Search in Google

Wednesday, January 30, 2019

स्टीव्ह जॉब्ज आणि ऍप्पल



इतर तंत्रज्ञान वापरणाऱ्या देशांच्या तुलनेत भारतात तसे ऍप्पलचे उत्पादने वापरणारे खूप कमी ग्राहक आहेत. कदाचित ही उत्पादने भारतीयांच्या दृष्टीने महाग आहेत, असेही यामागे कारण असेल. ऍप्पलचे मोबाईल - आई-फोन, आई-पॅड, आई-पॉड वापरणाऱ्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन  हा एक प्रतिष्टीत व्यक्ती म्हणून असतो. हे मला अनुभवायला मिळाले आहे. काही दिवसांपासून हे प्रमाण वाढत आहे. ऍप्पलच्या उत्पादनांच्या बाबतीत भारत तसा दुर्लक्षित होता म्हणायला हरकत नाही. ५ ऑकटोबर २०११ रोजी स्टीव्ह जॉब्ज हा ऍप्पलच्या संस्थापकाचं निधन झालं, परंतु इतर देशाप्रमाणे भारतही आपल्या जवळचा कोणीतरी गेला असे भावना व्यक्त करत होता. कारण काहीसे तसेच होते,  स्टीव्ह जॉब्जने तंत्रज्ञान क्षेत्रात केलेले आमूलाग्र बदल जगाकडून कधीही न विसण्याजोगे आहेत. जणू तो एक जादूगार होता!  स्टीव्ह जॉब्जचा प्रवास तसा खूप संघर्षमय होता. ऍप्पल कंपनी स्थापन करण्यापासून ते आपली सर्व उत्पादने लोकप्रिय करण्यापर्यंत स्टीव्ह जॉब्जच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले. स्टीव्ह जॉब्जवर बरंच लिहिलं गेलं. त्यावर 'स्टीव्ह जॉब्ज' नावाचा सिनेमाही येऊन गेला.  

१९७३मध्ये  स्टीव्ह जॉब्ज अध्यात्माकडे झुकला होता, त्यासाठी तो भारतातही राहून गेला. अमेरिकेत जाऊन पुढे १९७५ च्या सुरुवातीला एका गॅरेज मध्ये स्टीव्ह जॉब्स आणि मित्र सिव्ह वॉझ यांनी ऍप्पलची स्थापना केली होती. त्यांचा कंपनीचा असे म्हणण्या पेक्षा त्यांचा पहिला कॉम्प्युटर म्हणजे ‘ऍप्पल १′ होय. या कॉम्प्युटरला बनवण्यासाठी जॉब्सने त्याची’ ‘फोक्सवॅगन’ बस १३०० अमेरिकन डॉलर्सला विकली. वॉझनंही त्याचा एचपी-३५ कॅलकुलेटर २०० डॉलर्सला विकला. असे त्यांचा कडे १५००  डॉलर्स होते. पण त्यातही जॉब्स याचा बसमध्ये बिघाड झाल्याने त्याला ५०० परत करावे लागले. मग त्यांच्याकडे १००० पेक्षा कमी डॉलर्स शिल्लक होते. १९७८ मध्ये नेशनल सेमीकंडक्टर कपंनीचे माइक स्कॉट यांना एप्पलचे  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भरती करण्यात आले. 

त्याकाळी बाईट नावाचं काम्पुटर्स विकण्याचं एक दुकान होतं. त्या दुकांनाने स्टीव्हला ५० कॉम्प्युटर्सची ऑर्डर दिली आणि प्रत्येक कॉम्प्युटर मागे ५०० डॉलर्स ही देऊ केले. यामुळे कंपनीकडे थोडा पैसा आला. मग स्टीव्हने काही अनुभवी मंडळींना कंपनीत घेऊन कंपनी ला व्यवसायिक स्वरूप दिलं. कंपनी आता गॅरेज बाहेर येऊन मोठी होत होती. याच वेळी व्हिजिकॅल्क नावाचा एक स्प्रेडशीटचा प्रोग्रॅम फक्त ऍप्पलमध्येच चालत असे, त्यामुळे देखील ऍप्पलची विक्री खूप वाढली. १९८०च्या डिसेंबरमध्ये जेंव्हा कंपनी पब्लिक झाली, तेंव्हा जॉब्ज, वॉझ आणि मार्कुला नावाचा त्यांचा सहकाऱ्याकडे प्रत्येकी २३ कोटी डॉलर्स मालमत्ता आली होती. याचं त्यांना समाधान होतं. 

