आज आपण जे इंटरनेट वापरतो, चॅटींग करतो, नेट बँकिंग वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो आणि बऱ्याच कारणांसाठी आपण इंटरनेटवरून माहिती पाहतो, याची सुरुवात कशी झाली हे मात्र आपल्यामधल्या बऱ्याच लोकांना माहित नाही. इंटरनेटचे वय तसे फार वर्ष नाही. परंतु इंटरनेटच्या स्वरुपात जी उत्क्रांति होत गेली, ती विलक्षण आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका नेत्याने इंटरनेट महाभारताच्या काळात असल्याचे तारे तोडले होते. सुरुवातीला आपण इंटरनेट म्हणजे नेमके काय हे समजावून घेऊया. संवादासाठी कंप्यूटरने जोडले गेलेले जाळं म्हणजेच इंटरनेट. इंटरनेटचा शोध अगदी योगयोगाने लागला असे आपण म्हणू शकतो. जागतिक पातळीवर संवाद साधण्याकरता म्हणून खूप विचार करुन किंवा खूप संशोधन करून इंटरनेटला जन्म दिला असेही नाही. त्याला कारणीभूत ठरली ती दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आणि त्यावेळीची गरज.
१९४६ साली अमेरिकेच्या लष्करासाठी संदेशवहनाच काम करणाऱ्या लोकांना चंद्राच्या पृष्टभागावर बीनतारी लहरी अर्थात सिग्नल्स आदळून वॉशिंगटन ते हवाई बेट यांच्यामध्ये संदेश पाठवणे शक्य झाले होते. या सिग्नल्सचा वापर नेहमीच्या संदेशवहनासाठी अनेक अडचणी आल्यामुळे त्याचा व्यापारासाठी वापर शक्य होत नव्हता. याला आणखी एक संदर्भ होता तो म्हणजे जॉन पीयर्सने लष्करासाठी कामाला पडणारे सॅटेलाईटस् आणि त्यांचे सिग्नल्स यांवर लिहिलेल्या शोधनिबंधाचा. १९२६ साली रॉबर्ट गोगार्ड या शास्त्रज्ञाने संशोधन करुन आपल्या आत्त्याच्या शेतातुन एक रॉकेट आकाशात सोडलं होतं, त्यामुळे गोगार्डला 'आधुनिक रॉकेट तंत्रज्ञानाचा जनक' म्हणून ओळखले जाऊ लागले होते. या उपग्रहाच्या संशोधनाच्या शीतयुद्धात सोव्हिएत यूनियनन 'स्पुटनिक' नावाचा उपग्रह सोडला. यात अमेरिका पराभूत झाल्याचे चित्र अमेरिकेचे राष्ट्रपती डवाईट आयसेनहॉवर यांनी मनावर घेतले. त्यातून त्यांनी अर्पा (ARPA- Advance Research Project Agency) या संस्थेची स्थापना केली. अर्पाच मुख्य उद्दिष्ट होते संरक्षणासाठी दूरसंचार आणि संगणक यावर भर देणे. सुरुवातीच्या काळात अर्पाकडे अमेरिकेच्या अंतराळ मोहिमा, अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या नवनव्या घडामोडी असलेल्या संशोधनाची कामे होती. १९९३ मध्ये 'स्पुटनिक'ला आव्हान समजून अमेरिकेने 'नॅशनल एरोनॉटिक्स एंड स्पेस अड्मिनीस्ट्रेशन' (NASA) नावाची आणखी एक संस्था स्थापन केली आणि त्यावेळी बंद पडत आलेल्या अर्पाही स्थीर झाली. त्यात ऑस्टिन बेट्स या लष्करी अधिकाऱ्याचा मोलाचा वाटा होता. अमेरिकेच्या हवाईदलाला मदत करण्यासाठी अर्पाच्या संगणकचा मोठा फायदा होत असे. त्यासाठी त्यावेळचे अर्पाचे संचालक जॅक रूईना यांनी जोसेफ लिकलायडर याची नियुक्ती केली. १ ओक्टोबर १९६२ साली अर्पात रुजू झाला. जोसेफ लिकलायडर लहानपणापासूनच खूप खोडकर आणि विचारी होता. कोणतंही यंत्र खोलून जोडण्याच त्याला वेड होतं. लीकलायडरने मानसशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात वॉशिंग्टन विद्यापीठातून पदव्या मिळवल्या होत्या. लीकलायडरचा नेहमीच मानव आणि संगणक याचा अभ्यास चालू असत. तो बीबीएन या कंपनीत काम करू लागला आणि काही करारानंतर १९६२ साली बीबीएन कंपनी अर्पात विलीनी झाली. पूर्वीच्या काळी एका संगणकावर एका वेळी एकच व्यक्ती काम करू शके. त्यावेळी लीकलायडरने 'टाइम शेअरिंग' नावाच्या तंत्रज्ञानावर काम सुरु केलं. एक संगणक खूप मोठा असल्यानं तो घेऊन फिरणंही शक्य नव्हतं. अर्पामध्ये खूप संगणक असूनसुद्धा एकमेकांशी संपर्क साधू शकत नसत. यासाठी लिकलायडरने बॉब टेलर या नासामधल्या व्यक्तीला तंत्रज्ञान प्रमुख केलं.
