली आपण पाहिलेलं आहे. आज या माध्यमांमध्ये समाजाच्या समकालीन आकलनाचं प्रतिबिंबही आहे. अभीव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक मूल्य घेऊन जन्माला आलेलं हे माध्यम आहे आणि या सात-आठ वर्षात याने जोर घेतला आहे. तरीही आजच्या घडीला यातून राजकीय क्षेत्रासंदर्भात विचार मांडण्याची तरुण वर्गाची भाषा भरकटत असते किंबहुना राजकीय किंवा सामाजिक व्यवहारांच्या संदर्भात सोशल मीडियाला प्रसारमाध्यमाइतके गांभीर्याने अजून घेतले जात नाही, असेही काहीसे आज जाणवत आहे.

हे माध्यम जेवढं शंकांचं निरसन करतं, तेवढंच नवीन शंका निर्माण करतं. जेव्हा आपण राजकारणाचा या माध्यमाशी सबंध जोडतो, तेव्हा अर्थातच त्याच्या सर्व बाजू समजून घ्याव्या लागतात. मुळात समाजातील जवळपास सर्वच घटक या माध्यमानं आपलेसे केले आहेत. अनेक देशांत तर राजकीय सत्तांतर केले आहे. तसं आज भारतातही बरेच राजकीय बदल घडून आलेले आहेत.  या माध्यमानं माणसांचं अस्तित्व अन चारित्र्य तपासण्याची पद्धतदेखील जन्माला घातलेली आहे. पूर्वी राजकीय पुढाऱ्यांना आपले समर्थक वेगवेगळ्या पद्धतीनं संपर्कात ठेवावे लागत असे. आता यासाठी हे माध्यम संपर्कात राहण्यासाठी फारच सोपं आहे. कुठेही बसून या माध्यमामुळे नेता आपल्या कार्यकर्त्यांशी सवांद साधू शकतो. सोशल मीडियावर असलेले मित्र आणि फॉलोअर्स आजच्या नेत्याची उंची मोजण्याचं साधन झालं आहे म्हणजेच जितके जास्त फॉलोवर्स तितकी जास्त लोकप्रियता असं काही लोकांचं मत जरी असलं तरी हे विधान मनात शंका निर्माण करणारं आहे. जसं राज ठाकरेंच्या सभेत गर्दी करणारे सगळेच मनसेला मतदान करत नाहीत. म्ह्णूनच सोशल मीडियावरचे सगळेच फॉलोअर्स गांभीर्यानं घ्यायची गरज नसते. कारण तिथं आभासीपणा जास्त असतो, परंतु त्या फॉलोवर्सकडून तेवढ्याच प्रमाणात त्या नेत्याचे विचार पसरवण्यात मदत होते. अर्थात आजच्या राजकारणाचा परीघ अन गांभीर्य  वाढवण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे, हेही तितकेच खरे आहे.

सोशल मीडिया २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा गेम चेंजर असण्याची शक्यता आहे;  असे वातावरण खुद्द सोशल मीडियावर होताना दिसत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाची सोशल मीडिया टीम कार्यरत आहे, किंबहुना कार्यकर्तेही आपला पक्ष, नेता कसा चांगला आहे याची माहिती व्हायरल करण्यात हल्ली मग्न असतात. याचे काही पडसाद ५ राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पडलेही आहेत, असे म्हणता येईल. दुसऱ्या बाजूला, निवडणूक आयोगाने सोशल मीडिया कितीही गांभिर्याने घेतला आणि निवडणुकांपूर्वी कितीही आचारसहिंता अंमलात आणली तरीही सोशल मीडियाने होणारा राजकीय प्रचार थांबवणे जवळ जवळ अशक्य आहे. आणि देशातील फक्त १६ टक्के जनता इंटरनेट वापरत जरी असली तरी सोशल मीडियामधून मिळालेल्या माहितीचा प्रसार चर्चेतून ऑफलाईनसुद्धा होत असतो. हे माध्यम गतिमान असल्यानं त्याचा होणारा परिणामसुद्धा तितकाच गतिमान आहे. ज्या गतीनं ते एखाद्याची प्रसिद्धी करतं, त्याच गतीनं बदनामीही करतं. हे माध्यम एकेकाळी ज्यांना खुलं पाहिजे होतं, त्यांना आता त्याच्यावर बंधन घालावीशी वाटत आहेत. कारण एकच आहे - नियंत्रणाची कमतरता. त्यामुळे ते आज ज्याच्या फायद्याचं असतं, उद्या त्याच्या तोट्याचंही ठरू शकतं, असं काहीसं चित्र आज आपण पाहत आहोत.

आणखी पुढे जाऊन विचार केला तर... सध्याचे सरकार सोशल मिडीयाच्या जोरावर निवडून आले हे आपल्याला माहीत आहे. यावरून  सोशल मीडियाची ताकद विलक्षण आहे हे येथे स्पष्ट होतं. सोशल मीडियाचा उपयोग केवळ राजकारणातील प्रचारासाठीच नव्हे तर सगळ्याच प्रकारच्या प्रचारासाठी आपण करू शकतो. प्रोग्रामिंगमध्ये तसे अल्गोरिदमच लिहिलेले असतात. सॉफ्टवेअर कंपन्यांकडून आपल्या मागणीनुसार आपल्याला पाहिजे तसे सॉफ्टवेअर बनवून घेता येते, हेही आपल्याला ठावूक आहे. त्यात तसे बदलही घडवून आणू शकतो. आपल्याला पाहिजे तशा कंडीशन त्यात ऍड करू शकतो. हे फेसबुक, ट्विटर सारख्या जग व्यापणारया सॉफ्टवेअरलाही लागू होते. या कंपन्या त्याना पाहिजे तसा वेळोवेळी अल्गोरिदम अपडेट करत असतात आणि सुरक्षतेसाठी प्रोग्रामिंग लॉजिक, कोड शेअर करू शकत नसतात.

पोस्टमध्ये एखादा शब्द आला की पोस्ट ऑटोमेटिक बूस्ट झाली पाहिजे आणि नको असलेला शब्द आला की, पाहिजे असूनही पोस्ट बूस्ट झाली नाही पाहिजे असेही लॉजिक त्यात टाकता येते. आणि आजच्या सत्तेतले  लोक तर मार्क जुकरबर्गची गळाभेट घेवून आले आहेत. अर्थात आजचे राजकीय क्षेत्र सोशल मीडियाच्या बुडातच हात घालून, सोशल मीडिया आपल्या अधिपत्याखाली सामावून घेण्याचा प्रयत्न करत असेल काय? आणि तेव्हा खरी चर्चा काय झाली असेल ? असा प्रश्न आपल्यासारख्या जागरूक नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे.


Published in Dainik Pudhari on 03 Jan 19.
Published in Masik Adhunik Sarthi, Solapur. April-2019.