पुढे मात्र ऍप्पल ३ लिसा आणि मॅकिंटॉस हे कॉम्प्युटर फ्लॉप झाले. या मुळे ऍप्पल कंपनीत अंतर्गत राजकारण सुरु झालं आणि डिरेक्टर बोर्डाने चक्क स्टिव्ह जॉब्स यालाच कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला गेला. जॉब्सने या गोष्टीपासून निराश न होता  स्वतः ची नेक्स्ट नावाची कंपनी स्थापन केली. त्या कंपनीला देखील यशस्वी करून दाखवलं. या कंपनीमध्ये राहून स्टीव्हने 'इन्टर पर्सनल' कम्प्यूटर बनवला. पुन्हा  ऍप्पल कंपनीने नमते घेत नेक्स्ट कॉम्पुटर्सला ४० कोटी डॉलर्सला विकत घेतले आणि स्टिव्हला परत कंपनीमध्ये बोलावलं आणि थोडयाच काळात स्टिव्ह जॉब्सच कंपनीचा अध्यक्ष बनला. हीच स्टीव्हची जिद्द प्रेरणादायी ठरते. 

एवढं सर्व होत असताना ऍप्पलने कॉम्प्युटर विश्वात बलाढय कंपनी बनण्याची संधी मात्र गमावली होती. आज जेथे मायक्रोसॉफ्ट आहे तेथे  ऍप्पल असू शकले असते पण असे झाले नाही. याला दोन प्रमुख कारणे आहेत, एक म्हणजे अंतर्गत राजकारण आणि दुसरे म्हणजे त्यांनी त्याचं सॉफ्टवेअर त्यांचा खेरीज इतरांना वापरुच दिले नाही. नेमके इथेच बिल गेट्सनी बाजी मारली आणि आय.  टी.  क्षेत्रात मायक्रोसॉफ्टच्या उत्पादनाचा खप वाढला.  

मार्केटमध्ये मायक्रोसॉफ्टला शाह देत १९९५पासून  "थिंक वेगंग" जाहिरात मोहिमेसह आणि आयमॅक, आयट्यून्स, आयट्यून्स स्टोअर, ऍपल स्टोअर, आयपॉड, आयफोन, एप-स्टोअर आणि आयपॅड या उत्पादनासह आघाडी घेतली. जी क्रांती आपण आजही बघत आहोत. २००३ मध्ये स्टीव्हला पॅनक्रियाटिक  न्यूरोन्डोक्राइन ट्यूमर या आजाराचे निदान झाले आणि ५ ऑक्टोबर २०११ रोजी स्टिव्हची या आजाराशी झुंज अपयशी ठरली आणि  स्टीव्ह जॉब्जचे निधन झाले, ऍप्पल मात्र इतर कंपन्यांशी  स्पर्धा करत आजही जिवंत आहे. 

Tuesday, January 29, 2019

गोष्ट गुगलच्या जन्माची !

मागच्या महिन्यात गुगलला २० वर्षे पूर्ण झाली. या एक-दीड दशकात वाचणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे या क्रियापदांसारखे अजून एक  क्रियापद आपल्याला ऐकायला मिळते, ते म्हणजे गूगल करणे. अर्थात गूगलवर शोधणे. गूगल या कंपनीचं नाव माहित नसलेला एक साक्षर माणूस सापडणार नाही, अगदी असंच चित्र गूगलबद्दलचे आहे.  आजच्या युगात गूगल म्हणजे एक माहितीचं भांडार आहे. कशाबद्दलही माहिती शोधायची असली की मग गूगल उघडा, अगदी इंटरनेट चालू आहे कि नाही हेही  तपासण्यासाठीही लोक गूगलच उघडतात. एखादं ठिकाण शोधायचं असेल, मग गूगल मॅप्स वापरा. कोणतं पुस्तक मिळवायचं असेल तर गूगल बुक्स वापरा. ई-मेल खातं उघडायचं असेल गुगलचेच जीमेल वापरा. इंटरनेटवर एखादा फोटो शोधायचा असेल, गूगल इमेजेस वापरा. एखादा व्हिडीओ पाहायचा असेल, गूगलचेच यु-ट्यूब उघडा. आज गूगल म्हणजे साक्षर लोकांचा दैनंदिन जीवनाचा भाग होऊन बसला आहे.  अशी सर्व माहिती पुरवत असताना गूगल आता मोबाईल फोन्स, टीव्ही, आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सकडे वळलेले आहे. ऍपलशी स्पर्धा करणारी अँड्रॉईड ही मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम गूगलनेच बनवलेली आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार ऍपलचे मार्केटशेअर्स  अँड्रॉईडवाले खाऊन टाकतील असे अंदाज आहेत. बऱ्याचजणांना गुगल ही एकच कंपनी एवढे अफाट काम कशी करू शकते, तिला उत्पन्न कसे मिळते असे नेहमी प्रश्न पडतात.

