जिच्या यातनांना जगी तोड नाही
नात्याचे त्या नाव असे आई
आईएवढे कशालाच मोल नाही..
आईसाठी देवही कसे वेडेपिसे जाहले
आईच्या दुधासाठी देव, राम कृष्ण जाहले
आई हे पुस्तक कोणताही कवितासंग्रह नसून एक लेखसंग्रह आहे, परंतु या लेखांमध्ये येणाऱ्या अशा ओळी अंगावर काटा आणतात. लेखांमध्ये अनेक भावनिक प्रसंग आहेत. प्रत्येक लेखात आईची महती तर आहेच आणि पुस्तक वाचताना डोळे पाण्याने भरले नाही तरच नवल! प्रत्येक लेख वाचकाच्या काळजाला भिडतो. जो व्यक्ती आपल्या आईला सांभाळत नाही किंवा आईकडे दुर्लक्ष करतो, पुस्तक वाचून अशा अनेकांचे आईबद्दलचे मत परिवर्तन झाले आहे, असे अभिप्राय प्रकाशन संस्थेला आले आहेत. पुस्तक वाचताना मीही अक्षरशः रडलो.
एक महान दैवत, वात्सल्याचा अप्रतिम अविष्कार, थोर तुझे उपकार, स्वामी तिन्ही जगाचा, ज्याला नाही आय त्याला काय न्हाय, संस्कार करणारे देवाचे रूप... पुस्तकात असे अनेक एक से बढकर एक लेख आहेत. तसेच देशभक्ताच्या दृष्टीने पहात भारतमातेवर भाष्य करणारे, शेतकऱ्याची धरणीमातेबद्दलची भावना मांडणारे असे अनेक हृदयस्पर्शी लेख वाचताना वाचक भावनिक होतो.
साने गुरुजींचे 'शयामची आई' या पुस्तकाच्या तोडीचे हे पुस्तक आहे. कवितांच्या ओळींमुळे लेख अधिकच प्रभावशाली झाले आहेत. महाविद्यालयीन, शाळेतील विद्यार्थ्यांना निबंधलेखनासाठीच्या ज्ञानात भर घालण्याच्या हेतूने आणि अर्थात सर्वांनाच आवडेल असे लेखकाने आईविषयी भरभरून लिहिले आहे.
सत्ययुगाच्या अखेर झाली
प्रेम आणि द्वेषाची लढाई
द्वेष जाहला विजयी आणि
प्रेम लपे आईच्या हृदयी !!
पुस्तक : आई
लेखक : द. गो. शिर्के
प्रकाशक : चपराक प्रकाशन
किंमत : १०० /-
खरेदीसाठी लिंक : Click here..
संपर्क : 7057292092