Search in Google

Monday, December 31, 2018

करीअर - सोशल मीडिया मार्केटिंग

आपल्या राज्यघटनेमुळे प्रत्येक लिहिण्या-वाचण्याचा बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यासाठी  इंटरनेट एक माध्यमाचा वापर होत आहे. यातून आजचा तरुण वर्ग बोलका होतोय, हे आज काही वेगळे सांगायची गरज नाही. पुढेही ही परीस्थिती जोर धरणार आहे. सोशल मीडियामध्ये खूप विलक्षण  ताकद आहे. सोशल मिडियामुळे प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्यास व्यासपीठ मिळते, आपले विचार लोकांपर्यंत पोहचवता येतात. समजा आपल्याला काही सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न मांडायचे आहेत, पूर्वी यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती द्याव्या लागत असत, आता मात्र आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त होतच असतो, अर्थात असे करणारा प्रत्येकजण पत्रकार ठरत आहे. 

सामाजिक संपर्काच्या साईटमुळे प्रत्येक व्यक्तीमधील अंतर कमी झाले आहे किंबहुना प्रत्येकाची संपर्क संख्या वाढत चाललेली आहे. त्याचप्रमाणे कॉर्पोरेटमध्ये कंपन्यानी सामाजिक माध्यमामध्ये प्रवेश केल्यामुळे ग्राहकांशी प्रत्यक्षपणे संपर्क करणे सहज साध्य झाले आहे. पारंपारिक जाहिरातींपेक्षा सामाजिक माध्यमामार्फत केलेली जाहिरात ही अधिक प्रभावी आणि व्यापक होत आहे.

याबरोबर यातून आपण आज स्वतःसाठी रोजगारसुद्धा उपलब्ध करू शकतो. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांची लोकप्रियता व विस्तार पाहता, अनेक व्यावसायिक कंपन्या व उद्योग धंदे ह्या संकेतस्थळांचा वापर जाहिरातींसाठी करतात. उदा. - इतर संकेतस्थळांच्या जाहिराती, बाजारातील नवीन वस्तूंच्या जाहिराती, नोकऱ्यांची जाहिरात इत्यादी. संकेतस्थळांना ह्या जाहिरातदारांकडून प्रचंड पैसा मिळतो. यासाठी युट्यूब चॅनल, न्यूज़ पोर्टल, ब्लॉगिंग, जाहिरात प्रमोशन असे अनेक पर्याय आहेत. 

यातूनच सोशल मीडिया मार्केटिंग संकल्पना उदयाला आली आहे. सामाजिक माध्यमाच्या साईटसमधून लक्ष वेधून घेण्याच्या कार्यपध्दतीला सामाजिक माध्यमातील विक्रीकला असे म्हणतात. या आज्ञावलीमध्ये लक्ष वेधून घेण्यायोग्य मजकूर तयार करण्याचा प्रयत्न करणे आणि तयार झालेला मजकूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत / वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे हे येथे केंद्रस्थानी आहे. एखादी घटना, वस्तू, सेवा, संस्था इ. विषयी मजकूर इंटरनेटच्या माध्यामातून उदा. वेबसाईटस, सामाजिक नेटवर्क, क्षणात संदेश, बातम्या इ. व्दारे लाखेा ग्राहकांपर्यंत झटक्यात पोहोचू शकते.

फेसबूकवर ऑफिशियल पेजेस बनवून फॉलोअर्स वाढवणे, आपल्या उत्पादनाची जाहिरात लोकांपर्यंत पोहचवणे, युट्युबवर सबस्क्रायबर वाढवणे, ब्लॉग लिहिणे, ते इंटरनेटवर व्हायरल करणे, यातून आपल्या उत्पादनाची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे, तसेच इतरही सोशल मिडिया जसे की ट्वीटर, व्हाटस् अप, इन्स्टाग्राम अशा साईट्सवर पैसे भरून मार्केटिंग करता येते. अशा कामांसाठी सेवा पुरवणाऱ्या किंवा उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्याकडे विशिष्ठ सोशल मिडिया टीम असते. त्यात सोशल मिडिया सेल्स एक्झेक्यूटीव, सोशल मिडिया सेल्स व्यवस्थापक असे जॉब्स असतात किंबहुना आपण स्वतः सोशल मिडिया सेल्स म्हणून स्वतंत्र व्यवसायही चालवू शकतो. याचे सर्व ट्रेनिंग आणि ट्रिक्स ऑनलाईन उपलब्ध आहेत. सोशल मोडीयाचा वापर सर्वच क्षेत्रात जोर धरत आहे उदा. राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व्यवसायिक, इ. त्यामुळे सोशल मिडिया मार्केटिंगची मागणी वाढत आहे.

Published in Dainik Pudhari in Edu-Disha supplement.
02 Apr 2019.