Search in Google

Thursday, March 21, 2019

जेफ बेझॉस आणि अ‍ॅमेझॉन... भाग -१

अ‍ॅमेझॉन कंपनीचा संस्थापक असलेल्या जेफ बेझॉसचे बालपण खूप बिकट परिस्थितीचं आहे. अमेरिकेत न्यू मेक्सिको राज्यात अलबुकुरेक गावात जेफ बेझॉसचा जन्म झाला. जन्माच्या दाखल्यामध्ये त्याचं नाव जेफ्री प्रेस्टन जॉर्गनसेन असं नोंदवलं गेलं. त्याच्या आईचं नाव जॅकलिन गिज जॉर्गनसेन होतं. लोक तिला जॅकी असेही म्हणत.  ती बँकेत नोकरीला होती. ती सतरा वर्षाची असताना तिनं जेफ बेझॉसला जन्म दिला. तो अठरा महिन्याचा होताच जेफच्या वडिलांनी तिला घटस्फोट दिला आणि ते घर सोडून निघून गेले. पुढे  त्यांच्याविषयी जेफला कधीच काही समजलं नाही, असं तो आजही सांगतो. मग या जेफ जॉर्गनसेनचा  जेफ बेझॉस कसा? प्रथम आपण हे जाणून घेऊया.  

१९५९ साली क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रोचा उठाव चालू होता. त्यामुळे तिथं खूप गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रत्येकाला पालकांना आपल्या मुलाची काळजी असते, त्यांच्या शिक्षणाची काळजी असते. म्हणून तिथल्या बऱ्याच क्युबन नागरिकांनी आपल्या अमेरिकेत स्थलांतरण करण्याचे ठरवले होते. क्युबन ख्रिस्ती सेवकांनी त्यातच एक बेझॉस नावाच्या मुलाला अमेरिकेत आलं होतं. मिगेल उर्फ माईक नावाचा १५ वर्षाचा मुलगा होता. माईक बेझॉसने अमेरिकेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा तो अतिशय गरिबीचं जीवन जगत होता.  डेलावेअर राज्यात एका अनाथ आश्रमात तो राहत होता. तेव्हा त्याला फक्त स्पॅनिश भाषा येत होती. हळूहळू त्यानं इंग्लिश भाषेवर प्रभूत्व मिळवलं. त्यानं आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण करून इंजिनीरिंगला प्रवेश घेतला. शिक्षण घेत असतना तो तिथल्या एका बँकेत नोकरीही करू लागला. त्याच बँकेत माईकची भेट जॅकी जोगनबर्गशी झाली. पुढे माईक बेझॉस आणि जॅकी जोगनबर्ग यांच्यात मैत्री वाढत गेली. जेफ चार वर्षाचा असताना माईकने जॅकीशी लग्न केलं. माईकने लग्नाआधी जन्मलेल्या जेफचा आनंदाने स्वीकार केला. त्याला स्वतःच आडनाव दिलं आणि  जेफ जोगनबर्गचा जेफ बेझॉस झाला. 

पुढे जॅकी आणि माईकला अजून दोन मुले झाली, ख्रिस्तीयाना आणि मार्क. आपले खरे वडील कोण हे जेफला खूप उशिरा, जवळपास वयाच्या  दहाव्या वर्षी समजलं. 

इंजिनीरिंग पूर्ण झाल्यानंतर माईकला एका तेलाच्या कंपनीत नोकरी मिळाली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागलं. आपल्या कुटुंबाला घेऊन ते ठिकठिकाणी स्तलांतरित होत असत आणि त्यातूनच जेफला बरेच अनुभव मिळत गेले.  जेफ बेझॉस आपल्या आजोबांकडे म्हणजेच आईच्या वडिलांकडे टेक्ससमधील कॉटुला गावात राहू लागला. त्याला तिथला निसर्गरम्य परिसर खूप आवडत असे. जेफचे आजोबा रॉकेटच्या संदर्भातलं संशोधन करत होते. त्यांनी 'डिफेन्स ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजेन्सी' या संस्थेत इंटरनेटसंबधीही काम पाहिलं होतं आणि काही दिवस ते अमेरिकेतील अणूऊर्जा खात्यातील पश्चिम विभागाचे प्रमुख होते. त्यांची खूप शेतीही होती.  निश्चितच, या सर्व गोष्टींतून जेफ भरपूर अनुभव मिळत गेला. निसर्गरम्य भागात जेफ गाई-गुरांची निगा राखणं, आणि शेतीतली बरीच कामं करत असत.    

