Search in Google

Wednesday, August 22, 2018

रोबोटिक्सची दुसरी बाजू

           संगणक, इंटरनेट, वेगवेगळी सोफ्टवेअर्स, मोबाईल ऍप्स, रोबोट आणि इतर इलेक्ट्रोनिक्स उपकरणांचा होणारा वापर त्यामुळेच तंत्रज्ञानामध्ये एक प्रकारची उत्क्रांती होत आहे. 'चपराक'ने प्रकशित केलेल्या माझ्या मागच्या काही लेखांमध्ये मी रोबोटिक्स अटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स (ए. आई.) बद्दल बरीचशी सकारात्मक बाजू मांडली होती. आज रोबोटिक्स आणि ए. आई. विषयीच्या जरा नकारत्मक बाबींबद्दल बोलूयात. रोबोटिक्स या तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. यात शंका येणे अगदी स्वाभाविक आहे. मग असं सगळ होत असताना मानवाने आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या कितपत आहारी जाणं योग्य ठरेल याचाही कुठंतरी विचार व्हायला हवा. 

           कोणत्याही देशाचं नवनिर्माण तंत्रज्ञान माहिती करून घ्यायच असेल तर त्या देशाच्या संरक्षण दलात वापरल्या जाणाऱ्या शस्त्र-अस्त्रांकडं नजर टाकली पाहिजे, त्या देशाच्या संरक्षण दलाचा पाठपुरावा घेतला पाहिजे. यातील बऱ्याचशा गोष्टी संवेदनशील आणि गुपित असल्या तरी ज्या काही समोर येतात, त्या निश्चितच आश्चर्यकारक असतात. अगदी विचार करायला लावणाऱ्या असतात. प्रत्येक राष्ट्र आपल्या शत्रूराष्ट्राचा अधिकृतरित्या किंवा छुप्या पद्धतीने याबाबतचा पाठपुरावा घेतं असत. म्हणूनच इथं संरक्षक दलातील आर्टिफिशियल इंटीलिजन्ससंबधित काही बाबी समजावून घेणं योग्य ठरेल. आर्टिफिशियल इंटीलिजन्स(ए. आई.)च्या वाढत्या वापरामुळे आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात खूप मोठे बदल घडून येत आहेत. ते आपल्या देशापर्यंत पोहचलेसुद्धा आहेत किंबहुना मोबाईल आणि कॉम्पुटरद्वारे ते आपल्यापर्यंत देखील पोहचले आहेत. संरक्षण दलातदेखील ए. आई.चा वापर होत असताना आपल्याला दिसेल. आताच्याच एका उदाहरणावर आपण प्रकाश टाकू. अर्थात मागच्या काही दिवसात काही परीक्षणासाठी भारतीय संरक्षण दलात आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर केल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले होते. याच्याविषयी अजून बरेच संशोधन करण्यासाठी एका उच्च स्तरीय गटाची किंवा समितीची स्थापना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे आणि आपली संरक्षण ताकत वाढवण्यासाठीही याची गरज होती हेदेखील यावरून स्पष्ट होते. यासाठी लागणारे तज्ञ सायबर ते अंतरीक्ष क्षेत्रातील निवडले जातील. भारतातील टाटा ग्रुपच्या एका कंपनीकडे याचे नेतृत्व असणार आहे.