अर्पामधले एकमेकांना कसे जोडायचे या प्रश्नाने बॉबला भेडसावून सोडलं. त्यानं त्या ऑफिसमधले काही संगणक आणि काही कॅलिफोर्नियामधले संगणक जोडले. दुर्दैव म्हणजे काही संगणक मेनफ्रेमभाषेचे तर काही वेगवेगळ्या रचनेचे असल्यामुळे ते संपर्क साधू शकले नाहीत. त्या संगणकांना त्याने टर्मिनल असे नाव दिले होते. बॉबने हे सारे मुद्दे आपला सहकारी हर्जफेल्डसमोर मांडले, संगणकाच्या गरजा वाढत आहेत असा त्याने सूर धरला, हर्जफेल्डने मदत म्हणून बॉबला आणखी निधी मिळवून दिला. त्यावेळेचे संगणक खूप मोठे आणि महागडेही होते. प्रत्येकाला स्वतंत्र संगणक असावा असे वाटत असे. बॉबने आणि नवीन रुजू झालेल्या लॅरी रॉबर्टने जोडलेल्या संगणकाच्या जाळ्याला अर्पा नेटवर्क (ARPA Network) असे नाव देण्यात आलं. या जाळ्यात डेटा कसा पाठवायचा हा यक्षप्रश्न पुढे उभा होता. यावर बरीच चर्चा झाली. त्यातून 'पॅकेट स्विचिंग'ची कल्पना पुढे आली. एखादं फर्निचरच सामान एका घरातून दुसऱ्या घरात नेण्यासाठी आपण त्याचे छोटे तुकडे करतो आणि नवीन घरात आपण ते पुन्हा जोडतो, असेम्बल करतो. अगदी अशीच ही कल्पना होती. याचप्रमाणे एका संगणकाकडून पाठवलेला मजकूर तुकड्या-तुकड्यात पाठवून योग्य क्रमाने दुसऱ्या संगणकाला पाठवला जाईल, तेव्हा दुसऱ्या संगणकाला मिळताच त्याने त्याच क्रमाने तो जोडावा अशी युक्ती आखली गेली. या संशोधनात काही पॅकेट्स हरवले जात होते तर काही योग्य क्रमाने पोहचत नव्हते. त्यासाठी वेस्ली क्लार्क, लिओनार्ड क्लेईनरॉक या सहकाऱ्यानी कॉम्पुटरमध्ये मेसेज प्रोसेसर बसवण्याचे सुचवले. यातूनच कॉम्पुटर नेटवर्क संकल्पनेचा जन्म झाला. यात बीबीएन कम्पनीचाही मोठा वाटा होता. ७० च्या दशकात अर्पाने अमेरिकेच्या लष्करासाठी सीमेवर कॉम्पुटर जोडण्यास सुरुवात केली. गरजेच्या चाचण्या होऊ लागल्या. १९७३ साली इंग्लंड आणि नॉर्वेने प्रत्येकी एक कॉम्प्टर घेऊन नेटवर्कमध्ये सामील झाले. १९८२ लिओनार्ड क्लेईनरॉकने डेटा पॅकेट्स पाठवण्यासाठी काही नियम आखले, त्यालाच आपण आज इन्टरनेट प्रोटोकॉल म्हणतो, त्याच्याच नियमावरून कॉम्पुटरचा पत्ता कळतो, त्यालाच आपण आय. पी. ऍड्रेस म्हणतो. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल ही थेअरी आल्यानंतर नेटवर्कमध्ये कॉम्युटरची संख्या वाढू लागली. सहभागी झालेल्या वेगवेगळ्या देशातील संगणकाला आय. पी. ऍड्रेसने ओळखले जाऊ लागले. पीएसआय नेट, नेटकॉम, पोर्टल सॉफ्टवेअर, अल्टरनेट या कम्पन्या ईंटरनेट सेवा देऊ लागल्या. ९० च्या दशकात संदेश पाठवण्यासाठी ई-मेल सारख्या कल्पनेचा जन्म झाला. हा संदेश पाठवण्यासाठीही आयपी ऍड्रेसचाच वापर होत असे. याबरोबरच एका मुख्य संगणकवरचा मजकूर मिळवण्यासाठी www हे शब्द वापरून आणि आय. पी. ऍड्रेस वापरून मजकूर मिळवला जात असत. यात टीम बेरनर्स ली या संशोधकाचा मोलाचाही मोठा वाटा होता.
