Search in Google

Saturday, May 5, 2018

एक श्रीमंत माय...

       दिवस मावळतीकड झुकला होता, चहाचा कप घेऊन मी गच्चीवर गेलो, वरती पोहचताच एक मोठा श्वास घेत सगळीकड नजर फिरली. एका बाजूला विठ्ठल साखर कारखान्याची चिमणी बकाबका धूर सोडत होती, सरकारांच्या पडीक रानातल्या लहान-मोठ्या बाभळीन्नी तोंड वर काढली होती, सूर्य त्यामाग दडण्याचा जणू अट्टहास करत होता, गावाकडच्या बाजूला विठ्ठल मंदिराच्या कळसाची अस्पष्ट ओळख दिसत होती, त्याबरोबरच भजनाच्या टाळ- मृदूंगाचाही आवाज कानी पडत होता. आमच्या रानाकड नजर फिरली, ऊसाने नुकताच तुरा टाकलेला दिसत होता. नदीकडच्या बाजूनं बगळ्याचे थवे परतताना दिसले.  शेवटी लालसर झालेल्या आभाळावर नजर स्थिरावली, पांढरे, काळे, लाल, निळे अशा वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे आकार दिसत होते, नजर जरा स्थिरावली..,  अडकल्यासारखी झाली.

      "आरे...! जरा माग सरून बस..!" असा एक जवळीकता साधणारा आवाज काणी पडला. क्षणभर वाटले, आईने आवाज दिला असावा अशी त्यातही आपुलकी दडली होती. आभाळाकड पाहिलं, एक निरागस चेहरा माझ्याशी बोलू पाहतोय.. नकळत मी दोन पावलं मागं गेलो, थोडं दचकल्यासारखं झालं.  "तुला माझ्याबद्दल सारखं एक कोडं पडतं कि मला जन्म कोणी दिला ? मी अजून किती मोठा आहे ? मी हे विश्व व्यापले आहे कि विश्वाने मला व्यापले आहे? मला आकार-उकार कोणी दिला? " आणि त्याला जणू या सर्व गुढाचं विश्लेषण करायचं होत, परंतु त्याने ते हसून टाळलं. तो का हसतोय असा विचार करेपर्यंत त्याने पुढे बोलायला सुरवात केली.  "प्रत्येकजण मझ्याकड वेगळ्या भावनेने बघतोय, गड्या..., तू जर उद्या प्रियकर झाला, तर चांदणी चंद्रासोबत काय अल्लड चेष्टा करत बाजूला जणू नृत्य करत असते, हे  तूही पाहशील जसे कि आज तू असे बहुत प्रश्न डोक्यात धरून पाहतोय! कोण मला दूरदर्शी भिंगातून बघून सिद्धतांचे उलगडे करण्यात रमला आहे तर... तर कुणी रानांत डुलणारं पिक पाहून जरा आनंदाने न्हाहत आहे, कुण्या भागात माझ्यामुळं डोळ्यात अश्रूही आहेत." येवढ ऐकताच क्षणातच त्यानं रंग बदलला लालसरचा जरासा काळसर झाला.

       "कदाचित माझ्यामुळही महाराष्ट्राचे दोन तुकडे होण्याची वेळ आली आहे, असं काहीस मलाही वाटतं, माझं अन मान्सूनच तिकडं काही पटलच नाही बघ, माझ्या हातात तर काही नाही, गड्या! मला सूर्यकिरण, समुद्र  अन वाऱ्यान साथ दिली, तर पाहिजे खरं! जेव्हा विदर्भातला शेतकरी डोळ्यावर हात धरून वरती पाहत असतो,  तेव्हा मदतीसाठी पुढं जाणारे माझे हात कुणीतरी धरून ठेवतंय असं वाटतं, याचमूळ आज आत्महत्येची वेळ आलीय यात मला दोषी धरलं जातं. माझ्याकडं इंद्रधनुष्याच्या निम्मित्तान पाहणारे लोक इंद्रधनुष्याच्या वेगवेगळ्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या विचाराचे आहेत रे!" त्याचा कंठ दाटून आला होता, काळसर झालेल्या चेहऱ्याकडं पाहून आता पाऊसाला सुरुवात होईल असं वाटलं. जरा वेळ त्याने डोळे मिटले आणि माझ्या कपाळावर पाण्याचे दोन थेंब पडले.  आपल्याला तळमळीनं सांगणारा व्यक्ती आपल्या जवळचाच असतो, असा विचार माझ्या मनात खेळतो तोच त्याने पुढे बोलायला सुरुवात केली  "रात्रीच्या वेळी चिमुकली मंडळी जेव्हा चांदोमामा, चांदोमामा भागलास का ? म्हणून गात असतात त्यांच्याकड पाहून मलाही वाटत, कि ते गोंडस बालपण मलाही अनुभवता यावं, माझ्याही चेहऱ्यावर तो बालिश आनंद असावा, पण जेव्हा रात्रीच्या वेळी अनाथ मंडळी चांदण्यामध्ये आपले आई-बाबा शोधतात तेव्हा  मला आठवते ती आगळीवेगळी माय.. सिंधुमाई... धन्य ती माऊली, धन्य तिचं कार्य. जेव्हा ती माऊली बोलत असते, केवळ ऐकत रहावसं वाटतं. भारताची संस्कृती मूळतः स्त्रीप्रधानच होती. नंतर वैदिक परंपरामुळे स्त्रीला कायमच दुय्यम स्थान दिलं गेलं. आणि त्यामुळेच अशा उद्रेकातून अशा क्रांतिकारी स्त्रिया जन्म घेत गेल्या. पुरुषप्रधान संस्कृतीने या माउलीला कायमच एक चिंधी म्हणून हिणवलं. चिंधीचे अल्पवयात लग्न झालं. या चिंधीची ही माऊली सौ. चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नाच्या वेळी माईचे वय होते केवळ अकरा वर्ष आणि नव-याचे वय तीस वर्ष. घरी खूप सासुरवास आणि मेहनतही करावी लागत असे. खूप यातना भोगल्या आहेत त्या माऊलीने."
हे सर्व सांगताना तो आपल्याच आईबद्द्ल सांगत होता, असे काहीसे भासत होते.