गुगलची सुरुवात १९९८ मध्ये लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या दोन तंत्रज्ञानाने झपाटलेल्या तरुणांनी केली. गुगलच नावं गणिताच्या गूगोल या शब्दावरून ठेवलेलं आहे. गूगोल म्हणजे एकावर शंबर शून्य. लॅरी पेज हा लहानपणापासूनच खूप खटपट करणारा मुलगा होता. तो लहान असताना त्याच्या मोठ्या भावानं त्याला स्क्रू ड्राईवर्सचा एक बॉक्स आणून दिला होता. त्याचा वापर करून पेजनं घरामधल्या अनेक वस्तूमधले स्क्रू काढून टाकले, त्यानंतर त्याला ते जोडता येईनात. साहजिक त्याचे आई-वडील त्याच्यावर तेव्हा खूप वैतागले होते. मोठा झाल्यावर 'मला ती सगळी यंत्रणा ठीकठाक करणं अशक्य होतं असं अजिबात नाही, पण मी फक्त ती दुरुस्त केली नाही एवढेच!' असं या प्रसंगाची आठवण निघाल्यावर पेज म्हणतो.

आपल्या वडिलांप्रमाणे पेजनं कॉम्पुटर सायन्समध्ये आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर तो स्टॅनफर्डमध्ये पुढचं शिक्षण घ्यायला गेला. पेजच्या म्हणण्यानुसार,  त्या सुमारालाच आपण धंदा करायचा, नोकरी अजिबात करायची नाही असं पेजनं ठरवलं होतं. तो बारा वर्षाचा असल्यापासूनच भविष्यात आपण एखादी छोटी कंपनी टाकायची असं त्यानं ठरवलं होतं.   पेजचा भाऊ पेजपेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे. त्यावेळी तो सिलिकॉन व्हॅलीमधील एका कंपनीत काम करत होता. त्यामुळे पेजला या आयटी क्षेत्रातील थोडीफार माहिती होती. स्टॅनफर्डमध्ये असताना पेजनं  'ह्युमन- कॉम्पुटर इंटरऍक्शन ग्रुपम'ध्ये काम करायचं ठरवलं. माणूस जेव्हा कॉम्पुटरचा वापर करतो तेव्हा त्याला कोणकोणत्या अडचणी येतात, कॉम्पुटर आपल्याशी कशा प्रकारे सवांद साधावा असं माणसाला वाटतं, कॉम्पुटर वापरायचं काम अजून सोपं कसं करता येईल, असे सगळे विषय यात असतात. उदाहरणार्थ. एखाद्या माणसाने कॉम्पुटर वापरात असताना कसली तरी चूक केली असं समजू. तर अशा वेळी कॉम्पुटरनं ही चूक त्या माणसाच्या लक्ष्यात आणून दिली पाहिजे किंवा एखाद्याला इंटरनेटवर ठराविक माहिती शोधायची असेल तर त्यासाठी कॉम्पुटरने आपल्याला कश्या प्रकारचा स्क्रीन दाखवावा, कशी मदत करावी असं वाटतं या प्रकारच्या असंख्य गोष्टींचा अभ्यास पेज काम करत असलेल्या विभागात होत असे.  याची सुरुवात डोनल्ड नॉर्मन या पूर्वी ऍपल कंपनीत काम केलेल्या तज्ञाच्या 'दी सायकॉलॉजी ऑफ एव्हरी डे थिंग्ज' या पुस्तकातून झाली.  पेजला हे पुस्तक खूप आवडायचं. याशिवाय निकोलस तेस्ला या संशोधकाच्या चरीत्रांवरसुद्धा पेज भारावून गेला होता. तेस्लाने वीज, चूंबकत्व, बिनतारी संदेश वहन, विजेवर चालणारी उपकरनं यासंदर्भात  अनेक शोध लावले होते. परंतु एडिसन, मार्कोनी अशा मंडळीना मिळालेली लोकप्रियता तेस्लाच्या वाट्याला आली नाही. म्हणून तेस्लाविषयी पेजला खूप वाईट वाटायचं. तेस्लाने खरं म्हणजे जग बदलून टाकणारी कामगिरी केली होती. त्याच्या शोधाचे व्यावसायीकरण करण्यासाठी आवश्यक असेलेली साधनं नव्हती, म्हणून असं घडलं, असं पेज आजही म्हणतो. मिशिगन विद्यापीठात शिकत असताना पेजनं तेव्हाच्या बसला कंटाळून विद्यार्थ्यांसाठी मोनोरेलच्या प्रकल्पाची आखणी केली होती. हा आपला प्रकल्प संबंधित लोक मान्य करत नाहीत म्हंटल्यावर पेज जाम वैतागला होता.

