Search in Google

Thursday, October 31, 2019

दि पॉवरफूल गेम... - The Powerful Game ...



‘सामान्यांची फसवणूक करून दिलेला शब्द न पाळणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही. मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. मी म्हातारा तर मुळीच नाही. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही, मला अजून बऱ्याच जणांना घरी पाठवायचे आहे !’ प्रचार सभेत असे रोखठोक उत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले होते.

२०१९ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांकडून केवळ शरद पवारांनाच टार्गेट करण्यात येत होतं. जेव्हा जेव्हा मोदी-शहा प्रचारासाठी महाराष्ट्रात आले, शरद पवारांना टार्गेट केल्याशिवाय गेले नाहीत. जसे कि जे झाड लोकांना गोड आणि भरपूर फळे देते त्यालाच लोक जास्त दगडं मारतात. कारण महाराष्ट्रातून भाजप हटवण्याची जिद्द त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणांतून बोलून दाखवली होती.

डबघाईला आलेल्या काँग्रेसचं राज्यात अस्तित्व उरणार का? यावरही प्रश्नचिन्ह होतं. महायुतीचा आत्मविश्वास वाढत होता. मीडियानेही भाजप सत्तेत येणार अशा एक्झिट पोल्सच्या माध्यमातून धुमाकूळ घातला.  भाजपाचा आत्मविश्वास राज्यात पुन्हा महायुती २२० पार जाणार असं सांगत होता. सर्वांना लोकसभेच्या निवडणुकांसारखेच चित्र दिसत होते.  इतकचं नाही तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले  सातारचे खासदार उदयनराजे भोसले हेदेखील पक्षाला रामराम करत भाजपात गेले. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. मात्र ८० वर्षाचे शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात मागे हटायला तयार नव्हते. यातूनच पवारांकडे अनेक तरुणवर्ग आकर्षित झाला. संघर्षाची लढाई शरद पवारांनी जिद्दीने लढून राज्यात एक करिष्मा घडविला. विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागा मिळाल्या.  अशा वातावरणात ५४ आकडा खूप मोठा ठरतो.  मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा विरोधी पक्षांना मिळतील असा विश्वास एकाही राजकीय विश्लेषकाला नव्हता. मात्र शरद पवार यांनी हा चमत्कार करुन दाखवला. काँग्रेस पक्षालाही त्यांनी संजीवनी दिली .

निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात तणाव वाढला. महायुतीचे बहुमत सिद्द होत नव्हते. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ही शिवसेना अडून राहिली होती. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ही शिवसेनेची आग्रही मागणी भाजपाने फेटाळून लावली त्यामुळे या सत्तासंघर्षात शिवसेना-भाजपाचं आमचं ठरलंयपासून आमचं बिनसलंय असचं चित्र निर्माण झालं. भाजपला शिवशेनेशिवाय पर्याय नव्हता. भाजपाच्या घटलेल्या जागा पाहून शिवसेनेनेही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.  निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत इतर पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले. दबावाचा भाग म्हणून संजय राऊतांनी अनेकदा शरद पवारांची भेटदेखील घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनेही आपला पॉवर गेम खेळला. भाजपाला गोंदळात टाकण्यासाठी शरद पवारांनी आम्हाला जनतेने विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला आहे असं सांगत राहिले. मात्र भाजपाने सत्तास्थापनेस असमर्थता दाखविल्यानंतर अधिकृतरित्या शिवसेनेने आघाडीशी बोलणी सुरु केली. पटापट काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या बैठका चालू झाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होऊन २० वर्षे झाली आहेत, १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता परंतु १५ ही वर्षे राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्यास सहमती दर्शवत, महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली. आता शिवसेनेला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत येत आहे आणि यातून अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री तर  होणारच आहे याबरोबरच अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे समीकरण तयार होत आहे. अर्थातच राष्ट्रवादीच्या इतिहासात  पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील बारामतीतील काटेवाडी अशा  एका खेडेगवातून जन्माला आलेल्या शरद पवार या लोकनेत्याने आज देशातील सुज्ञ भारतीयांच्या मनात जिव्हाळा निर्माण केला आहे, हा जिव्हाळा विलक्षण आहे. आज शरद पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे.. किंबहुना देशाचंही! खरे तर, साहेबांनी अंतरराष्ट्रिय निवडणूकही लढवली आहे आणि साहेब ती निवडणूक जिंकलेही आहेत, ती निवडणूक म्हणजे 'इंटरनॅशनल क्रिकेट कॉउंसिल'ची!

