Search in Google

Tuesday, May 29, 2018

डिजिटल इंडिया आणि भारतीयांसमोरील आव्हाने

       परवा ईपीएफची सरकारी वेबसाईट हॅक झाल्याची बातमी ऐकली, परंतु नंतर श्रम मंत्रालयाने घोषित केले कि काही तांत्रिक कारणास्तव ती बंद केली होती. क्षणभर डोक्यात विचार आला, खरच असे झाले तर काय होईल? सध्याचे सरकार सत्तेवर येताच एका वर्षातच एकावर एक सरकारी योजनांचा पाऊस पडला, त्यातीलच एक महत्वपूर्ण असणारी योजना म्हणजे 'डिजिटल इंडिया' . या योजनेअंतर्गतच  सरकार नागरिकांना तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहित करत आहे. ज्या सरकारी कामांसाठी दिवसेंदिवस वाट पहावी लागत असे, ती कामे आता पटापट होतात. जास्तकरून आर्थिक व्यवहारावर भर देत आहे. परंतु याला तितकेच अडथळेही आहेत, ते आज आपण अनुभवत आहोत. जसे कि तंत्रज्ञान निरक्षरता, २०१७ मध्ये झालेला रॅनसमवेयर व्हायरसचा हल्ला, फेसबुककडून लीक झालेला डेटा, काही दिवसापूर्वी युजर्सना ट्विटरने केलेले पासवर्ड बदलण्याचे निवेदन. पूर्वी युद्धांमध्ये एखाद्या शत्रुराष्ट्रावर हल्ला करण्यासाठी शत्रअस्त्रांचा, रासायनिक अस्त्रांचा म्हणजेच एखादा विषारी वायू, एखादे रसायन यांचा वापर होत असे किंबहुना काही जीवाणू, रोगाटलेले जनावर, माकड, उंदरे, कुत्रे इतकेच नव्हे तर आजारी मानवी मृतदेहसुद्धाचा हल्ला शत्रुराष्ट्रावर करायचा. असे हल्ले दुसऱ्या महायुद्धात भरपूर झालेत. सध्या रासायनिक शत्रअस्त्रांचा वापर करणाऱ्या इसिससारख्या महाभयंकर दहशतवादी संघटना आता इंजिनीअर, हॅकर्सची भरती करत आहेत. ही संघटना स्वतःची सायबर आर्मीही बनवत असल्याची बातमी पुढे आली आहे. ही खरच जगाला चिंतेत टाकणारी गोष्ट आहे. अर्थात प्रत्येक राष्ट्राला आव्हान असणार आहे ते सायबर हल्ल्याचे. असा हल्ला कोणत्याही ठिकाणी बसून कोणत्याही देशावर करता येवू शकतो. याची शंभर टक्के हमी देणारा एक हल्ला गेल्या वर्षी झाला होता. हा हल्ला होता 'रॅनसमवेयर व्हायरस'चा. तुमच्या कॉम्पुटरमध्ये घुसून संपूर्ण फाइल्सवर ताबा मिळवायचा आणि तुमच्याकडून खंडणीची मागणी करायची. असे या हल्ल्याचे उद्दिष्ट होते. 'वॉनाक्राय' नावाच्या रॅनसमवेयरने अनेक देशामध्ये सर्वरवर ताबा मिळवला होता. याचा प्रभाव भारतात जास्त काही जाणवला नाही. परंतु रसिया, जर्मनी, फ्रांस यांसारख्या देशामध्ये याचा परिणाम जाणवला. तिथल्या रेल्वे प्रशासनावर, बँकांवर, वाहतूक व्यवस्थेवर आणि अन्य सरकारी प्रक्रियेवर याचा परिणाम जास्त पडला होता. रॅनसमवेयर हे नुकतेच अनुभवता आलेले उदाहरण आहे. एक्सकोड घोस्ट, युमी, मोबिसेज असे हल्ले सातत्याने कॉम्पुटर - इंटरनेट विश्वात होत असतात. काही मालवेअर्स इतके घातक असतात कि ते तुमचा महत्वाचा डेटा, पासवर्ड चोरू शकतात, करप्ट करू शकतात. काही व्हायरस तर तुम्ही दाबत असणारे प्रत्येक बटन ते ओळखतात आणि तुमच्या आर्थिक व्यवहाराचे प्रत्येक पासवर्ड त्यांना कळतात. 

       आज खेडोपाड्यात कॉम्पुटर पोहचला आहे. मोबाईल, इंटरनेट पोहचले आहे. मुले डिजिटल साक्षर करण्यासाठी, भारतीय सरकार शाळांना, महाविद्यालयांना, पालकांना प्रेरित करीत आहे. नवीन पिढी घडत असताना ती मुलभूत शिक्षणाबरोबर तंत्रज्ञान शिक्षणही घेत आहे, खरे तर सरकारने प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते उघण्यास प्रोत्साहित केले. परंतु त्याबराबारचे व्यवहार कसे सुरक्षित राहतील याकडेही भर द्यायला हवा. सायबर विश्वात धोक्याच्या चाहुली काय असतात याचा पूर्णतः प्रसार आणि प्रचार कमी पडत असताना दिसत आहे. डीएनए आणि नॅशनल सॅम्पल सर्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार ४७ करोड भारतीय इंटरनेट वापरतात परंतु इंटरनेट वापरणाऱ्यापैकी केवळ १२% च भारतीयांना इ-मेल कसा पाठवायचा हे त्यांना माहिती आहे. १४% भारतीयांना टेक्स्ट फाईल कशी बनायची हे माहिती आहे. पूर्णतः भारताचा विचार करता ९१% लोक कॉम्पुटर लिटरसी (संगणक साक्षरता)पासून वंचित आहेत. हे चित्र खरे तर असे आहे कि एखाद्या देशातील शाळा किंवा शाळेत जाणाऱ्यांची संख्या तर खूप आहे परंतु त्या लोकांना आपल नाव कसं लिहितात हे माहिती नाही. ही खरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. याबरोबरच पूर्ण भारतातील खेडोपाड्यांना जोडण्यासाठी मजबूत हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चरचीही गरज भासणार आहे.  
   