दुसऱ्या बाजूला सर्गे ब्रिन हा विद्यार्थी अतिशय हुशार होता. एकदा स्टॅनफर्ड विद्यापीठाची सहल सॅनफ्रान्सिस्कोला गेली. तेव्हा सर्गे ब्रिन हा विद्यार्थ्यांचा गाईड होता. अनेक गोष्टीची माहिती स्वतःकडे ठेवण्याची सर्गे ब्रिनला सवय होती, हाच त्याचा छंद होता. स्वतःकडच्या 'माहितीचा साठा' याबद्दल ब्रिनला प्रचंड महत्व वाटे, कुतूहल वाटे. या सहलीत ब्रिन आणि पेजची मैत्री झाली. आपल्या आवडणाऱ्या गोष्टी जवळपास सारख्याच आहे हे दोघांच्या लक्षात आलं. पुढे मैत्री आणखी घट्ट झाली. काही कारणास्तव ब्रिनचं कुटुंब रशियामधून अमेरिकेला स्थलांतरित झालं होतं. अमेरिकेत आल्यानंतर ब्रिन कुटुंबीयांचं सुरुवातीचं जीवन हलाखीचं होतं. ब्रिनचे वडील मेरीलँड विद्यापीठात नोकरीला होते.

ब्रिनचे वडील ब्रिनलाही शिकवायचे, त्यामुळे ब्रीनचा आत्मविश्वास खूप वाढला. आपल्या मुलाबद्दल ते जरा कडक वागत असत. त्यांना आपल्या मुलाने शिस्त मोड्लेलं अजिबात आवडत नसत. ब्रिनची आई नासामध्ये काम करायची. हुशार असेलेल्या ब्रिनने आपलं शिक्षण तिथेच तीन वर्षात पूर्ण केलं. वयाच्या १९ व्या वर्षी पीएचडी पूर्ण करण्यासाठी तो स्टॅनफर्डमध्ये आला. त्याला लहानपणापासून गणिताची खूप आवड होती. स्टॅनफर्डमध्ये तो पात्रता परीक्षा पटापट पास झाला. स्टॅनफर्ड हे जगाच्या अत्यंत चांगल्या समजल्या जाणाऱ्या विद्यापीठांपैकी एक आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात तब्ब्ल ८१८० एकर पसरलेल्या या  विद्यापीठात जवळ जवळ २००० प्राध्यापक शिकवतात. स्टॅनफर्डची स्थापना १८९१ साली झाली होती. या विद्यापीठाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं संशोधन करण्यासाठी, तसंच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योजक व्हावं यासाठी खूप प्रयत्न  केले जातात, याच दृष्टीने शिकवले जाते. त्यामुळे सिलिकॉन व्हॅली या माहिती तंत्रज्ञानाशी संबधित कंपन्यांमधल्या बऱ्याच कंपन्या काढणारे लोक हे स्टॅनफर्ड विद्यापीठातून बाहेर पडलेले आहेत.