आम्ही लहानपणापासून शरद पवार नाव ऐकतच मोठे झालो आहोत. शरद पवार हे केवळ नाव नसून एक पुरोगामी विचार आहे, हे आम्ही आज अगदी जवळून पाहत आहोत. आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना ही अभिमानाने सांगू की आम्ही एक शरद पवार नावाचा झंझावात पाहिला आहे. आम्ही साहेबांचा काळ पाहिला आहे... आम्ही राष्ट्रवादी नावाचे वादळ पाहिले आहे... यशवंतरावांनी तयार केलेला एक ऊर्जास्रोत आणि अनेक पैलवान घडवणारा वस्ताद पाहिला आहे..... 

आई - काळजाला भिडणारं पुस्तक - Book Review

जिच्यासारखे  कौतुके बोल नाही 
जिच्या यातनांना जगी तोड नाही 
नात्याचे त्या नाव असे आई 
आईएवढे कशालाच मोल नाही.. 

 
आईसाठी देवही कसे वेडेपिसे जाहले 
आईच्या दुधासाठी देव, राम कृष्ण जाहले       


आई हे पुस्तक कोणताही कवितासंग्रह नसून एक लेखसंग्रह आहे, परंतु या लेखांमध्ये येणाऱ्या अशा ओळी अंगावर काटा आणतात. लेखांमध्ये अनेक भावनिक प्रसंग आहेत.  प्रत्येक लेखात आईची महती तर आहेच आणि पुस्तक वाचताना डोळे पाण्याने भरले नाही तरच नवल! प्रत्येक लेख वाचकाच्या काळजाला भिडतो. जो व्यक्ती आपल्या आईला सांभाळत नाही किंवा आईकडे दुर्लक्ष करतो, पुस्तक वाचून अशा अनेकांचे आईबद्दलचे मत परिवर्तन झाले आहे, असे अभिप्राय प्रकाशन संस्थेला आले आहेत. पुस्तक वाचताना मीही अक्षरशः रडलो.  

एक महान दैवत, वात्सल्याचा अप्रतिम अविष्कार, थोर तुझे उपकार, स्वामी तिन्ही जगाचा, ज्याला नाही आय त्याला काय न्हाय, संस्कार करणारे देवाचे रूप...  पुस्तकात असे अनेक एक से बढकर एक लेख आहेत.  तसेच देशभक्ताच्या दृष्टीने पहात भारतमातेवर भाष्य करणारे, शेतकऱ्याची  धरणीमातेबद्दलची भावना मांडणारे असे अनेक हृदयस्पर्शी लेख वाचताना वाचक भावनिक होतो. 

साने गुरुजींचे 'शयामची आई' या पुस्तकाच्या तोडीचे हे पुस्तक आहे. कवितांच्या ओळींमुळे लेख अधिकच प्रभावशाली झाले आहेत. महाविद्यालयीन, शाळेतील विद्यार्थ्यांना निबंधलेखनासाठीच्या ज्ञानात भर घालण्याच्या हेतूने आणि अर्थात सर्वांनाच आवडेल असे लेखकाने आईविषयी भरभरून लिहिले आहे.    

सत्ययुगाच्या अखेर झाली 
प्रेम आणि द्वेषाची लढाई 
द्वेष जाहला विजयी आणि 
प्रेम लपे आईच्या हृदयी !!  

