Search in Google

Monday, April 1, 2019

भारतीय ई-व्यापारातील शोकांतिका!

ई-व्यापार आणि त्याशी संलग्न असलेल्या व्यवसायांतील इतर कंपंन्यापैकी अ‍ॅमॅझॉन ही अमेरिकेमधील अवाढव्य कंपनी. जवळपास युरोप, आशिया, अमेरिकेतील सर्वच देशांत या कंपनीचे जाळे पसरले असुन स्थापनेपासुन केवळ २३ वर्षांत या कंपनीने केलेला प्रवास अद्भुतच म्हणावा लागेल. आज जी ऑनलाईन शॉपिंगमधली क्रांती दिसत आहे ती केवळ अशा इ-व्यापारामध्ये काम करणाऱ्या या कंपन्यांमुळेच! फ्लिपकार्ट, स्नॅपडील यापेक्षाही अमेझॉनकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. पूर्वी लोक ऑनलाईन शॉपिंग करायायला कमालीचे घाबरत होते, किंबहुना ते आजही घाबरतात. भारतातील या भीतीचे  प्रमाण अमेझॉनने कमी केले असे म्हणतात येईल. लोक विश्वास ठेवतील अशी सेवा अमेझॉन पुरवत आली आहे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील या ई-व्यापारातील भारतीय कंपन्या आहेत. याही खूप कमी वेळेत वाढल्या.  इ-व्यापारामध्ये काम करणारी अलीबाबा ही एक चीनची कम्पनी आहे. जगभरात याही कपंनीचं अमेझॉनपेक्षा जास्त जाळं पसरलं आहे.  खरं तर,  भारतातील इ-व्यापाराचा प्रवास म्हणजे खूप कठीण अडथळ्यांची शर्यत ठरला आहे. भारत हा लोकसंख्येत दुस-या क्रमांकाचा असूनही भारतातील ई-व्यापार चीनच्या तुलनेत अगदी नगण्य असाच म्हणावा लागेल.

जागतीक पातळीवर पाहिले असता अमेझॉन आणि अलीबाबात जागतिक बाजारपेठा काबीज करायची एक प्रकारची स्पर्धा लागलेली आपल्याला दिसेल. ई-व्यापाराबाबत भारतातील चित्र अगदीच केविलवाणं आहे. भारतात ई-व्यापार करणाऱ्या अवाढव्य कंपन्या उभ्या राहिल्या नाहीत, ही भारतीय व्यवसायिंकाची शोकांतिका आहे. काही दिवसापूर्वीच (४ मे २०१८ रोजी ) फिल्पकार्ट ही भारतीय कपंनी अमेरिकेच्या 'वॉलमार्ट' या कपंनीने विकत घेतली. वॉलमार्ट ही सुपर मार्केट अर्थात ई-व्यापारातील जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. १९६२ साली स्थापन झालेली ही कंपनी खाद्यपदार्थ, कपडे, प्रसाधने इत्यादी अनेक प्रकारची ग्राहकोपयोगी उत्पादने इंटरनेटसारख्या मध्यमामधून विकते. ही कंपनी कंपनीदेखील अमेरिकेमधूनच चालते. आज भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेकडे जगभरच्या कंपन्यांचे लक्ष आहे. भारत आजही व्यवसाय वाढण्यासाठी उपयुक्त नसलेले विकट कायदे, पायाभुत सुविधांचा अभाव, कायदेशीर अडचणी आणि पाहिजे तेवढी ई-साक्षरता नसल्याने किंवा भारताचा इ-व्यापारावर तितकासा विश्वास बसलेला नसल्याने या अत्याधुनिक क्षेत्रात जेवढी प्रगती करायला हवी होती तेवढी प्रगती भारताला साधता आलेली नाही. आजही ऑनलाईन शॉपिंगवर इ-साक्षर नसलेल्या लोकांचा पाहिजे तेवढा विश्वास दिसत नाही. खरे तर, ई-व्यापाराला बळ देणा-या 'कॅश ऑन डिलिव्हरी' पद्धतीला बेकायदेशीर ठरवण्यात येत असल्याने ई-व्यापारच संकटात सापडेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. चीनसारख्या साम्यवादी देशात मात्र धाडस आणि कल्पकतेच्या जीवावर अलीबाबासारखी बहुराष्ट्रीय कंपनी निर्माण होऊ शकते, अर्थात, ई -व्यापारात भारत चीनच्या आसपाससुद्धा नाही.  ई-व्यापाराबद्दलचे  असे भारतात का नाही यावर आपण विचार केला पाहिजे.