आज आपण जी इंटरनेटची उत्क्रांती बघत आहे याच अर्पानेटच हे बदलेलं रूप आहे. वेगवेळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स, ब्राऊझर्स, सोफ्टवेअर्स यांनी जोर धरला आहे. बहुदा सर्वच काम इंटरनेटवर होतात. सर्वच इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यामध्ये स्पर्धेच वातावरण आहे. इंटरनेटच्या स्पीडच्या जोरावर 4G, 5G ई. जनरेशनने इंटरनेट डेटा पुरवला जात आहे. 'इंटरनेट ऑफ दी थिंग्ज' या संकल्पनेखाली स्वयंचलित वाहणे चालवण्यासाठी सेन्सर बरोबरच, शहराचे सध्याच चित्र पाहण्यासाठी जास्त स्पीडसह इंटरनेट वापरले जाते. त्यामुळेच सगळी यंत्रणा एकमेकाशी संलगणित राहते. हवामानचा योग्य अंदाज, उपग्रहावरील बातम्या, बँकातील कामे, खेळाचे प्रेक्षेपण, शेअर मार्केट सर्वच क्षेत्रात आज इंटरनेट शिवाय काम शक्य नाही. कॉम्पुटर, मोबाईलच नव्हे तर इंटरनेटमुळे इतर उपकरणातून डेटा देवाणघेवाण करता येतो. इंटरनेटच्या वापरामुळे बुध्दीमान व्यक्तीना या प्रगतीचा उपयोग करणे शक्य झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने इंटरनेटमुळे दुहेरी परिणाम होणार आहेत. जागतिक व्यापरपेठ इंटरनेटमुळे खुली झाल्याने आपला माल सर्व जगभर पाठविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी स्थानिक उद्योजकांना बहुराष्ट्नीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. पर्यावरण क्षेत्रामध्ये इंटरनेट फार उपयुक्त ठरत आहे. इंटरनेट हे ज्ञानाचे भांडार ठरत आहे. थोडक्यात इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्वल भविष्याकडे नेईल अशी आशा आहे. वेगवेगळ्या सोफ्टवेअरमुळे, ऍपमुळे, उपकरणांमुळे बरेच मानवी जीवन सोयीस्कर बनत आहे. इंटरनेट हे शैक्षणिक प्रगतीचे अत्युत्तम साधन बनले आहे . इंटरनेटची गरज व फायदे यांतील मुद्द्यांवरूनही शिक्षणातील इंटरनेटचे महत्त्व स्पष्ट होते. जगात औद्योगिक, शैक्षणिक वाढ झाली आहे. माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी इंटरनेटची क्षमता अफाट आहे आणि यात भविष्यातही आणखी आमूलाग्र बदल होत राहतील. म्हणुन आजच्या माहिती तंत्र ज्ञानाच्या युगात इंटरनेट ही काळाची गरज बनली असून अमेरिकेत शोध लागलेल्या इंटरनेटने दुनिया बदलली म्हणायला हरकत नाही. परंतु आज आमच्या देशात मात्र राजकारणासाठी महाभारतात इंटरनेटचा शोध लावणारे मंत्री होतात ही आमची शोकांतिका आहे.
Published in Masik Chaprak, July 18.
Published in Dainik Pudhari (Bahaar Supplement ) on 19 August.