पेज आणि ब्रिनच्या काळातही विद्यापीठाच वातावरण अगदी मोकळढाकळं होतं. तिथले प्राध्यापक मुलांना प्रोत्साहित करत, त्यांचा आत्मविश्वास वाढवत असायचे . सगळ्या विद्यार्थ्यांचा सगळा वेळ संशोधन करण्यातच जात असे. त्यातही पेजची कल्पनाशक्ती आवाक्याबाहेरची. आपण एखादे सौरऊर्जेवर चालणारे पतंग बनवण्याचे संशोधन करत असल्याचे पेज अधूनमधून सारखं म्हणायचा. त्यावेळी www या शब्दाने वेबसाईट चालणे आणि इंटरनेट या गोष्टींनी धुमाकूळ घातला होता. टीम बर्न्स ली हा 'वर्ल्ड वाईड वेब'चा जनक समजला जातो. स्विझर्लंडमधल्या सर्न या जगप्रसिद्ध भौतिकशात्राशी संबंधित संशोधन केंद्रात काम करत असताना टीम बर्न्स लीला ही कल्पना सुचली. १९४५ साली व्हॅनेव्हर बुश याने जगातील सर्व कॉम्पुटरवरची माहिती जोडल्यानंतर एक प्रकारचा माहितीचा खजिनाच भेटेल याबद्दलचा शोधनिबंध लिहिला होता. यातूनच एक प्रकारच्या माहितीकडून दुसऱ्या प्रकारच्या माहितीपर्यंत पोहचता येईल अशी त्यामागची कल्पना होती. या सर्व प्लॅनला बुशनं 'मेमेक्स' असं नाव दिलं होतं. पुढे माऊसचा शोध लावणाऱ्या डग्लस एंगलबर्डने यावर थोडं काम पाहिलं, नंतर टेड नेल्सन या संशोधकाने 'हायपरटेक्स्ट' तंत्रज्ञानातील संकल्पनेचा शोध लावून हे काम पुढे चालवलं. परंतु, हे काम तो पूर्ण करू शकला नाही. वेगवेगळ्या कॉम्पुटरवरची विखुरलेली माहिती जर एकाच ठिकाणी मिळाली तर सर्वांनाच याचा खूप मोठा फायदा होईल असं बर्न्स लीच मत होतं. कारण www (वर्ल्ड वाईड वेब ) नावाच्या कॉम्पुटरच्या  जाळ्यात अनेकांनी माहिती भरलेली असेन आणि या माहितीच्या खजिन्यावर तो ठाम होता.

सर्गे ब्रीनला डेटा मायनिंग या विषयात खूप रस होता. म्हणजेच मोठ्या प्रमाणातल्या माहितीतून काहीतरी गरजेचं काढून घेणे याच्यात त्याला आवड होती. ब्रिनने या तंत्रज्ञानाचा वापर एका मजेशीर युक्तीसाठी केला. ब्रिनने सिनेमा बघितला कि त्या सिनेमाला रेटिंग द्यायचा एक प्रोग्राम लिहिला, यातून लोकांनी बघितलेल्या सिनेमाचे मानांकन तपासायचा. यावरून स्वतः न बघितलेला सिनेमा कसा आहे हे त्याला समजत असत. त्याची राजीव मोटवानी या  व्यक्तीशी स्टॅनफर्डमध्ये मैत्री झाली, संशोधनात ब्रिनला त्याने खूप मदत केली.  पेजही संशोधनासाठी विषय शोधत होता, विचार करत होता.  वेबसाईटला भेट देणाऱ्या लोकांकडून वेबसाईटबद्दलच्या   प्रतिक्रया घ्यायचा आणि त्यालाही मानांकन द्यायचे असाच काहीसा पेजचा विचार चालू होता त्यातच त्याला हायपरलिंक (लिंक) संकल्पना आठवली.  याचा वापर करून तो बरंच काही करू शकत होता हे त्याला जाणवत होतं.