        देशात रॅनसमवेयरसारखे हल्ले पुन्हा कधीही होऊ शकतात. याआधीही भारताने असे अनेक हल्ले अनुभवले आहेत जसे की सरकारी वेबसाईट्स हॅक होणे, काही राजकीय पक्षांच्या, विद्यापीठांच्या वेबसाईट्स हॅक होणे, क्रिडीट-डेबिट कार्डचे पासवर्ड चोरीला जाणे इ. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणे म्हणजेच त्या देशाच्या सर्व व्यवस्था ढासळून पाडणे. आणि हे भारतासाठीच नव्हे तर जगासाठी ही तिसऱ्या महायुद्धाची चेतावनीच समजावी लागेल. न कोणी सैनिक, न समोर कोणी शत्रू, न रणभूमी तरीही आक्रमणे होत राहणार. आपण जितके तंत्रज्ञानाकडे वळू आपल्याला तितकेच दक्ष राहावे लागणार आहे. डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पायरेटेड सोफ्टवेअर न वापरणे, वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करणे, युजर आय-डी आणि पासवर्ड कधीही कोणाला न सांगणे, फेक इ-मेल्सला बळी न पडणे, आपल्या वैयक्तिक कॉम्पुटरसाठी, मोबाईलसाठी एन्टीव्हायरस वापरणे याच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी सरकारने पहिले सरसावले पाहिजे. हॅकिंगसाठी फेक इ-मेलचा वापर भयंकर वाढला आहे, ओळखीच्या नावाचा वापर करून काही आकर्षक लिंक्स पाठवल्या जातात आणि डमी वेबसाईटवर लॉगीन करायला भाग पाडून युजर आय-डी आणि पासवर्ड चोरले जातात. मोबाईल क्लोनिंग हा एक भयंकर प्रकार पुढे येत आहे, यात तुमचा मोबाईल नंबर क्लोन केला जातो. तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व मेसेज, कॉल हे हॅकर्सकडे वळवले जातात आणि तुम्हाला येणारा बँकेचा ओटीपी किंवा अक्सेस कोड चोरीला जाऊ शकतो. आणि तुम्हाला माहित न पडता तुमच्या खात्यावरून आर्थिक व्यवहार होऊ शकतात. सर्व कॉम्पुटरधारकांनी, इंटरनेट धारकांनी याची काळजी घ्यायला हवी. कारण वॉनाक्राय, अर्व्हिलाच, बूटनेट, रॅनसमवेयर अड्व्हायजरी, कोअर बूट,  डोर्कबूट अशा काही हल्ल्यांचा अजूनही धोका आहे. डिजिटल इंडियाकडे जात असताना दिवसेंदिवस कॉम्पुटर आणि प्रोग्राम्मिंगद्वारे चालणाऱ्या यंत्राचा वापर वाढत आहे. असा हल्ला पुन्हा झाला तर काय होईल, कल्पना करा. अन्यथा गुन्हेगारी प्रवृतीचे लोक किंवा त्यापुढे दहशतवादाच्या हाती हे अस्त्र पडले तर कोणकोणत्या देशावर असे हल्ले होतील? शिवाय पाकिस्तानातील दहशतवादी संघटन किंबहुना तिथले सरकारही भारतावर सायबर हल्ल्याची खसखस पिकवूनच असते. इंटरनेट हे सर्व जगाला जोडणारे माध्यम असल्याने, सायबरसाठी संपूर्ण जगाला गृहीत धरून अंतरराष्ट्रीय पातळीवर कडक कायदा करायला हवा. पर्यायाने प्रत्येक देशाने, राज्यानेही आपल्या तपास यंत्रणा आणि आपले सायबर कायदे आणखी कडक केले पाहिजेत. आपल्याला फक्त डिजिटल इंडिया साकारून चालणार नाही, तर सुरक्षित डिजिटल इंडिया साकारावा लागेल. तेव्हा आव्हाने तर मोठी असणार आहेत आणि तयारीसाठी आम्हा भारतीयांकडे आणि सरकारकडे पुरेसा वेळही नाही.

        सरकारने ई-साईन, आधार, फिंगर-प्रिंट पासवर्ड, ई. याच्या सहाय्याने सुरक्षितता मजबूत केली आहे. आपल्याला फक्त डिजिटल इंडिया साकारून चालणार नाही, तर 'सीक्युअर्ड डिजिटल इंडिया' साकारावा लागणार आहे.

Published in Dainik Pudhari (in Bahaar supplement) on 17June 18.