Search in Google

Saturday, June 30, 2018

अच्छे दिन के चार साल?

         २०१४ साली देशात आणि राज्यात सत्तांतर झाले. सरकारकडून अनेक योजनांची घोषणा झाली. नवनवे उपक्रम चालू केले. आता अच्छे दीन येणार याची सामान्य नागरिकांना आस लागली. महागाई जाणार, भ्रष्टाचार जाणार, विदेशातला काळा पैसा येणार, नोकरीचे प्रश्न सुटणार, शेतकऱ्यांना मालाला भाव येणार या गोष्टींच्या आशेवर चार वर्षात अच्छे दिनचा 'अ' सुद्धा  आम्हाला दिसला नाही. ६०-७० वर्षात कॉंग्रेसने काय केले हे आम्हाला सांगता येणार नाही परंतु आमच्या बापजाद्यांनी या सरकारला सत्तेपासून का दूर ठेवले होते, हे आज आम्हाला समजत आहे. खोटं बोलण्याची प्रथा एका विशिष्ठ पक्षातच आहे, हा आमचा गैरसमज आज दूर झाला. या चार वर्षात व्यवस्था बदलणारे बरेच मोठे निर्णय घेण्यात आले किंबहुना ते भारतीयांवर लादले गेले असे म्हणावे लागेल. 

         शाळा, कॉलेजांमधल्या विद्यार्थ्यांना 'मन की बात' ऐकणं सक्तीच केलं गेल होत. आजचा विद्यार्थी उद्याचा मतदार आहे आणि तो आपल्या विचारांकडे अकर्षिला पाहिजे असेच चित्र 'मन की बात'बद्दलचे दिसते किंबहुना आजवर होवून गेलेल्या पंतप्रधानांचे कोणतेच भाषण विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे होते असे आम्ही अजुन तरी ऐकले नाही. गोमाता, हिंदुत्व, राम मंदिर आणि अनेक समोर आलेले जातीय मुद्दे यातून सामाजिक तेढ वाढत आहे. विज्ञानाची कास धरलेल्याचे चित्र भासवनाऱ्या सरकारच्या गोठामध्ये काय शिजते याचा अंदाज यावरून लागू शकतो. काही सरकारी पदांसाठी युपीएससीची परीक्षाही स्थगीत करण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे, आपल्याच विचारधारेच्या लोकांची नियुक्ती करण्यासाठी तर सरकारकडून असा बदल करण्यात आला असेल का ? हाही प्रश्न आहे. 