या सर्व खाटाटोपात स्टॅनफर्डमध्ये लॅरी पेजची आणि सर्गे ब्रीन मैत्री आणखी होत गेली.  पीएचडीसाठी दोघांनी आपला विषय 'वर्ल्ड वाईड वेब'च ठेवला. आणि सगळ्या वेबसाईट लिंक करण्याच्या अल्गोरिदमच्या शोधात ते दोघे काम करू लागले आणि  त्या वेबसाईटच्या लोकप्रीयेतेवरूनच त्या साईटला रँकिंग दिलं जाईल, असं त्याचं उद्धिष्ट होतं. पुढचे ३-४ वर्षे दिवस-रात्र एक करत त्यांनी यावर खूप संशोधन केलं. १९९६ मध्ये त्यांना असा अल्गोरिदम मिळाला आणि पहिल्यांदा जे गुगल सर्च इंजिन म्हणून लॉंच झाले ते स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या वेबसाईटवर आजही उपलब्ध आहे. या दोघांनी ४ सप्टेंबर १९९८ मध्ये मित्रांकडून, घरच्यांकडून आणि काही व्यवसायासाठी कर्ज  देणाऱ्या संस्थाकडून १० लाख डॉलर्सचे कर्ज घेवून गुगल ही कंपनी स्थापन केली. गुगलच्या अगोदर सुरु झालेल्या याहू या कंपनीने काही काळ गुगलबरोबर भागीदारी केली, नंतर काही कारणास्तव फेब्रुवारी २००४ साली याहूने शेअर्स परत घेतले. या अगोदरच गूगलची माहिती व तंत्रज्ञानात नेट सेंटर, याहू डॉट कॉम , एमएसएन डॉट कॉम , गोटू डॉट कॉम अशा अनेक सर्च इंजिनशी स्पर्धा सुरु झाली होती.  २०००  सालापासून गुगल जाहिरातींवर पैसा कमवू लागली.

२००२ मध्ये गुगलने वेगवेगळ्या भाषांमध्ये बातम्या उपलब्ध करण्यासाठी  गुगल न्यूज लॉंच केले. १ एप्रिल २००४ साली गुगलने मेलिंग सर्विस जीमेल लॉंच केली. २००५ मध्ये इंटरनेटवर नकाशामधून ठिकाण शोधण्यासाठी  गुगल मॅप्स, गुगल अर्थ अशा अनेक सेवा सुरु केल्या. त्यावेळी युट्युब ही कंपनी १४ फेब्रुवारी २००५ ला सुरु झालेली होती, परंतु लगेच १३ नोव्हेंबर २००६ या दिवशी १.६५ अब्ज डॉलर्सला गुगलने युट्युबला खरेदी केलं. २००७ साली अँड्रॉइड मोबाईल सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी विकत घेतली.  अँड्रॉइड असणाऱ्या फोनमधील 'गुगल प्ले स्टोअर'मध्ये सर्व मोबाईल ऍप असतात. २ सप्टेंबर २००८ या दिवशी गुगल क्रोम नावाचा ब्राउजर गुगलने मार्केटमध्ये आणला. २०११ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एरिक श्मिट यांना पायउतार केलं गेलं आणि लॅरी पेज स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. गुगलने आपल्या कार्यप्रणालीत वेळोवेळी अनेक बदल केले. आजच्या जगभरातल्या जवळजवळ १० स्मार्टफोनमधले ८ फोन अँड्रॉइडचे आहेत. २००६ मध्ये गुगलने ब्लॉग लिहिणारयांसाठी ब्लॉगर ही सेवा चालू केली. पुढे २०११मध्ये गुगलप्लस हे सोशल नेट्वर्किंग साईट चालू केली.  यापूर्वी गुगलने ओर्कुट नावाची सोशल नेट्वर्किंग साईट लॉंच केली होती, परंतु सोशल नेट्वर्किंग साईटच्या स्पर्धेत ती टिकू शकली नाही आणि ३० सप्टेंबर २०१४ रोजी ती बंद करण्यात आली. २०१६ साली गुगलने स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रोनिक गॅझेट्स निर्मितीतही पदार्पण केले. आज गुगल पिक्सेल स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. गुगलने २०१२ साली अँड्रॉइडमध्ये गुगल असिस्टंट नावाच्या रोबोटची भर घातली, जो रोबोट आपण फोनवर विचारलेली माहिती पुरवतो. या व्यतिरिक्त आपले डॉक्युमेंट ठेवण्यासाठी  गुगल डॉक्स, इंटरनेटवर फोटो शोधण्यासाठी गुगल इमेजेस, याबरोबरच आपले फोटो इंटरनेटवर ठेवण्यासाठी गुगल फोटोज,  मजकूर एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये  भाषांतरित करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटर अशा अनेक सेवा गूगलने कालांतराने सुरु केल्या. २०१७ मध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी गुगलने 'तेज' हे मोबाईल ऍप मार्केटमध्ये आणले नंतर त्याचे नामांतर 'गुगल पे' असे झाले.

