Search in Google

Wednesday, August 8, 2018

धोके तंत्रज्ञानाच्या वाटेवर

विज्ञानाने मानवी जीवनात खूप बदल घडवून आणले आहेत. 'विज्ञान शाप कि वरदान'  हे वाक्य आपण यापूर्वी बऱ्याच वेळा ऐकलं असेल. खरेतर, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण स्वतःला योग्य दिशेने घेऊन जात आहोत काय? याच वेळोवेळी आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. आपण जे मोबाईल, कॉम्पुटर किंवा इतर जी प्रोग्रामिंगद्वारे चालणारी उपकरणे वापरात आहोत त्यातून जे आत्मसात करत आहोत याचा वेळोवेळी विचार करण्याची गरज आहे. या उपकरणांचा आपल्याला आजच्या डिजिटल युगात जगत असल्याचा भलताच  कैफ चढला आहे. जवळ असणाऱ्या कुटुंबीय, नातेवाइकांपेक्षाही मोबाईल आपल्या आवडीचा  होऊन बसला आहे. उदाहरणार्थ. मानसतज्ज्ञांच्या मते, केवळ टाईमपास म्हणून व्यक्‍ती या गेम खेळायला सुरुवात करते. परंतु, याचे सवयीत रूपांतर कधी झाले आणि गेम हा जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनला, हे खेळणार्‍याला कळतसुद्धा नाही. गेम खेळण्याचे व्यसन काहीसे वेगळ्या स्वरूपाचे असते. हे गेम कधी व्हिडीओ गेम स्वरूपात असतात, तर कधी डिजिटल गेमच्या स्वरूपात.

आजचा तरुणवर्ग  सोशल मीडियाच्या प्रचंड आहारी गेलेला दिसत आहे. लोकांना  फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक  साईट्सचे वेड लागलेले आहे. खरे म्हणजे, प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. कोणीही उठतो आणि काहीही लिहितो. यात अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. तर काही समाजकंठकांच्या भावना भडकल्याही जातात. पण काहीही शेअर करत असताना आपल्या सत्सक विवेकबुद्धीला असे करणे पटते का? आपण भारतीय म्हणून योग्य करत आहोत का ?  या शंभरवेळा विचार करूनच असे पाऊल उचलावे, शब्द हे धार असलेल्या शास्त्रापेक्षा भयानक हत्यार आहे. बरेच लोक चॅटिंगच्याही नको तेवढे आहारी गेलेले दिसतात. यामध्येच फेक प्रोफाईलचा सुळसुळाट समोर आला आहे. आपली खरी ओळख लपवून कोणी तरी दुसऱ्याच्या नावाने प्रोफाइल बनवायचे आणि समाज भडकवणारे काही तरी शेअर करायचे किंवा ज्याचे फेक प्रोफाइल बनवले आहे, त्याची अश्लील फोटो शेअर करून बदनामी करायची. असे महाभयानक अनेक गुन्हे आज पोलीस स्टेशनमधल्या फाईल्समध्ये बंद आहेत.

हे झाले सोशल नेट्वर्किंग साईट्स वापराबद्दलचे, परंतु आपल्या इतर दैनंदिन व्यवहारासाठी आपण इंटरनेटचा वापर करत असतो. जसे की इंटरनेट बँकिंग, ओनलीन शॉपिंग, बिल भरणे इ. हे करत असताना आपण पायरेटेड सोफ्टवेअर न वापरणे, वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट करणे, यूजर आय-डी आणि पासवर्ड कधीही कोणाला न सांगणे, फेक ई-मेल्सला बळी न पडणे, आपल्या वैयक्‍तिक कॉम्प्युटरसाठी, मोबाईलसाठी अँटिव्हायरस वापरणे याकडेही प्रामुख्याने लक्ष्य दिले पाहिजे. एक्सकोड घोस्ट, यूमी, मोबिसेज, वॉनाक्राय, अर्व्हिलाच, बूटनेट, रॅनसमवेअर अ‍ॅडव्हायजरी, कोअर बूट, डोर्कबूट, मेलिसा, झीअस, मायडूम अशा महाभयानक व्हायरसेसमुळे आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो, आपला कॉम्पुटर, मोबाईल हॅक शकतो कालांतराने आपले बँक खाते हॅक होऊ शकते. हॅकिंगसाठी फेक ई-मेलचा वापर भयंकर वाढला आहे. ओळखीच्या नावाचा वापर करून काही आकर्षक लिंक्स पाठवल्या जातात आणि डमी वेबसाईटवर लॉगीन करायला भाग पाडून यूजर आय-डी आणि पासवर्ड चोरले जातात. मोबाईल क्लोनिंग हा एक भयंकर प्रकार पुढे येत आहे, यात तुमचा मोबाईल नंबर क्लोन केला जातो. तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व मेसेज, कॉल हे हॅकर्सकडे वळवले जातात आणि तुम्हाला येणारा बँकेचा ओटीपी किंवा अ‍ॅक्सेस कोड चोरीला जाऊ शकतो आणि तुम्हाला माहीत न पडता तुमच्या खात्यावरून आर्थिक व्यवहार होऊ शकतात.

