Search in Google

Friday, November 23, 2018

करिअर - आर्टिफिशियल इंटीलिजन्समधील संधी

दिवसाबरोबर बदलत जाणाऱ्या जगाबरोबर आपण स्वतःला बदलले पाहिजे. जुना अभ्यासक्रम बाजूला सारून नवीन तंत्रज्ञान आत्मसात केला पाहिजे. आज विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात बरेच संशोधन होत आहे, हे आपल्याला ठावूक आहे. त्यातच आर्टिफिशियल इंटीलिजन्स हेही एक क्षेत्र आहे.  'आर्टिफिशियल इंटीलिजन्स' म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता.  अर्थात कसलाही मानवी हस्तक्षेप न करता संगणकाला, मोबाईलला किंबहुना एखाद्या मशीनला स्वत:चे नियोजन आणि समोर आलेल्या प्रश्नांची उकल करण्याची क्षमता उपलब्ध करून देणे म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्स होय. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असते अर्थात ती आज आपण अनेक सिनेमांमध्ये बघतही आहोत. आज सध्या ही संगणक अभ्यासक्रमामधील एक महत्त्वाची शाखा बनली आहे. 

संगणक आणि यांत्रिकी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेंस हा करिअर घडवण्याचा अजून एक उत्तम मार्ग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आता एक विशिष्ट मुख्यप्रवाह म्हणून संगणक, विज्ञान व अभियांत्रिकी उपशाखेमध्ये बदलली आहे. मशीन लर्निंग, प्रोसेस आटोमेशन संकल्पना वापरून  बुद्धिमान मानवाप्रमाणे विचार करण्याचे हे तंत्रज्ञान जोर घेत आहे. अशी अपेक्षा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील करियर ऑटोमेशनसारख्या भागात नवीन आयटी विकासाच्या केंद्रस्थानी असेल. यामुळे आज सिलिकॉन व्हॅलीमध्ये एक प्रकारची स्पर्धाच निर्माण झाली आहे आणि गुगल, फेसबूक, लिंक्डइन, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या दिग्गज आयटी कंपन्या आणि इतर बरेचजण 'करिअर इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स'साठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी भरभराटीला येणार आहे, यात शंका नाही.

सॉफ्टवेअर इंजिनीरिंगनंतर आईटीमध्ये  करिअर करण्यासाठी बरेच पर्याय असतात, त्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंस जर करिअरमार्ग निवडला तर त्यातही पुन्हा आपल्याला अनेक उपशाखा पाहाव्या लागतात. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मशीन लर्निंग, प्रोसेस अटोमेशन, कोग्निटीव्ह रोबोटिक्स असे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. यामध्ये रोबोटिक्स अटोमेशन इंजिनीअर, अल्गोरिदम स्पेशालीस्ट, रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम पाहावे लागते.  खाजगी कंपन्या, विमा कंपन्या, सार्वजनिक संस्था, शिक्षण, कला, आरोग्य सुविधा, सरकारी एजन्सी आणि लष्करी ई. या सर्व सेवामधले होताने करावे लागणारे काम कॉम्पुटर प्रोग्रामिंगद्वारे स्वयंचलित करून द्यावे लागते आहे . डेटा एन्ट्री, डेटा मेन्यूपुलेशन अशी कामे रोबोटद्वारे आटोमेट करावी लागतात. यामुळे कंपन्यांचा वेळ, पैसा, मनुष्यबळ वाचत आहे. त्यामुळेच कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसला प्राधान्य देत आहेत. डेटा एन्ट्री यांसारख्या नोकऱ्यांचे काम आता रोबोट करत आहे आणि त्यामुळेच डेटा ऑपरेटर, डेटा एन्ट्री अनॅलिस्ट अशा नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे असे जुने तंत्रज्ञान शिकून काही फायदा होणार नाही आणि हे अभ्यासक्रमातूनही बरखास्त होत आहे, त्यामुळेच आपण नेहमीच नवीन तंत्रज्ञानाकडे वळले पाहिजे. 

आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये करियर करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी इंजिनीरिंग पदवी आणि एखाद्या कॉम्पुटर प्रोग्रामिंग भाषा अशी मूलभूत तत्वे असणे आवश्यक आहे आणि रिसर्चसाठीचा तर्क, दार्शनिक आणि संज्ञानात्मक पायांबद्दल आपण दृढ असणे गरजेचे आहे. याच आधारवर बहुराष्ट्रीय कंपन्यांमधल्या मुलाखती असतात, या मुलाखतीतून पास होणे अनिवार्य असते.  आपल्याला या क्षेत्रात अनुभव असेल तर चांगले पॅकेज मिळते. काही दिवसापूर्वीच टी. सी. एस., कोग्नीजंट अशा कंपन्या या आर्टिफिशियल इंटेलिजेंसवरील अनुभवी लोकांना इतर कौशल्याच्या तुलनेत दुप्पट वेतन देण्याचे घोषित केले आहे. पुढील काही वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा जागतिक श्रमिक बाजारपेठेवर मूलभूत प्रभाव असेल, हे यावरून स्पष्ट होते. 

महाविद्यालयातून नुकतीच पदवी घेवून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी याचे ट्रेंनिंग पुणे, हैद्राबाद, बंगळूरू, चेन्नई, नोईडा अशा शहरांमध्ये खाजगी इन्स्टिटयूड मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये काम करण्यासाठी यु-आय पाथ, ब्ल्यू-प्रीजम, अटोमेशन एनीव्हेअर असे अनेक टूल आहेत. आपण याच्या ऑनलाईन परीक्षा पास होवून कौशल्यधारक बनू शकतो. यामधल्या काही परीक्षांसाठी शुल्क आकारण्यात आलेले आहे तर काही ऑनलाईन ट्रेनिंग मोफत आहे. आणि यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पकेजसह नोकरी मिळते.  आज आर्टिफिशियल इंटेलिजेंस कौशल्यधारकांची मागणी वाढत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील करियर हे एक वेगवान आणि आव्हानात्मक क्षेत्र जरी असले, तरी आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये दृश्यमान मार्ग तयार करत आहे त्यामुळेच हे तंत्रज्ञान अवगत असलेल्या नोकरदारांची मागणी वाढत आहे.

Published in Dainik Sakaal on 20-12-2018

Wednesday, November 7, 2018

भारतीय आईटी विश्व

दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास खऱ्या अर्थाने कॉम्पुटरच्या गरजेने जोर धरला. वेगवेगळ्या क्षेत्रात विस्कटलेली बरीच माहीती सुस्थीतीत ठेवण्याची गरज भासू लागली आणि यातूनच सॉफ्टवेअर या संकल्पनेने जन्म घेतला. अमेरिकेत हा उद्योग भरभराटीला येवू लागला आणि भारतात १९८५-९०च्या आसपास आईटी कंपन्या स्थापन होऊ लागल्या.  या दोन दशकात भारत आईटी विश्वात एक सुपर पॉवर म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. इतर कंपन्यांप्रमाणे भारतीय आईटी कंपन्यांनी शेअर मार्केट हदरवून सोडले. जागतिक बाजारपेठेत सॉफ्टवेअर निर्मितीचे काम उल्लेखनीय ठरले. खूप सारा रोजगार उपलब्ध झाला. भारतीय आईटी कंपन्यांचे ग्राहक जगभर आहेत, परंतु भारतीय कंपन्या अमेरिका, अरब अमीरात, यूरोपीयन  अशा कंपन्यांना ग्राहक म्हणून जास्त पसंती देतात. कारण होणारा फायदाही तसाच असतो. उलट आज तर दिवसेंदिवस भारतीय रूपया अमेरीकन डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. याचाच अर्थ म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था संकटात आहे. भारतीय प्रोजेक्ट्स भारतीय कंपन्यांना परवडणारे नसतात. त्रुटिहीन सॉफ्टवेअर बनवण्यासाठी, त्याच्या टेस्टिंगसाठी जास्त वेळ लागतो आणि जास्त वेळेत आणि कमी खर्चात  सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स परवडणारे नसतात. भारतीय कंपन्यांपैकी  मोजक्याच कंपन्या आपली पारंपरिक क्षेत्रातील ओळख घेवून उतरल्या, तसा पाठबळ म्हणून  त्यांचा उद्योगांचा ग्रुपच असतो. टाटा ग्रुपची टी. सी. एस. , महिंद्रा ग्रुपची टेकमहींद्रा, विप्रो ग्रुपची विप्रो सॉफ्टवेअर, इत्यादी.