               कोग्निटीव्ह रोबोटिक्स, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटीलिजन्स (ए. आई.), मशीन लर्निंग यासांरख्या संकलपनेमुळे कॉम्पुटर सोफ्टवेअर्स आणि इतर यांत्रिकी उपकरणे सक्षम बनत आहेत. खरे तर, अशा यंत्रणा मानवाच्या बुद्धीपेक्षा अधिक जलद विचार करून त्या पटपट निर्णय घेवून आणखी स्वयंभू बनत असतात. झटपट पुरवले गेलेल्या कॉम्पुटराईज्ड सिग्नल्समुळेच बरेचशी वळणं घेणाऱ्या विमानामागे क्षेपनास्त्र हजारो किलोमीटर अंतरावरदेखील अगदी अचूक निशाणा घेतं. आता इथं आपल्या डोक्यात आणखी काही प्रश्न निर्माण झाले असतील. या प्रणालीमध्ये काही पुरवलेली माहिती कमी असेल किंवा किंचीतशी जरी चुकीची असेल तर ? त्या संवेदनशील परीस्थितीत त्या यंत्रामध्ये करत असलेल्या काही गोष्टी परत घेण्याची क्षमता नसली तर? या यंत्रांच टेस्टिंगच जर चुकीच्या पद्धतीने झाले असेल तर? हो अगदी खरं आहे, असे प्रश्न डोक्यात नाचू लागणं अपेक्षित आहे. आपल्या शिक्षणपद्धतीप्रमाणेच सोफ्टवेअर्स आणि रोबोटमधेही बौद्धिक पातळीवर वर्गीकरण केले जाते. आर्टिफिशियल इंटीलिजन्समध्ये देखील विविध पातळ्या असतात. त्यापैकी नॅरो आणि जनरल या दोन आहेत. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, स्पॅम ई-मेल फिल्टर्स, अटो सर्च, स्वयंचलीत वाहनं किंवा स्वतः गेम खेळणारा कॉम्पुटर ही नॅरो संकल्पनेशी निगीडीत उदाहरणे आहेत. वरती सांगितलेली संरक्षण क्षेत्रातील उदाहरणे जनरल आर्टिफिशियल इंटीलिजन्समध्ये मोडतात. हे सर्व रोबोट अगदी मनुष्याप्रमाणे भावना प्रगट करतील अशा लेव्हलपर्यंत बनवलेले असतात. जसे की ते रोबोट स्वतः आपली ज्ञान ग्रहण करत असतात. अनुभवामधून शिकत असतात. मग यात जर एखादी त्रुटी असेल तर मनुष्याने स्वतःच आपल्यासाठी संकट निर्माण केल्याचे चित्र तयार होईल आणि त्याला पळता भुई कमी पडेल. याचीच भीती अनेक संशोधकांना आहे. असं घडण्याच्या शक्यता प्रत्येक्षात यायला अजून २०-२५ जाऊ द्यावे लागतील. आता सध्यातरी तसे घाबरण्याचे कारण नाही. परंतु आपण त्याच दिशेने वाटचाल करत आहोत असे आपण समजू शकतो. तोपर्यंत काही वर्षात यावर संशोधन होवून बरेच तोडगे निघतील असा विश्वास ठेवायला हरकत नाही. नॅरो आणि जनरल या दोन्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर संरक्षण दलात अगदी खुबीनं केला जाऊ शकतो हे सिद्ध झाले आहे. जसे की ड्रोन्स म्हणजेच चित्रफिती दाखवणारी छोटी विमानं. त्यांची संख्याच जास्त ठेवायची कि त्यांना नष्ट करेपर्यंत संरक्षण दलाच अपेक्षित असलेलं काम पूर्ण झालं असलं पाहिजे. यालाच स्वार्मिंग असे म्हणतात. लष्करात स्वार्मिंग पद्धत अतिशय प्रचलित आणि प्रभावी होत आहे कारण रोबोटची संख्या, लक्ष्य गाठण्यातील नेमेकेपणा, कसल्याही धोक्याच्या परीस्थितीत पुढे जाण्याची क्षमता यामुळे शत्रूवर विजय मिळवता येवू शकतो. अशी ड्रोनसारखी छोटी रोबोट्स बनवण्यासाठी तसा जास्त खर्च येत नाही. ही संरक्षण दलासाठी महत्वाची बाब आहे.

             संरक्षण दलातील आधुनिक शस्त्रास्त्र म्हंटल की अमेरिका, रशिया, कोरिया अशा अनेक देशांची नावे समोर येतात. इथं मात्र आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या बाबतीत चीनसारखा देश आघाडीवर असल्याची चिन्ह आहेत. ढेस्ला आणि स्पेसेक्स या नावाच्या संस्थाचा मुख्य अधिकारी एलोन मस्क याच्या मते, जर तिसरं महायुध्द घडलं तर रोबोटिक्स त्यामध्ये अग्रभागात असेल. होणाऱ्या हल्ल्यांमध्ये रोबोटिक्सचा मोठा वाटा असेल. कदाचित या कारणामुळे अंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत मनुष्याच्या डीएनए पासून नवीन मनुष्य तयार करण्यावर अर्थात क्लोनिंग करण्यावर जशी बंदी आणली गेली तशीच बंदी आर्टिफिशियल इंटीलिजन्सवर देखील आणावी लागेल. परंतु रोबोटिक्समधील संशोधकांच्या मते, बंदी आणण्यासारखे सर्व प्रकार अति होत असून याचा विरोधही केला गेला आहे आणि हे विधान हास्यास्पददेखील ठरवले गेले आहे. आण्विक शास्त्रांवर काही कायद्यांतर्गत जशी नियमावली आखली, काही करार केले गेले तशेच आंतरराष्ट्रीय कायदे रोबोटिक्ससाठी बनवावे लागणार आहेत, यात शंका नाही. या युगात ए. आई. हे तंत्र एक प्रकारची दुधारी तलवार आहे. ए. आई.ची जशी सकारात्मक बाजू आहे तशी नकारात्मक बाजू देखील आहे.

      मागच्या काही दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेलेळे जेष्ठ वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी सांगितले होते की संपूर्ण कृत्रिम बुद्धीचा विकास मानवीवंश संपवेल आणि एकदा मनुष्य कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करतो तसा तो रोबोट स्वतःच वेगाने पुढे जाईल आणि सतत वाढत जाणाऱ्या दराने स्वत: ला पुन्हा डिझाइन करेल. हळूहळू जैविक उत्क्रांतीमुळे मर्यादित असलेला मानव प्रतिस्पर्धा करू शकेल का? आणि त्यांचे स्थान पुढे ढकलण्यात येईल का? ए. आई.बद्दल अशी गंभीर प्रमेयं त्यांनी मांडून ठेवली गेली आहेत. नवनवीन संशोधनाचा वापर मनुष्याच्या उद्धारासाठी करायचा कि संहारासाठी? शेवटी याचा निर्णय माणसानेच घ्यायचा आहे. आज बेरोजगारीचा प्रश्न सोडवत असताना त्यात आणखी भर पडण्याची भीती अनेक देशांना आहेच. २००१ साली ओसामा-बिन-लादेनने अमेरिकेवर केलेला हल्ला, केवळ विमानं वापरून केला होता, मग हे जर शस्त्र काही दहशतवादी संघटनांच्या हाती लागलं तर तुम्हीच विचार करा काय होईल ?

Published in Saptahik Chaprak, Pune and Dainik Surajya Solapur.