इतर तंत्रज्ञान वापरणाऱ्या देशांच्या तुलनेत भारतात तसे ऍप्पलचे उत्पादने वापरणारे खूप कमी ग्राहक आहेत. कदाचित ही उत्पादने भारतीयांच्या दृष्टीने महाग आहेत, असेही यामागे कारण असेल. ऍप्पलचे मोबाईल - आई-फोन, आई-पॅड, आई-पॉड वापरणाऱ्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक प्रतिष्टीत व्यक्ती म्हणून असतो. हे मला अनुभवायला मिळाले आहे. काही दिवसांपासून हे प्रमाण वाढत आहे. ऍप्पलच्या उत्पादनांच्या बाबतीत भारत तसा दुर्लक्षित होता म्हणायला हरकत नाही. ५ ऑकटोबर २०११ रोजी स्टीव्ह जॉब्ज हा ऍप्पलच्या संस्थापकाचं निधन झालं, परंतु इतर देशाप्रमाणे भारतही आपल्या जवळचा कोणीतरी गेला असे भावना व्यक्त करत होता. कारण काहीसे तसेच होते, स्टीव्ह जॉब्जने तंत्रज्ञान क्षेत्रात केलेले आमूलाग्र बदल जगाकडून कधीही न विसण्याजोगे आहेत. जणू तो एक जादूगार होता! स्टीव्ह जॉब्जचा प्रवास तसा खूप संघर्षमय होता. ऍप्पल कंपनी स्थापन करण्यापासून ते आपली सर्व उत्पादने लोकप्रिय करण्यापर्यंत स्टीव्ह जॉब्जच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले. स्टीव्ह जॉब्जवर बरंच लिहिलं गेलं. त्यावर 'स्टीव्ह जॉब्ज' नावाचा सिनेमाही येऊन गेला.
१९७३मध्ये स्टीव्ह जॉब्ज अध्यात्माकडे झुकला होता, त्यासाठी तो भारतातही राहून गेला. अमेरिकेत जाऊन पुढे १९७५ च्या सुरुवातीला एका गॅरेज मध्ये स्टीव्ह जॉब्स आणि मित्र सिव्ह वॉझ यांनी ऍप्पलची स्थापना केली होती. त्यांचा कंपनीचा असे म्हणण्या पेक्षा त्यांचा पहिला कॉम्प्युटर म्हणजे ‘ऍप्पल १′ होय. या कॉम्प्युटरला बनवण्यासाठी जॉब्सने त्याची’ ‘फोक्सवॅगन’ बस १३०० अमेरिकन डॉलर्सला विकली. वॉझनंही त्याचा एचपी-३५ कॅलकुलेटर २०० डॉलर्सला विकला. असे त्यांचा कडे १५०० डॉलर्स होते. पण त्यातही जॉब्स याचा बसमध्ये बिघाड झाल्याने त्याला ५०० परत करावे लागले. मग त्यांच्याकडे १००० पेक्षा कमी डॉलर्स शिल्लक होते. १९७८ मध्ये नेशनल सेमीकंडक्टर कपंनीचे माइक स्कॉट यांना एप्पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भरती करण्यात आले.
त्याकाळी बाईट नावाचं काम्पुटर्स विकण्याचं एक दुकान होतं. त्या दुकांनाने स्टीव्हला ५० कॉम्प्युटर्सची ऑर्डर दिली आणि प्रत्येक कॉम्प्युटर मागे ५०० डॉलर्स ही देऊ केले. यामुळे कंपनीकडे थोडा पैसा आला. मग स्टीव्हने काही अनुभवी मंडळींना कंपनीत घेऊन कंपनी ला व्यवसायिक स्वरूप दिलं. कंपनी आता गॅरेज बाहेर येऊन मोठी होत होती. याच वेळी व्हिजिकॅल्क नावाचा एक स्प्रेडशीटचा प्रोग्रॅम फक्त ऍप्पलमध्येच चालत असे, त्यामुळे देखील ऍप्पलची विक्री खूप वाढली. १९८०च्या डिसेंबरमध्ये जेंव्हा कंपनी पब्लिक झाली, तेंव्हा जॉब्ज, वॉझ आणि मार्कुला नावाचा त्यांचा सहकाऱ्याकडे प्रत्येकी २३ कोटी डॉलर्स मालमत्ता आली होती. याचं त्यांना समाधान होतं.
पुढे मात्र ऍप्पल ३ लिसा आणि मॅकिंटॉस हे कॉम्प्युटर फ्लॉप झाले. या मुळे ऍप्पल कंपनीत अंतर्गत राजकारण सुरु झालं आणि डिरेक्टर बोर्डाने चक्क स्टिव्ह जॉब्स यालाच कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला गेला. जॉब्सने या गोष्टीपासून निराश न होता स्वतः ची नेक्स्ट नावाची कंपनी स्थापन केली. त्या कंपनीला देखील यशस्वी करून दाखवलं. या कंपनीमध्ये राहून स्टीव्हने 'इन्टर पर्सनल' कम्प्यूटर बनवला. पुन्हा ऍप्पल कंपनीने नमते घेत नेक्स्ट कॉम्पुटर्सला ४० कोटी डॉलर्सला विकत घेतले आणि स्टिव्हला परत कंपनीमध्ये बोलावलं आणि थोडयाच काळात स्टिव्ह जॉब्सच कंपनीचा अध्यक्ष बनला. हीच स्टीव्हची जिद्द प्रेरणादायी ठरते.
एवढं सर्व होत असताना ऍप्पलने कॉम्प्युटर विश्वात बलाढय कंपनी बनण्याची संधी मात्र गमावली होती. आज जेथे मायक्रोसॉफ्ट आहे तेथे ऍप्पल असू शकले असते पण असे झाले नाही. याला दोन प्रमुख कारणे आहेत, एक म्हणजे अंतर्गत राजकारण आणि दुसरे म्हणजे त्यांनी त्याचं सॉफ्टवेअर त्यांचा खेरीज इतरांना वापरुच दिले नाही. नेमके इथेच बिल गेट्सनी बाजी मारली आणि आय. टी. क्षेत्रात मायक्रोसॉफ्टच्या उत्पादनाचा खप वाढला.
मार्केटमध्ये मायक्रोसॉफ्टला शाह देत १९९५पासून "थिंक वेगंग" जाहिरात मोहिमेसह आणि आयमॅक, आयट्यून्स, आयट्यून्स स्टोअर, ऍपल स्टोअर, आयपॉड, आयफोन, एप-स्टोअर आणि आयपॅड या उत्पादनासह आघाडी घेतली. जी क्रांती आपण आजही बघत आहोत. २००३ मध्ये स्टीव्हला पॅनक्रियाटिक न्यूरोन्डोक्राइन ट्यूमर या आजाराचे निदान झाले आणि ५ ऑक्टोबर २०११ रोजी स्टिव्हची या आजाराशी झुंज अपयशी ठरली आणि स्टीव्ह जॉब्जचे निधन झाले, ऍप्पल मात्र इतर कंपन्यांशी स्पर्धा करत आजही जिवंत आहे.