परंतु ज्या उद्योजकांनी शुण्यातून सुरुवात करून सी. एम. एम. लेवल 5 पर्यंत मजल मारली आहे, अशा उद्योजकांचा आदर्श कायमच आमच्यासारख्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कारण के. पी. आई.टी., इंफोसिस, परसिटंट अशा कंपन्यांचा इतिहास कायमच आईटीतील नविन उद्योजकांना प्रेरणा देणारा ठरतो. भारतात तयार होणाऱ्या एकूण कॉम्पुटर इंजिनीअरपैकी निम्म्याहून अधिक इंजिनीअर्सला रोजगार वरती उल्लेख केलेल्या कंपन्याच मिळवून देतात. 

परंतु गूगल, फेसबुक, अमेजॉन, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट अशा जग व्यापनाऱ्या कंपन्या भारतात सुरु न होण्याची कारणेही आपण शोधली पाहिजेत. अशा प्रश्नांची उत्तरे शोधली तर कॉम्पुटर विश्वातले सर्व संशोधन परदेशातच झालेले आपल्याला दिसते. आजही आपल्याला ठावूक आहे की मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारे   40% कर्मचारी भारतीय आहेत. परंतु संशोधनात आणि जे काही झालेल्या संशोधनाला जगव्यापी व्यवसायात रूपांतरीत करण्यात आपण पिछाडीवर आहोत, असं आजची वस्तुस्थीतीच सांगत आहे. आईटी क्षेत्रातील व्यवसाय खूप संवेदनशील आहे किंबहुना तितकाच असुरक्षीतही हे प्रथमतः आपण लक्षात घेतले पाहीजे, असे असतानाही अमेरिकेत आईटी कंपन्यांनी जोर कसा धरला? याचे इथे एक उदाहरण देता येईल. अमेरिकेत स्टॅनफर्ड नावाचे एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं संशोधन करण्यासाठी, तसंच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योजक व्हावं यासाठी खूप प्रयत्न  केले जातात, याच दृष्टीने शिकवले जाते. त्यामुळे सिलिकॉन व्हॅली या माहिती तंत्रज्ञानाशी संबधित कंपन्यांमधल्या बऱ्याच कंपन्या काढणारे लोक हे स्टॅनफर्ड विद्यापीठातून बाहेर पडलेले आहेत.

असे संशोधक, उद्योजक बनवण्याचे प्रयत्न भारतीय शिक्षणपद्धती करते का ? आज किती भारतीय संशोधकांच्या प्रोग्रामिंग करण्यासाठीच्या कॉम्पुटर भाषा आहेत ? याचेही उत्तर बहुतांशी नकारार्थीच येते. भारतीय आईटी कंपन्या मुख्यत्वे सर्विस लेवल अर्थात सॉफ्टवेअरच्या सेवा पुरवण्याचे काम करतात. आई. बी. एम., मायक्रोसॉफ्ट, ऍपल  अशा कंपन्या सिस्टम लेवल काम करतात अर्थात तशा सेवाही पुरवतात. उदाहरणार्थ. ऑपरेटिंग सिस्टम, एम्बेडेड प्रोग्रामिंग ई. आणि हेच मिळलेलं व्यासपीठ वापरून सॉफ्टवेअर, मोबाईल ऍप बनवणे अशी कामे भारतीय उद्योजक करतात. हेही तसे अव्हानात्मक असते खरे परंतु सिस्टम लेवलचे सॉफ्टवेअर निर्माण करण्यासाखीच कठीण आव्हाने पेलली गेली तरच भारतीय उद्योजक जागतिक पातळीवर आपला ठसा उमठवेल. 