शेतीची कामं करण्याबरोबरच तो तिथं स्वावलंबी झाला. आजोबांकडून त्याला खूप काही शिकायला मिळालं. तो त्यांना  विज्ञानातील गोष्टीबद्दल प्रश्न विचारत असे. पुस्तकं वाचत असे. तसंच कुठलाही प्रश्न पुढं आला कि गडबडून न जाता तो हिम्मतीने सोडवायची जिद्द त्याला यातूनच मिळत गेली, कारण त्याचे आजोबा  खंभीर स्वभावाचे होते, त्यांच्याकडूनच हे सगळे गुण आल्याचं जेफ आजही सांगतो.  लहान असताना जेफ वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असे. शाळेत वाचन-लेखानाच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेसाठी त्याने तब्बल जवळजवळ ३० पुस्तकं वाचली,  तरीही त्या स्पर्धेत तो विजयी झाला नाही. जेफच्या शाळेत मेनफ्रेम संगणक नेटवर्कमध्ये जोडलेली अनेक टर्मिनल्स होती. अर्थात टर्मिनल्स म्हणजे संगणक नाही. टर्मिनल्स काम फक्त संगणकाचे प्रॉग्रॅम संबधी माहिती देणे होय. ही टर्मिनल्स कशी जोडली गेलेली आहेत, याबद्दल शाळेतल्या कोणाही माहिती नव्हती. जेफने आणि त्याच्या काही मित्रांनी बरीच खटपट करून आणि माहितीपुस्तिकेतून याबद्दलची माहिती मिळवली.  त्यामुळं त्यांना टर्मिनल्सवर बसून मेनफ्रेमचा संगणक चालवता येऊ लागला. संगणकावर तो आणि त्याचे मित्र गेम खेळत असत. हे होत असतानादेखील त्यानं वाचनापासून स्वतःला दूर नेलं नाही. दिवसेंदिवस त्याचं वाचन वाढतच होत.   

जेफला विज्ञानकथा वाचायला खूप आवडायच्या. आयझॅक असिमाव्ह या लेखकाच्या विज्ञानकथा बरोबरच थॉमस एडिसन, वॉल्ट डिजनी आणि इतर शास्त्रज्ञांची चरित्र तो मन लावून वाचत असे. नकळत बेझॉसला  यातूनच खूप प्रेरणा भेटत गेली.  हे सगळं होत असताना तो इतर मित्रांप्रमाणे मित्रसमूहात मिळून मिसळून राहत नसे. त्याऐवजी त्याला वेगवेगळं वाचन करणं, लिखाणं करणं, वेगवेगळ्या विचारात गर्क राहणं, नवीन उद्योगधंद्यांच्या कल्पना करणं हे सारं त्याला खुप आवडत होतं. त्याच्या या स्वभावामुळं पुढं त्याच्या आयुष्यात अडचणी येतील असं त्याच्या आई-वडिलांना वाटत असे. त्याला यातून थोडस वेगळेपण मिळण्यासाठी आई-वडिलींनी त्याला एका फुटबॉल शिबिरात घालायचं ठरवलं. तो तिथंही चमकदार कामगिरी दाखवत संघाचा कर्णधार बनला.  पुढे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर जेफने मॅकडोनाल्डमध्ये बटाट्याचे वेपर्स तळण्याचे काम केलं. याच काळात त्याची ओळख उर्सुला उर्फ उर्सी  हिच्याशी झाली. उर्सुला ही जेफच्या पुढच्या वर्गात शिकत होती. पुढे दोघांनी मिळून शिकवणीसारखा उद्योग चालू केला. 

ड्रीम इन्स्टिट्युट असे त्यांच्या क्लासचे नाव होते, खरे तर हे उन्हाळी वर्ग होते. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ते १५० डॉलर्स शुल्क आकारत होते. या क्लासला चांगलेच यश मिळू लागले. बातम्या वर्तमानपत्रात झळकू लागल्या. उर्सुला आणि जेफमध्ये मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. पुढे ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेल्यामुळे हे प्रकरण थांबलं. अंतराळवीर बनण्याचे जेफचं स्वप्न होतं. त्यानं पुढील शिक्षणासाठी प्रिन्स्टनमध्ये प्रवेश केला. तो विज्ञान आणि गणित विषयात खूप हुशार होता. परंतु, शिक्षण घेत असताना 'क्वांटम मेकॅनिक्स' या विषयात त्याला अपयश आलं. त्यामुळं त्यानं प्रिन्स्टनसोडून कॉम्पुटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. कॉम्पुटर सायन्समधले सर्व  विषय जेफला आवडले. कॉम्पुटर कसा चालतो, प्रोग्रामिंग करणे अशा सर्व विचारामध्ये तो गर्ग असत. त्याने कॉम्पुटर सायन्स आणि इलेक्ट्रिक इंजिनेरिंगमध्ये पदवी मिळवली. १९८४ साली जेफच्या वडिलांची नॉर्वेला बदली झाली. तो उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी तिथंही गेला. तेलाच्या कंपनीत काम करणाऱ्या आपल्या वडिलांना हिशोबासाठी त्यानं एक कॉम्पुटर प्रोग्रॅम बनवून दिला. जेफने सिलिकॉन व्हॅलीमधल्या आईबीएम कंपनीमध्ये तात्पुरती नोकरी जॉईन केली.

जेफने आईबीएमची नोकरी सोडली आणि डी. ई. शॉ नामक नामक कंपनीमध्ये तो नोकरी करू लागला, तिथे पुस्तकांबद्दल जिव्हाळा असणाऱ्या जेफची भेट कादंबरीकार मॅकेन्झी टटल या तरुणीशी झाली. दोघांची मैत्री झाली. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९९३ मध्ये दोघांचं लग्न झालं. सध्या त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी अशी चार मुले आहेत.