             स्वच्छ भारत हा उपक्रम 'संत गाडगे बाबा ग्राम स्वछता अभियान' या नावाखाली चालत होता. त्याला व्यापक रूप देवून, त्याचा तितकाच प्रसार आणि प्रचार करता आला असता, परंतु 'स्वच्छ भारत' योजनेच्या नावाखाली सामान्यांनाच टॅक्स भरावा लागतो आहे. त्यातून हवे तसे परिणामही दिसत नाहीत. पुणे, औरंगाबाद या सारख्या शहरांचे कचऱ्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. गंगा नदी स्वच्छ करण्याचा प्रकल्प कसा पुढे सरकतो आहे ? हेही कळायला मार्ग नाही. पुण्याच्या मुळा-मुठा याही नद्या स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यावे लागेल. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया यासारख्या योजनांचाही पाहिजे तेवढा प्रसार झाल्याचे चित्र आपल्याला आज कुठे दिसते? भारत हा कृषिप्रधान देश आहे. गांधी-नेहरूंनी सांगीतले होते खेड्यांकडे चला, परंतु सरकारने स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अनेक देशांबरोबर करारांसाठी पंतप्रधानांच्या परदेशी वाऱ्या खूप असतात, त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला चालना मिळते. परंतु जेवढ्यावेळा पंतप्रधान परदेशात गेले, किमान तेवढ्यावेळा तरी ते भारतातील शेतकऱ्यांमध्ये आले का ? असाही प्रश्न पुढे उभा राहतो. ते शेतकऱ्यांमध्ये आले जरी असले तरी अगदी अलीकडच्या दिवसातच! आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाची चाहूल पाहून असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. पंतप्रधान स्वतःची 'मन की बात' सांगतात, परंतु शेतकऱ्यांमध्ये जावून, त्यांच रडणं किती ऐकतात? शेतकऱ्यांची मन की बात त्यांनी किती वेळा ऐकली ? देशाला शत्रुराष्ट्राची साखर आयात करावी लागेल अशी दैयनीय परिस्तीथी नसतानाही सरकारने पकिस्तानची साखर आयात केली आणि साखरेचे भाव पाडले. भारताला कृषिमंत्री तरी आहे की नाही आणि त्यांनी कधी शेतकऱ्यांशी संवाद साधला काय? हेही कळायला मार्ग नाही. आता जसे निवडणुकांचे पडघम वाजु लागतील तसे पुन्हा आरक्षणाच, हमीभावाच आणि कर्जमाफीच गाजर दाखवलं जाईल. खर म्हणजे शेतकरी पूर्णतः सरकारवर विसंबून रहावा आणि त्यावर सरकारने सतत आपली राजकीय पोळी भाजत रहावी असेच हे चित्र आहे. सरकार जरी शेतकऱ्यांना धरुन बोलत असले तरी कृतीत मात्र शेतकरी विघातक दिसत आहे.  नोटबंदीच्या काळात सामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. देश एका विकासाच्या क्रांतीने वाटचाल करत आहे, असा बऱ्याच जणांचा समज होता, परंतु नोटबंदीतून जे निष्पन्न झाले त्याची माहितीही अत्यंत गोपनीय ठेवली गेली. बऱ्याच उद्योजकांनी बुडवलेल्या प्रचंड कर्जाचे ओझे सामन्यांच्या डोक्यावर आले. मयताच्या सामानावरही  जीएसटी लावणाऱ्या सरकारकडून नोटबंदीचा निर्णय निष्फळ ठरला. काळा पैसा भारतात परत येण्याऐवजी स्विजबँकेत भारतीयांच्या आणखी ठेवी वाढल्या आहेत.

            एका बाजूला मेक इन इंडिया, डिजिटल इंडियासारख्या घोषणा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला देशात धार्मिक तेढ वाढवायचा, भीमा कोरेगावसारखे जातीय मुद्दे भडकवायचे, असेच आजच्या या सत्तेच्या राजकारणात दिसत आहे. अर्थात औद्योगिक आणि विज्ञानाचा दृष्टिकोण धरुन ज्या योजना सुरु केल्या आहेत त्याचे स्वागत तर आपण केलच पाहिजे, त्याबरोबर बाकीच्याही घटकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. बुलेट ट्रेनसारखे आमिष दाखवून महासत्ता होण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी धडपडणाऱ्या भारताची ही वाटचाल मुख्यत्वे शेती, शैक्षणिक, सामाजिक अशा क्षेत्रावरदेखील आधारित आहे.  शेती, शिक्षण हा सर्वच क्षेत्राचा पाया आहे. शेतकरी आणि शिक्षण विकासाचा केंद्रबिंदू धरला पाहिजे. राज्याचा आणि केंद्राचा विचार करताना आम्हाला आपल्या प्रभागामध्येही किती आणि कशाप्रकारचा विकास झाला याचा विचार करण्याची ही वेळ आहे,  कारण २०१९च्या निवडणुकांचे वारे आत्तापासूनच वाहू लागले आहे.

Published in Dainik Surajya, Solapur.
Published in Dainik Dhyas Prgaticha, Nashik.
Published in Saptahik Chaprak, Pune.

Saturday, June 23, 2018

आर्टिफिशियल इंटीलिजन्स

आजच्या तंत्रज्ञानाच्या दुनियेत आर्टिफिशियल इंटीलिजन्सने ज्याप्रकारे जोर धरला आहे तो विलक्षण आहे. विज्ञानामुळे दिवसेंदिवस दैनंदिन जीवनामध्ये मशीनचा वापर पूर्वीपेक्षाही जास्त होत गेला आणि दिवसेंदिवस मशीनमधेही सुधारणा होत गेल्या आणि आज आर्टिफिशियल इंटीलिजन्सयुक्त संगणकाचा, मोबाईलचा वापर वाढत आहे.

