Search in Google

Saturday, May 5, 2018

चला रोबोटिक्सच्या दुनियेत...

       आजवर विज्ञानाने लावलेले शोध आणि त्यामुळे सोयीस्कर झालेले मानवी जीवन आपणाला माहिती आहेच आणि आपण ते उपभोगतही आहोत. अगदी आदिमानवाच्या चाकाच्या शोधापासून ते राईटबंधूच्या विमानाच्या शोधापर्यंत! आणि एडिसनच्या दिव्यापासून ते आजच्या ग्राहम बेलच्या फोनपर्यंत! आदिमानव ते आधुनिक मानव या प्रवासात अनेक संशोधन होत गेले. मानव वेगवेगळ्या ग्रहावरही जावून आला. अशा अजूनही अनेक कल्पना पुढे येत राहतील आणि विज्ञानाच्या जोरावर मनुष्य प्रगती करत राहील. 'रोबॉट' ही त्यातलीच आणखी एक अभिकल्पना! जगात अभियांत्रिकीकरणाने प्रचंड वेग घेतला आहे. आपले दैनंदिन जीवन सोपे व्हावे, वेळ, पैसा वाचला जावा यासाठी अभियांत्रिकीकरणात मानवाने टाकलेले आणखी एक पाउल! 'रोबॉटिक्स' मध्ये इलेक्ट्रॉनिक्स (Electronics Engineering), यान्त्रिकी (Mechanical Engineering) आणि कॉम्पुटर सॉफ्टवेयरचा ( Computer Engineering ) समावेश होतो.

        विज्ञानात पहिल्यांदा रोबॉटिक्स शब्दाचा वापर आइसेक एसिमोवने १९४२ मध्ये  त्याच्या 'रनअराउण्ड' या पुस्तकात केला होता. आज काही विचारवंत असेही दावे करतात कि रोबॉटिक्स ही संकल्पना ४०० वर्षापासून आहे. असेलही ! परंतु २०व्या शतकात रोबॉटचा वापर वाढत गेला आणि आजपर्यंत वाढत आहे . आर्टीफीशीअल इंटीलीजंस (Artificial Intelligence), मशीन लर्निंग (Machine Learning), कोग्नीटीव (Cognitive ), प्रोसेस ऍटोमेशन (Process Automation) अशा रोबोटिक्सच्या शाखा पडतात. सध्या आपल्याला कारखान्यात, मोठ्या कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये अशा अनेक मशीन काम करत असताना दिसतील कि ज्या संगणक प्रणाली (सोफ्टवेअर), सेन्सर, इलेक्ट्रॉनिक्स चिप्सचा वापर करून मनुष्याचे काम करतात. कामाप्रमाणे रोबॉटचे प्रकार पडतात. मनुष्य जशी व्यक्ती ओळखून त्यासंबंधीची कामे करतो, जसे कि फेस रेकग्निशन, व्हॉइस रेकग्निशन, इमेज रेकग्निशन हे प्रकार आर्टीफीशीअल इंटीलीजंसमध्ये मोडतात. गूगल वर काही सर्च केले असता, आपल्याकडून काही चुकले असेल, तर गूगलने सुचवलेले बरोबर सर्च पर्याय येतात, म्हणजेच हा एक मशीन लर्निंग चा रोबोट आहे. उदा. आपण 'Wife' किंवा 'Spouse' या शब्दाबद्दल काही सर्च करत असाल दोन्हीचे रिझल्ट सारखेच असतील. तर कॉग्निटिव्हमध्ये आर्टीफीशीअल इंटीलीजंसच्या साहाय्याने मानव निर्मित डेटा रिपोर्ट्स बनवणे अशी कामे येतात, जसे की मनुष्याने आवाज देऊन मशिनकडून काम करून घेणे. उदा. आपण 'WIRED' या शब्दाबद्दल काही शोधत असेल आणि चुकून 'Wored' शब्द टाईप झाला असल्यास रोबोट काही क्षणात 'WIRED' हा शब्द घेतो आणि त्या संबंधित रिझल्ट मिळतात. तर प्रोसेस ऍटोमेशनमध्ये रोबोटकडून डेटा एंट्री करून घेणे, डेटा स्कॅन करून घेणे, पर्यायी उत्तरे असणारे पेपर तपासणे इ. कामे येतात. मनुष्याची कामे आणि विचार मशीनला करायला लावणे हे अगदी मजेशीर असल्याने, या क्षेत्रात अनेक गंमती अनुभुवयाला मिळतात, बरेच काही शिकायला मिळत राहते. आजच्या युगाला रोबोटिक्सची मागणी असल्याने मार्केट स्टॅंडर्ड पॅकेजेसही आहेत.

         आज जर विचार केला, तर १० वर्षांपूर्वी फेसबुक हे नाव फारसं प्रसिद्ध नव्हतं. व्हॉट्स अ‍ॅप या शब्दाचा जन्म व्हायचा होता. आणि टच स्क्रीन काय असतं हे बहुतेकांच्या कल्पनेतही नव्हतं. परंतु आज तंत्रज्ञान क्रांती करत आहे. सगळे काही ऑटोमेशनमध्ये होत आहे.  आज ज्या नोकऱ्या आपण बघत आहोत अशा नोकऱ्या राहणार नाहीत अर्थात त्याच स्वरूप बदलेले असेल. रोबोटिक्समुळे मनुष्यबळ, वेळ, पैसा वाचला जात आहे. बदलणाऱ्या विश्वाप्रमाणे नवीन तंत्रज्ञान शिकत गेले पाहिजे, बहुराष्ट्रीय कपंन्यांमध्येही रोबोटिक्स इंजिनिअरची मागणी वाढत आहे.  भविष्याचा विचार करता नोकरीसाठी ही एक चांगली संधी आहे. याचे ट्रेंनिंग पुणे, हैद्राबाद, बंगळूरू अशा शहरांमध्ये खाजगी इन्स्टिटयूड मध्ये उपलब्ध आहे. इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये, खाजगी संस्थांमध्ये, सरकारी संस्थांमध्ये असे अनेक रोबोट वापरले जाऊ लागले आहेत. अर्थात 'डिजिटल इंडिया' साकार होण्यासाठी या क्षेत्राला नक्कीच आणखी मागणी असेल.



Published in Dainik Sakal, Pune 21 March 2018.
Published in Dainik Surajya, Solapur 8 Feb 2018.