खरे तर, आईटी कंपन्या सर्विस म्हणजेच सेवा विकणारी किंवा प्रोडक्ट विकणारी अशा दोन प्रकारच्या असतात. किंवा सध्या काही कंपन्या सेवा आणि  प्रोडक्ट दोन्हीही पुरवणाऱ्या आहेत. भारतीय कंपन्यांनी आजपर्यंत सिस्टम पातळीचे प्रोडक्टची निर्मिती खूप कमी प्रमाणात केली आहे.  मागच्या काही महिन्यात टी. सी. एस. ही कंपनी 100 अब्ज डॉलर्स इतकी किंमत असलेली पहिली भारतीय कंपनी बनली. मात्र इतर छोट्या कंपन्याबाबत बोलायचे झाले तर, जेव्हा अशा छोट्या कंपन्या जागतिक मार्केटमध्ये भरारी घेवू पहात असतात तेव्हा मोठ्या कंपन्या अशा कंपन्यांना विकत घेतात.
मग त्या मोठ्या कंपन्या भारतीय  किंवा परदेशीही असू शकतात. परंतु एखादी भारतीय कंपनी एखाद्या परदेशी कंपनीमध्ये विलीन होत असते तेव्हा आपला एक भारतीय व्यवसाय पारदेशातच पाठवत असतो, याचाच अर्थ आपणच आपला एक भारतीय व्यवसाय मोठा होण्यापासून रोखत असतो असे म्हणता येईल. आईटी विश्वात भारतीय कर्मचाऱ्याबरोबर भारतीय संशोधकही निर्माण झाला पाहिजे आणि त्यातूनच व्यावसायिकदेखील. 

Published in Saptahik Chaprak - 12 Nov -18 Nov 2018.

Monday, November 5, 2018

झीडकारले मी कविता शिकवणाऱ्याला

सदाशिव पेठेतल्या
एका कवीकडं गेलो,
म्हणालो मीही अधीमधी
कविता लिहितो कधी कधी,
ते म्हणाले, चल वाचून तर दाखवशील
एखादी कविता तुझी..

मी एक चुरगाळलेला
कागद काढला खिशातून,
हरेक ओळ वाचू लागलो मग
थोडा ताल देवून,
ते म्हणाले, आरे इथं ऱ्हस्व आहे
आणि तिथं दीर्घ आहे,
मागच्या अंतऱ्यामध्ये होता आरे उकार पहिला,
अन या शब्दांत आहे दुसरा,
इथं पहिली वेलांटी अन तिथं दुसरी...
मी थोडा शांत जाहलो, चेहरा त्यांचा पाहू लागलो
अन पुन्हा मी कविता माझी वाचू लागलो..
सूर धरला धृवपदाचा अन एकेका कडव्याचा
मग पुन्हा ते महाशय म्हणाले..
आरे इथं उकार पहिला, या शब्दांत आहे दुसरा
तरीही हाताला त्यांच्या झटका
देत गप्प केले त्यांना...
अन मग गाठले मी पुढच्या कडव्याला..
एकेक कडवे सांगत होतो
धृवपदाने साद देत होतो
पुन्हा ते महाशय म्हणाले..
आरे इथं उकार पहिला, या शब्दांत आहे दुसरा
आता मात्र कहर झाला, सहनतेचा माझ्या अंत आला,
मग मी म्हणालो या कवितेसाठी
चळवळीतल्या विद्रोह्यांनी
पाठ थोपटली आहे माझी ,
आश्चर्य त्याच्या चेहऱ्यावरच मग मी पाहू लागलो ,
मी कवितेतल्या ओळी मग साऱ्या
तशाच त्यांना ऐकवू लागलो,
शेवट कवितेचा दणक्यात आता मी गावू लागलो,
असाच गड्या...
हादरा देणारा आशय सारा मांडून गेलो,
अन
सदाशीव पेठेत व्याकरणाला चुना मी लावून आलो...

- गणेश.