१ आर्टिफिशियल इंटीलिजन्स म्हणजे काय ?
'आर्टिफिशियल इंटीलिजन्स' म्हणजेच अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता.  अर्थात कसलाही मानवी हस्तक्षेप न करता संगणकालाच स्वत:चेच नियोजन आणि समोर आलेल्या प्रश्नांची उकल करण्याची क्षमता उपलब्ध करून देणे म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्स होय. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत जरी असली तरी, सध्या ही संगणक अभ्यासक्रमामधील एक महत्त्वाची शाखा बनली आहे. १९५६ मध्ये  अमेरिकेतील डार्ट-माऊथ कॉलेजमधील एका प्रोजेक्टमध्ये आर्टिफिशियल इंटीलिजन्स या संकल्पनेचा शोध लागला गेला. पुढे लेनिन आणि त्याच्या संशोधक सहकाऱ्यांच्या मदतीने कम्प्युटरचे एक विशिष्ठ नेटवर्क उभारण्याचे प्रयत्न केले होते. मानवी मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरॉनप्रमाणे नेटवर्क बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. केवळ आवाज, प्रतिमेची ओळख, भाषांतर यांद्वारे हे नेटवर्क हाताळले जाते. मनुष्य जसा विचार करतो, विचार करून असंख्य संभावनेतून कोणती कृती करायची? याचा जसा तर्क लावतो आणि नंतर कृती करतो किंवा एखाद्या क्रियेला प्रतिक्रिया देतो, अगदी अशीच कामे एखाद्या यंत्रांकडून करून घेणे त्यावेळी तसे आव्हानात्मक होते. आता ही सर्व कामे संगणकाकडून करून घेणे शक्य झाले आहे. हे सर्व शक्य होत आहे आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या सहायाने! कृत्रिम बुद्धिमत्ता मुख्यत: आटोमेशन म्हणजेच स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा कामांसाठी वापरली जाते. आर्टिफिशियल इंटीलिजन्सचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. रूढ (कन्वेन्शनल ए. आय.) आणि संगणकीय (कंपुटेशनल ए. आय.) कृत्रिम बुद्धिमत्ता. रुढ कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रांचे शिक्षण व संख्याशास्त्र यांमध्ये विभागली जाते. ही बुध्दिमत्ता चिन्हांवर आधारित, तर्काधारित, सुयोजित असते. याला एक्स्पर्ट सिस्टीम असेही म्हणतात. या प्रोग्रामिंगला प्रचंड प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून उद्दिष्टांपर्यंत पोहोचवावे लागते, रूढ (कन्वेन्शनल ए. आय.) मध्ये उदाहरणावरून तर्क करणे, वर्तनावरून तर्क करणे याचाही समावेश होतो. रोबोट जरी आकृतीने माणूस दिसत नसला तरीही माणसाप्रमाणेच वागत असतो, माणसाप्रमाणेच काम करत असतो. तर संगणकीय (कंपुटेशनल ए. आय.) कृत्रिम बुद्धिमत्तेचे न्यूरल नेटवर्क, फझी सिस्टिम्स, इव्होलुशनरी कंपुटेशनल असे प्रकार पडतात. एखादा पॅटर्न तपासणे किंवा औद्योगिक व ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये नियंत्रण करण्यासाठी किंवा जीवशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग करून दरवेळी अचूक उत्तर शोधण्यासाठी कंपुटेशनल एआयचा उपयोग होतो.

