Search in Google

Thursday, October 31, 2019

दि पॉवरफूल गेम... - The Powerful Game ...



‘सामान्यांची फसवणूक करून दिलेला शब्द न पाळणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही. मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. मी म्हातारा तर मुळीच नाही. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही, मला अजून बऱ्याच जणांना घरी पाठवायचे आहे !’ प्रचार सभेत असे रोखठोक उत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले होते.

२०१९ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांकडून केवळ शरद पवारांनाच टार्गेट करण्यात येत होतं. जेव्हा जेव्हा मोदी-शहा प्रचारासाठी महाराष्ट्रात आले, शरद पवारांना टार्गेट केल्याशिवाय गेले नाहीत. जसे कि जे झाड लोकांना गोड आणि भरपूर फळे देते त्यालाच लोक जास्त दगडं मारतात. कारण महाराष्ट्रातून भाजप हटवण्याची जिद्द त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणांतून बोलून दाखवली होती.

डबघाईला आलेल्या काँग्रेसचं राज्यात अस्तित्व उरणार का? यावरही प्रश्नचिन्ह होतं. महायुतीचा आत्मविश्वास वाढत होता. मीडियानेही भाजप सत्तेत येणार अशा एक्झिट पोल्सच्या माध्यमातून धुमाकूळ घातला.  भाजपाचा आत्मविश्वास राज्यात पुन्हा महायुती २२० पार जाणार असं सांगत होता. सर्वांना लोकसभेच्या निवडणुकांसारखेच चित्र दिसत होते.  इतकचं नाही तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले  सातारचे खासदार उदयनराजे भोसले हेदेखील पक्षाला रामराम करत भाजपात गेले. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. मात्र ८० वर्षाचे शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात मागे हटायला तयार नव्हते. यातूनच पवारांकडे अनेक तरुणवर्ग आकर्षित झाला. संघर्षाची लढाई शरद पवारांनी जिद्दीने लढून राज्यात एक करिष्मा घडविला. विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागा मिळाल्या.  अशा वातावरणात ५४ आकडा खूप मोठा ठरतो.  मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा विरोधी पक्षांना मिळतील असा विश्वास एकाही राजकीय विश्लेषकाला नव्हता. मात्र शरद पवार यांनी हा चमत्कार करुन दाखवला. काँग्रेस पक्षालाही त्यांनी संजीवनी दिली .

निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात तणाव वाढला. महायुतीचे बहुमत सिद्द होत नव्हते. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ही शिवसेना अडून राहिली होती. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ही शिवसेनेची आग्रही मागणी भाजपाने फेटाळून लावली त्यामुळे या सत्तासंघर्षात शिवसेना-भाजपाचं आमचं ठरलंयपासून आमचं बिनसलंय असचं चित्र निर्माण झालं. भाजपला शिवशेनेशिवाय पर्याय नव्हता. भाजपाच्या घटलेल्या जागा पाहून शिवसेनेनेही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.  निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत इतर पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले. दबावाचा भाग म्हणून संजय राऊतांनी अनेकदा शरद पवारांची भेटदेखील घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनेही आपला पॉवर गेम खेळला. भाजपाला गोंदळात टाकण्यासाठी शरद पवारांनी आम्हाला जनतेने विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला आहे असं सांगत राहिले. मात्र भाजपाने सत्तास्थापनेस असमर्थता दाखविल्यानंतर अधिकृतरित्या शिवसेनेने आघाडीशी बोलणी सुरु केली. पटापट काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या बैठका चालू झाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होऊन २० वर्षे झाली आहेत, १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता परंतु १५ ही वर्षे राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्यास सहमती दर्शवत, महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली. आता शिवसेनेला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत येत आहे आणि यातून अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री तर  होणारच आहे याबरोबरच अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे समीकरण तयार होत आहे. अर्थातच राष्ट्रवादीच्या इतिहासात  पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील बारामतीतील काटेवाडी अशा  एका खेडेगवातून जन्माला आलेल्या शरद पवार या लोकनेत्याने आज देशातील सुज्ञ भारतीयांच्या मनात जिव्हाळा निर्माण केला आहे, हा जिव्हाळा विलक्षण आहे. आज शरद पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे.. किंबहुना देशाचंही! खरे तर, साहेबांनी अंतरराष्ट्रिय निवडणूकही लढवली आहे आणि साहेब ती निवडणूक जिंकलेही आहेत, ती निवडणूक म्हणजे 'इंटरनॅशनल क्रिकेट कॉउंसिल'ची!

आम्ही लहानपणापासून शरद पवार नाव ऐकतच मोठे झालो आहोत. शरद पवार हे केवळ नाव नसून एक पुरोगामी विचार आहे, हे आम्ही आज अगदी जवळून पाहत आहोत. आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना ही अभिमानाने सांगू की आम्ही एक शरद पवार नावाचा झंझावात पाहिला आहे. आम्ही साहेबांचा काळ पाहिला आहे... आम्ही राष्ट्रवादी नावाचे वादळ पाहिले आहे... यशवंतरावांनी तयार केलेला एक ऊर्जास्रोत आणि अनेक पैलवान घडवणारा वस्ताद पाहिला आहे.....