अलीबाबा या कंपनीचे संस्थापक असणाऱ्या 'जॅक मा' या अवलियाने सर्वप्रथम काही मित्रांकडून पैसे घेऊन ई-व्यापारातील व्यवसायाला सुरुवात केली. प्रोग्रामिंगचे अजिबात ज्ञान नसताना, व्यवसायाचा आणि विक्रीचा काहीही अनुभव पाठीशी नसतांना आणि मुख्य म्हणजे इंटरनेट वापरणारा पुरेसा ग्राहकवर्ग नसतानाही जॅकने अलिबाबा ही ई-कॉमर्स कंपनी सुरु केली. ऑनलाईन खरेदी करणे हे सोयीचे आणि सुरक्षीत आहे हे ग्राहकाना पटवून देण्यात अलिबाबाने बराच वेळ खर्ची घातला. पण हळूहळू जॅकला यश येऊ लागले. पुढे जसजसा इंटरनेटचा प्रसार वाढत गेला तसा अलिबाबाचा पसारा देखील वाढत गेला आणि बघता बघता अलिबाबा डॉट कॉम ही चीनमधील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली.

अलिबाबाचा पसारा केवळ चीन पुरताच मर्यादित न ठेवता जॅकने जगात इतर देशातही पाय रोवायला सुरुवात केली. ईतकी की आता जगभरात सर्वाधिक विक्री असणाऱ्या कंपन्यांमध्ये अलिबाबा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अगदी एक-दोन वर्षापूर्वीच पेटीएम, स्नैपडील सारक्या कंपन्यांच्या मार्फत भागीदारी प्रवेश केला असला तरी धोरणात्मक दृष्ट्या सर्वशक्तीनिशी अलीबाबा हीसुद्धा कंपनी भारतात उतरलेली नव्हती. काही ई-व्यापार कंपन्यांत अलीबाबाने आर्थिक गुंतवणुकी करण्याचे काम मात्र सुरु केले होते. ही गुंतवणुक आतापर्यंत १२८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे . किंबहुना अमेरिका विरुद्ध चीन हे ई-व्यापाराचे युद्ध भारतीय भूमीवर लढले जात आहे असे म्हणायला हरकत नाही. आता अलीबाबा 'क्लाउड काम्पुटिंग'बरोबर 'आर्टिफिशिअल इंटीलिजन्स'मध्येही उतरली आहे. इतर चिनी कंपंन्यासह 'याहू'सारखी बलाढ्य कंपनीसुद्धा आपला पैसा अलीबाबामध्ये गुंतवत आहे

पुस्तकांची आवड असणारा अमेझॉनचा संस्थापक 'जेफ बेझॉस' या अवलियालामध्ये पुस्तकांसाठीच काहीतरी
नावीन्यपूर्ण करण्याची भूक होती.  त्यानं इंटनेटवर पुस्तकांची विक्री चालू केली.  त्यानं सुरू केलेल्या ‘अ‍ॅमॅझॉन डॉट कॉम’ या वेब साईटनं सुरुवातीला पुस्तकांचं वितरण, पुस्तकांची खरेदी या गोष्टींच्या संदर्भात कमी काळात प्रचंड धुमाकूळ घातला. आज अमेझॉन कपंनीचा ई-व्यापारातील वाढलेला जोर आपण पाहत आहोत.  ई-व्यापाराबरोबरच या कंपनीने सॉफ्टवेअर निर्मितीचे अनेक तंत्रज्ञान पुढे आणले आहे.  

सध्या भारताची ई-व्यापार मार्केट ३५ बिलियन अमेरिकेन डॉलर इतकी आहे आणि भारताची आर्थिक व्यवस्था व जिडीपी दर पाहता, येत्या काही वर्षात अनेकपटीनी वाढणार आहे.यात आपला व्यवसाय वाढण्यासाठी अनेक कंपंन्या पुढे सरसावणार हे निश्चित आहे. यात अनेक छोटे छोटे उद्योगही पुढे येतील हेही नक्की आहे, ई-साक्षरतेच्या वाढीबरोबर फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा भारतीय  कंपन्या विकल्या जाऊ नये अशी सरकारी धोरणेही पुढे यायला हवी. तेव्हाच कुठे जागतिक ई-व्यापारात डिजिटल भारताची ओळख बनेल.

Published in Dainik Surajya, Solapur.
15 Apr 19.