पुस्तक : आई 
लेखक  : द. गो. शिर्के 
प्रकाशक : चपराक प्रकाशन 
किंमत : १०० /-
खरेदीसाठी लिंक : Click here.. 
संपर्क : 7057292092   
 


Tuesday, October 22, 2019

यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन - पुस्तक समीक्षण - Best Time Management book




लेखक रवींद्र कामठे यांच्या ‘तारेवरची कसरत’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने मागच्या आठवड्यामध्ये जेष्ठ आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची भेट झाली. पहिल्या भेटीतच मी खूप भारावून गेलो. शेजवलकर सरांना अनेक जीवनगौरव पुरस्कार, साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार, व्यवस्थापन क्षेत्रातील पुरस्कार, अनेक फौंडेशनचे, बँकांचे पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. सर्वच क्षेत्रात सरांचे योगदान बहुमोल आहे. आज सरांचे वय ९२ वर्षे आहे, परंतु अनेक तरुणांना लाजवेल असे आजही त्यांचे कार्य आहे. खरं तर, आपल्या शब्दांतून डॉ. प्र. चिं. शेजळकर लिहिणे म्हणजे ओंजळीने हिमालय भिजवल्यासारखे आहे.

डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची भेट झाली तेव्हा त्यांचे ‘यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन’ हे पुस्तक हाती पडले.
घरी परतताच वाचायला सुरुवात केली. वाचताना शेजवलकर सर माझ्याशी जणू संवाद साधत आहेत असे काहीसे भासले. व्यवस्थापनामधील अनेक लहानमोठ्या गोष्टी या पुस्तकात अतिशय विस्तारित रूपाने  मांडल्या आहेत, बरोबरच सामान्य माणूस उद्योगधंद्यात का मागे पडतो आणि उद्योगधंद्यात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे, हे शेजवलकरांनी अतिशय सोप्या भाषेत मांडले आहे. यशस्वी व्यवस्थापनासाठी आपले मुलभूत विचार काय असायला हवेत? आपल्या जीवनात व्यवस्थापनेची महती कितपत योगदानाची आहे? खरे तर,  व्यवस्थापन हे कोणते विज्ञान किंवा तंत्रज्ञान नसून एक कौशल्य आहे, त्याला नियोजनाची आणि संयोजनाची जोड असावी लागते. आपल्या कार्याक्षतेच्या जोडीला नीटनीटकेपणा असायला हवा. आपल्या अपयशाला कधी आपले अपुरे ज्ञानही कारणीभूत असते, त्यासाठी अनुभवातून आलेल्या माहिती बरोबर इतर माहिती ज्ञात करून घेणे, हे या पातळीपर्यंत कि आपल्या कार्यासंबधी कोणताही प्रश्न विचारला असता तोंडून कधी ‘मला माहित नाही’ असे उत्तर यायला नको. पुस्तकात अशा गोष्टीवर सोप्या शब्दांत भाष्य केले आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच ढोंगीपणा, गाफिलपणा किंबहुना लाचारी किती पसरली आहे हे सांगितले आहे..

पगार वाढतोय, काम घोरतंय, थापेबाजीला ऊत येतोय..
अर्धवट शहाणपणापुढे जग मान तुकवतंय...
आत्मस्तुतीत गुरफटले आहेत अहंकारी बुद्धिवंत !
ढोंगीबाजी करतंय उथळ नेतृत्व,
निर्लज्ज करताहेत अतोनात उपद्व्याप...
अधिकारी झाले आहेत बहिरे, अनुयायी झाले आहेत ‘होयबारे’
बहुसंख्य बसले आहेत डोळ्यावर कातडे पांघरून
तज्ञ आहेत पण क्रियाशून्य !
येते संधी ... आणि जाते निघून....