इंटरनेट गेमच्या माध्यमातून ‘गेमिंग डिसऑर्डर’ नावाचा महाभयानक मानसिक आजार जडत असतो, हे गेम खेळणाऱ्यापैकी  बर्‍याच जणांना माहीत नाहीय; पण अलीकडच्या काही दिवसातच या आजाराचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजारांच्या यादीत केला आहे. गेमिंगमुळे आपल्या दिनचर्येत होणार्‍या बदलांकडे आपणच डोळसपणे पाहिले नाही, तर धोका अटळ आहे.  ‘डब्ल्यूएचओ’ आणि अन्य काही तज्ज्ञांच्या मते, सध्या गेमिंगच्या आजाराने ग्रस्त झालेल्यांचे प्रमाण अत्यल्प असून, सुमारे 3 टक्के गेमर्सना या व्याधीने ग्रासले आहे. परंतु, भविष्यात ही संख्या प्रचंड वाढणार आहे. जगभरातील लाखो गेमर्सना ‘गेमिंग डिसऑर्डर’ने ग्रस्त रुग्ण असे संबोधणे चुकीचे ठरेल. अगदी त्यांना गेमिंगचे अत्याधिक व्यसन असले तरी! काही व्यक्‍ती अगदी इच्छेविरुद्धही गेम खेळत राहतात. अशा व्यक्‍तींना ही अवस्था प्राप्‍त झाली आहे, असे मानायला हवे. या लक्षणावरूनच कुशल डॉक्टर या आजाराची ओळख पटवू शकतील. गेम खेळण्याचे व्यसन केवळ लहान मुलांमध्येच असते, असे नाही. मोठ-मोठ्या कार्यालयांमध्येही कर्मचारी अँग्री बर्ड, टेम्पल रन, कँडी क्रश, कॉन्ट्रा यासारखे मोबाईल गेम खेळत बसलेले दिसतात. डिजिटल दुनियेत राहत असल्याबद्दल आज आपण स्वतःची पाठ थोपटून घेतो आहोत. परंतु, या दुनियेत असणारी विविध गेमिंग अ‍ॅप्स व्यसन जडावे अशी महाभयंकर आहेत. या व्यसनाचा परिणाम म्हणून आवेग नियंत्रणाची यंत्रणा म्हणजे ‘इम्पल्स कन्ट्रोल मेकॅनिझम’वर परिणाम होतो. जेव्हा एखादी व्यक्‍ती गेम खेळत असते, तेव्हा मेंदूचा काही हिस्सा उद्दीपित होतो. ज्याप्रमाणे अमली पदार्थांच्या सेवनामुळे ही उद्दीपनाची प्रक्रिया घडते, तशीच हीसुद्धा प्रक्रिया असते. त्यामुळे कॉम्पुटरच्या, मोबाईल गेमच्या जास्त आहारी जानेही धोकादायक ठरू शकते.

अर्थात इंटरनेट हे वापरताना आपला हवारेपणा, आपली मानसिकता नडत असते हे इथं आवर्जून सांगावेसे वाटते. एखाद्या लोटरीच्या मेलच्या बळी पडणे, गेम खेळून जास्त स्कोर करण्याची आपली मानसिकता, स्वस्त दारात खरेदी करण्याची मानसिकता, इ. याबरोबरच सेफ पासवर्ड कसा तयार करावा, व्हायरसचे हल्ले, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्डचा सुरक्षित वापर, ऑनलाईन फसवणूक म्हणजे काय, सोशल नेट्वर्किंग साईट्सचा वापर करताना घ्यावयाची काळजी, सॉफ्टवेअर पायरसी, आयडेंटिटी थेफ्ट, ऑनलाईन छळ, एथिकल हॅकिंग, मोबाईलची सुरक्षितता या सर्व बाबींबद्दल आपण जागरूक राहिले पाहिजे.

Pubished in Saptaik Chaprak , Pune. 6 to 12 Aug 2018 .
Pubished in Dainik Surajya, Solapur. 11 Aug 2018 .
Pubished in Masik Adhunik Sarthi, Solapur. Jan 2019