         मी मन लावून ऐकत होतो. त्याने तसेच पुढे बोलणे चालू ठेवले. "अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील खूप मोठा संघर्ष केला. तेव्हा गुरं  राखणे हा त्यांचा व्यवसाय होता. गुरं ही शेकडो असायची त्यांचे शेण-घाण काढता काढता कंबरठे मोडायचे. लेकुरवाळ्या स्त्रीसाठी मोठे कष्टाचे काम. स्त्रिया शेण काढून अर्धमेल्या होऊन जात. पण त्यासाठी माईना कसलीही मजुरी मिळत नसे, म्हणून माईंनी बंड पुकारला. माई हा लढाई जिंकल्या पण या लढ्याची किंमत त्यांना मोजावी लागली. बाईच्या या धाडसामूळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. कारण त्याला जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली होती आणि गावक-यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले होते. याचा काटा काढण्यासाठी, माईच्या पोटातील मूल आपलच असल्याचा खोटा प्रचार दमडाजीने सुरु केला. यामुळे माईंचे पती श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले कारण माईंना गोठ्यातल्या गाईनी तुडवून मारावे. त्या अवस्थेत त्यांना मुलगी जन्माला आली. पतीने हकल्यानंतर गावक-यांनीही त्यांना गावातूनही हाकलून दिले. माराने जखमी झालेल्या माई माहेरी आल्या पण त्यांच्या सख्या आईनेही पाठ फिरवली."

         "पोट भरण्यासाठी भिक मागणे हा एकमात्र पर्याय उरला. परभणी-नांदेड-मनमाड स्टेशनवर त्या भीक मागत असत व स्टेशनवरच झोपत असत. स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईंनी स्मशान गाठले. त्या स्मशानात राहू लागल्या. कारण त्यांना स्मशानच सर्वात सुरक्षित वाटत असत कारण भुताच्या भीतीने तिथं कुणी येत नसे. ती माय जनावरात वाचली आणि भूतात राहिली असे म्हणायला हरकत नाही. पण पोटातल्या भुकेच काय? भूक तर रोजच लागते. असाच एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघून गेले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे चालू लागल्या एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले. माईंनी मडक्यात पीठ कालवले, चितेवरच्या निखा-यावर भाजले आणि कडक भाकरी केली व तशीच खाल्ली. असाच एक दिवस. एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले त्यांना भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते."
बोलता बोलता तो मध्येच जरा शांत बसायचा. त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. मी त्याच्या चेहऱ्याकडंच बघत ऐकत होतो.

    "आपण जे जगलो ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती, कारण आई ही शेवटी आई असते. निराश्रीतांच्या कल्याणासाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेट हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले कारण एका आईकडून स्वतःची मुलं आणि दान घेतलेली मुलं यात फरक होऊ नये. आणि ममता पुण्याच्या सेवासदन मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर माईंनी काय केल असते ? ज्या मुलांना माई सांभाळणार होते ती मुलं पाणी पिऊन झोपली असती , पण ममताला पाहून माईची माया जागृत झाली असती आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते. पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता म्हणून माईंनी मुलीला दगडूशेट गणपतीच्या पायाशी घातले. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पसाठी स्थान निश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनसाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवाशी लोकांची बाजू शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. माई अजून एक लढाई जिंकल्या. आजही अशा अनेक लढाया माई रोज लढतच असतात."


     आता त्याला शब्द फुटत नव्हता, कंठ दाटून आला होता. तरीही तो पुढे बोलू लागला. "आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल द-यात वसतीगृह सुरु केले. आज ब-याच अनाथ मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे. मोठ्या होत आहेत.  दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत हजारो त्यांची मुले आहेत. लेकीच्या मुलींचे आडनाव साठे तर मुलांचा नाव सपकाळ असते. बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत. हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. ममताने ही एम.एस.डब्लू. केले आहे. ती आता माईचे काम पाहते. माईना आजवर १७२ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहे. त्या म्हणतात पुरस्काराने पोट नाही भरत, माझा संघर्ष जगण्याशी आहे. जणू मीही सुरेश भट, बहिणाबाई, विं. दा., सावित्रीबाई फुले यांचच जीवन जगत आहे.  माईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. कारण मी पाहिलेल्या माईंमध्ये हीच सर्वात श्रीमंत माय होती, कारण ही अनाथांची माय होती." हे शब्द पूर्ण होता न होताच आकाशातून पाउसाला सुरुवात झाली , गडगडाट झाला, जणू त्याने एक हुंदका देऊन डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करून  दिली. तोच खालून आवाज आला, "गणू, वैरण गोठ्यात टाक अन गाई आत बांध...!"  गाई गोठ्यात बांधायला मी धावणार तोच हातातला चहा पाहीला, तो कधी थंड झाला याचे भानही राहिले नव्हते, मी जीना उतरून हंबरडा फोडणाऱ्या वासराकडे धाव घेतली ज्याची आई काही दिवसापूर्वीच त्याला सोडून गेली होती.

Published as 'Sindhumaaichee Naarishakti' in Saptahik Pandhari Vaarta (17 October 2018) on the occasion of Navratri.

Published in Masik Adhunik Sarthi, Solapur. on the occasion of International Women's day (8 March 2018)