गुगल असिस्टंटचा सध्याचा वाढता वापर याबाबत सांगत असताना एका सभेमध्ये गुगलचे सध्याचे सिईवो सुंदर पिचाई यांनी गुगल 'आर्टीफिसिअल इंटीलिजन्स'वर सध्या भरपूर काम करत असून आर्टीफिसिअल इंटीलिजन्समध्ये भरपूर बदल आणणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. गुगलबरोबर सध्या जगभरातल्या मोठ्या देशांच्या प्रयोगशाळाही काम करतात. उदा. नासा, नेशनल सायन्स फाउंडेशन, ई. गुगल फ्लायिंग कार्स, सौरउर्जेवर चालणारी इको-सायकल अशा अनेक प्रकल्पांवर गुगल काम करत आहे, ज्यामध्ये रोबोटिक्सचा देखील वापर केला गेला आहे. भविष्यात तंत्रज्ञानाचे असे अनेक आमूलाग्र बदल आणून गुगलकडून दुनिया आणखी बदलणार आहे यात शंका नाही. २०१८ च्या आकडेवारीनुसार गुगलमध्ये ८५००० कर्मचारी काम करतात. गुगलचे मुख्य कार्यालय मौटन व्हिव, कॅलिफोर्निया येथे आहे. सध्याच्या घडीला गुगल ही ८०० अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीची कंपनी आहे. 

Published in Masik Chaprak June, 2019.  Pune.

Thursday, January 24, 2019

वेदांचा अट्टहास कशासाठी ?

आपल्या देशात अनेक शिक्षण चळवळी झाल्या, त्यासाठी अनेक महात्म्यांनी हातभार लावला. अगदी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे अशा अनेकांनी भारतीय शिक्षणव्यवस्थेसाठी मोलाचे योगदान आहे. त्या प्राथमिक शिक्षणासाठीच्या चळवळी जरी  असल्या तरीही आजच्या शिक्षणासाठी त्या मूलभूत आणि सार्थ ठरतात. खरं म्हणजे, तो आजच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया होता. आपण काय शिकतो, कसे शिकतो हे वेळ आणि काळच ठरवत असतो. आजच्या शिक्षणातून जुना अभ्यासक्रम, जसे कि पावकी-निमकी तसेच अनेक पुरातन भाषाही बरखास्त झालेल्या आहेत, मानवी जीवनात होणाऱ्या प्रगतीमुळे अभ्यासक्रमात तसा बदल होत गेला आहे. जसे दिवस जातील तसे नवे शिक्षण येत गेले. 

विद्यार्थ्यांना पूर्वी शिक्षण गुरुकुलात मिळत होते. ऋषीमुनी आपल्या विद्यार्थ्यांना अनेकप्रकारच्या विद्या, युद्धकला शिकवत होते. याबरोबरच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आयुर्वेद शिकवला जात होता किंबहुना तो आजही शिकवला जातो. आयुर्वेद हाही एक अनुभवातून आलेला अभ्यासक्रम आहे. परंतु चार वेद हे फक्त वैदिकांनाच वाचण्यास परवानगी होती. खरंतर  त्यात अभ्यासक्रम म्हणून आत्मसात करावं, असं काही नव्हतं किंबहुना याच वादांमुळे समाजात विषमता वाढत होती. जगाने स्वीकारावे असे त्यात काहीही नव्हते. पैसा, व्यापार, शिक्षण अशा अनेक विषयांना धरून जगाला त्यातून काही मिळालेही नाही.  अर्थात आजवर शिक्षणासाठी लढा देणाऱ्या महापुरुषांनी वेदांना विरोधच केला आहे. कारण वेदांमुळेच बराच समाज शिक्षणापासून वंचित होता. 

मग इथं प्रश्न पुढे येतो वेदांचा अट्टहास कशासाठी? आजवर जगात इतके संशोधन झाले, परंतु त्यात भारतीयांचे प्रमाण खूप कमी आहे किंबहुना ज्या संशोधनाने मानवी जीवन सोपे झाले, त्यात भारतीयांचे योगदान नगण्य आहे. बोटांवर मोजण्याइतके संशोधक भारताने जगाला दिले आहेत. इथं विमानाच्या संशोधनाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शिवकर तळपदे यांनी वेदांचा अभ्यास करून विमानाची कल्पना मांडली असे सांगितले जाते, परंतु वैमानिक संशोधनाला धरून वेदांमध्ये काहीही नाही. त्यांनी वेगळ्या अनुषंगाने याबद्दलचे यांच्याकडून संशोधन झालेही असेल. परंतु खरे संशोधन हे राईट्स बंधू यांच्या कडूनच झाले म्हणावे लागेल, त्यांनीच जगाला विमान ही कल्पना सत्यात उतरून दाखवली. याबरोबरच शून्याच्या शोधाचा टेम्बा मिरवला जातो, अर्थात भारतात शून्याचा शोध लागला खरा, परंतु शून्याच्या शोधाअगोदर गणितशास्त्रात  दहाच्या पाटीतल्या सर्वच संख्या उपलब्ध होत्या. फक्त ती मांडण्याची संकल्पना भारतीयाने दिली.