या सर्व गोष्टींबरोबर वेळेचेही  महत्व या पुस्तकात पटवून दिले आहे. आपला वागणुकीतील शिष्टाचार, तारताम्यता, आपला आत्मविश्वास, सभोवतालचे वातावरण, आरोग्य, आहार  या गोष्टीवर देखील या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. ईच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काय करू शकतो हे उदाहरणासह स्पष्ट केले आहे, गाथा उद्योजकतेची वाचताना आपला आत्मविश्वास वाढला नाही, तरच नवल! दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील संभाषणापासून त्यांच्यात होणारा पैशाच्या व्यवहार कसा करावा याचेही छान वर्णन केले आहे. हाताखालच्या माणसांकडून कामे कशी करून घ्यावी? सुसंवाद कसा साधावा ? किंबहुना समोरच्या व्यक्तीचे लक्षपूर्वक कसे ऐकावे ? पैसा खर्च करण्याची कला कशी अवगत करावी ? मराठी माणूस उद्योगात मागे का ? पात्रता असूनही यश का मिळत नाही?  अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दडली आहेत. काही गोष्टी आपल्याला क्षुल्लक वाटत असतात परंतु आपल्या यशस्वी जीवनासाठी त्या खूप महत्वाच्या असतात. रागावण्याची वेळ आली कि आपली होणारी हतबलता आणि आपण  त्यावेळी काय केले पाहिजे कसे वागले पाहिजे ? शिस्तीची आधुनिक संकल्पनाही शेजळकरांनी अगदी सोप्या शब्दांत मांडली आहे.

यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपली चिकाटी, धडपड बरोबरच आपली दूरदृष्टीही महत्वाची असते. व्यवस्थापकीय प्रश्नांचा केंद्रबिंदू शेवटी आपण सर्व माणसेच असतो. आपले अनुभव, विचार करण्याचे कौशल्य, निर्णय कौशल्य या सर्व गोष्टी शिकणे... यश मिळवण्यासाठी गरजेच्या ठरतात. निर्णय घेता न येणे यासारखा दुसरा दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचे निर्णय घेतलेले अधिक बरे... कारण चुकीचे निर्णय घेणाऱ्या माणसांनीही जीवनात यश मिळवले आहे. परंतु जो निर्णय घेवू शकत नाही, ज्याचे मन नेहमी गोंधळात असते, असा मनुष्य कधीच यशस्वी झालेला आपण ऐकले नाही, अशा अनेक गोष्टींवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

माणसाने कसे असावे? कसे नसावे ? काटकसर कोठे करावी ? बोलताना, ऐकताना संयम राखावा, सहकाऱ्याला विश्वासात घेवून सहकाऱ्यांची चूक कशी लक्षात आणून द्यावी अशा अनेक गोष्टीवर शेजळकरांनी वाचकांशी संवाद साधला आहे.  कोणताही माणूस त्याच्या जीवनात किंवा व्यवसायात यशस्वी कसा होतो हे शोधणे थोडेसे कठीण जरी असले तरी त्यामागचे रहस्य माहिती करू घेणे गरजेचे असते. ‘Action speaks louder than words’  हे समीकरणही अगदी खरे आहे. मी ठामपणे सांगतो कि ज्याला यशस्वी होण्याकरता आपल्या जीवनाचे अचूक व्यवस्थापन करायचे असेल अशा प्रत्यकाने हे पुस्तक आवरजून वाचावे.



Thursday, October 10, 2019

शोधक - नवे पुस्तक

मला मनाला जरा वेगळं वाटलेलं कागदावर उतरवण्याची आवड मी शाळेत असल्यापासूनची. आज त्याला आणखी वेगळं रूप मिळालेलं आहे. मला वाटलंही नव्हतं कधी, ते पुस्तक रूपात अवतरेल म्हणून! पण हे शक्य होत आहे 'साहित्य चपराकमुळे'! 

चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी माझे काही लेख साप्ताहिकात आणि मासिकात प्रकशित केले आहेत आणि यामुळेच माझ्या लेखनाला हे एक भक्कम व्यसपीठ मिळालं. माझ्या काही कविता मी एकदा संपादकांना दाखवल्या. त्यांनी त्या वाचल्या आणि क्षणात सांगितले की आपण याचे पुस्तक करू शकतो आणि काही दिवसातच जन्म झाला विचारांनी जड असणाऱ्या या माझ्या शब्दाच्या गाठोड्याचा!!