आज अनेक कृत्रिम उपग्रह आकाशात सोडल्यानंतर इस्रो या भारतीय संस्थेमध्ये होणाऱ्या संशोधनामुळे सर्वांकडूनच भारतीय शास्त्रज्ञांचे तोंड भरून कौतुक होत आहे आणि या यशाचे जगालाही आश्चर्य वाटत आहे. नविन तंत्रज्ञान शिक्षणाला आपण स्वीकारले आहे म्हणूनच हे शक्य होत आहे. अमेरिकेतल्या नासा प्रयोगशाळेमध्येही भारतीय शास्त्रज्ञांची संख्या अग्रगण्य आहे. कृत्रिम उपग्रहांमुळे डिजिटल सिग्नल्स, कृत्रिम बुद्दीमत्ता असे अनेक तंत्रज्ञान जोर घेत आहे. यामागे कसलेही पुराण किंवा वेद नाहीत. त्यामुळे भविष्यातील प्रगतीसाठी जुने पुराण झुगारून नवनवीन तंत्रज्ञानाची कास धारावी लागेल, तरच भारतात अनेक संशोधक तयार होतील आणि दुनियाही त्यांना स्वीकारेल.    

त्यासाठी  वर्तमान युगात आपल्या शिक्षणपद्धतीने  इतिहासापासून धडा घेतला पाहिजे.  स्वतंत्र विचार करुन शकणारी, नवनिर्मितीची प्रेरणा केंद्रीभुत ठेवत आणखी तंत्रज्ञानाधारित आणि वैज्ञानिक आपली शिक्षणव्यवस्था असली पाहिजे.  आज भारताची आईटी सुपर पावर म्हणून ओळख वाढत आहे. याकरता असे सकारात्मक बदल करणारे सरकारही पाहिजे आहे. यासाठी देवांच्या जाती, मंदिरे, शाळेत विद्यार्थ्यांसाठी गीता ग्रंथ असे मुद्धे काय कामाचे? 

विमानाच्या शोधाबद्दल संशोधनातील वास्तव असताना व प्लास्टिक सर्जरी व जनुकीय शास्त्रांबद्दलची सरकारमधील प्रतिगामी नेत्यांची आजची विधाने सरळ सरळ हास्यास्पद असतात, हे विज्ञान म्हणून विद्यार्थ्यांना शिकवायचा नुसता विचार करणेही आपल्या शिक्षण पद्धतीला धोकादायक आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. आजचे सारे आधुनिक विज्ञान वेदांमध्ये होते, इंटरनेट महाभारतात वापरले जात होते, माझ्याकडे दिव्य शक्ती आहे अशी अशास्त्रीय पण वैदिक अहंकार सुखावणारी विधाने भारत सरकारमधील मंत्र्यांनी करावे ही विज्ञानाची कास धरणाऱ्या भारतासाठी दुर्दैवी बाब आहे.

आज भारतातील एकही विद्यापीठ जागतिक दर्जाच्या दोनशे विद्यापीठांत नाही. हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्या यादीत भारतीय विद्यापिठे गणली जात नाहीत. आपण जागतिक ज्ञानात, मग ते उपयुक्ततावादी असो की निखळ सैद्धांतिक पातळीवर, कोणतीही भर घातलेली नाही. आम्ही सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये स्वत:ला अग्रेसर समजतो, पण आमच्या देशातील कोणीही आजतागायत एकही स्वतंत्र प्रणाली किंवा संगणकीय भाषा बनवू शकलेले नाही. कारण  आपल्या देशात शिक्षणव्यवस्थेच्या शेतात बेरोजगारीचे जे तण फोफावत आहे, त्याला पुराणपंथी विचारांचे खत-पाणी भेटत आहे. 

Published in Dainik Pandhari Bhushan, Pnadharpur on 17 May 2019.

इतर वाचनीय लेख

आपली शिक्षणपद्धती आणि आपण !

भारतीय आईटी विश्व..