२ आर्टिफिशियल इंटीलिजन्समुळे मानवी जीवन सोपे कसे होणार?
प्रत्येक क्षेत्रात अटोमेशन होत आहे परंतु त्याच वेगाने अटोमेशनच्या प्रक्रियेतही दिवसेंदिवस बदलही होत आहे. इमेज रेकग्निशन, फेस रेकग्निशन, व्हाईस रेकग्निशन या कामांमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यामुळे इंटरनेट विश्वातली सुरक्षितता वाढली आहे. फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या मोठ्या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारखं शस्त्र हाती घेवून  दैनंदिन जीवण  सोपे करण्यास सुरवातही केलेली आहे.  बँकेमध्ये सुपर इंटीलिजन्सचा उपयोग व्यवहार सांभाळण्यासाठी, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तसेच मालमत्ता सांभाळण्यासाठी केला जातो. रुग्णालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या प्रणाली या बिछान्यांचे वेळापत्रक तयार करणे, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलत्या ठेवणे, वैद्यकीय माहिती देणे यासारख्या कामांकरिता वापरात आहेत, रोगाचे निदान करणे, शस्त्रक्रिया करणे यामध्ये रोबोट वापरले जाऊ लागले आहेत. आणि महत्वाचे म्हणजे सैन्य दलात आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर करून रोबोट आर्मी बनवली जात आहे. शिक्षण देण्यासाठीही आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर होऊ शकतो. अमेरिका, जपान, रशिया यासारख्या देशांमध्ये या मोहिमेला सुरुवातदेखील झाली आहे. इतर क्षेत्रात, मार्केटमध्येही खरेदी विक्रीसाठी आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर वाढत आहे.  भविष्यात रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स वापरून बनवलेल्या  स्वयंचलीत वाहनामुळे ट्रॅफिकसाखा कठीण प्रश्न सुटला जाईल. अर्थात या सर्व संकल्पना प्रलंबित होत आहेत सध्याच्या नेटवर्क आणि इंटरनेट स्पीड यासारख्या अनेक येणाऱ्या अडचणींमुळे! आपल्या मोबाईलमधे एप्पल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या मोबाईल कंपन्यांनी दिलेले सिरी , गुगल असिस्टंट, कॉर्टेना यासारखे रोबोट आपण अनुभवत आहोत. 

३  आर्टिफिशियल इंटीलिजन्सपुढील आव्हाने काय आहेत?
अटोमेशनमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारांना नोकऱ्या देणे किंवा त्याच बेरोजगारांना शिक्षणाने तंत्रज्ञानात सक्षम करणे, जेणे करून तंत्रज्ञानात अजून काही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणून उद्योगधंदे उभा राहीतील अशी तंत्रज्ञान शिक्षित पिढी तयार करणं, हे रोबोटिक्समुळे समोर आलेले  सर्वात मोठे आव्हान असणार आहे.  अर्थातच आज महासत्ता होण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी धडपडणाऱ्या भारतारख्या देशाला आर्टिफिशियल इंटीलिजन्स आणि रोबोट या संकल्पना प्रत्येक्षात उतरण्यात जे मनुष्यबळ लागते आहे, असे मनुष्यबळ तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. अर्थात याचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसेल. अटोमेशनला धरून प्रत्येक क्षेत्रात प्रोसेस स्टॅन्डरडाईज करावी लागणे हेही एक आव्हान असणार आहे.

४ आर्टिफिशियल इंटीलिजन्समुळे काय नुकसान झेलावे लागेल?
आज बेरोजगारीचा प्रश्न सोडवत असताना त्यात आणखी भर पडण्याची भीती अनेक तज्ञांना आहे. स्पेसेक्स या कंपनीचे मुख्याधिकारी एलन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटीलिजन्स ही संकल्पना मानव जातीला धोक्याची असल्याचे मत काही दिवसाखालीच देले होते. यांच्या मतानुसार एआयच्या माध्यमातून आपण धोक्याचा मार्ग पत्करत असल्याचे सांगितले होते. काही दहशतवादी आपली सायबर आर्मी बनवत असल्याची माहिती पुढे येते आहे. त्यात रोबोटिक्ससारखे धारदारी हत्यार दहशतवाद्यांच्या हाती पडले तर आणखी  दहशतवाद वाढायला वेळ लागणार नाही. अशा गोष्टीला सामोरे जाणे हेही मोठे आव्हान असेल. काही सिनेमांमध्ये आपण हे चित्र पाहिले आहे, एक रोबोट खलनायक कसा बनतो आणि माणसाविरोधी कसे काम करतो. अर्थात स्वतः शिक्षण घेणारे रोबोट मनुष्यापेक्षाही हुशार होतील अशीही भीती आज तज्ञांना आहे. 

          या उलट काही शात्रज्ञांकडून हे मुद्दे खोडलेही जात आहेत, त्यांच्या मते, जेव्हा कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये एका-एका साध्या  मशीनचा वापर होत चालला होता  तेव्हाही बेरोजगारीचा प्रश्न आला होता, परंतु मनुष्याने त्यावरही मात केलेली आहे.   आणि एआयमधे अजून ज्या काही सुरक्षतेच्या बाबींवर प्रभुत्व मिळाले नाही, काही दिवसांनी ते शक्य होईल. त्यामुळे जग आज आर्टिफिशियल इंटीलिजन्सला घेवून सकारात्मक वाटचाल करत असताना दिसत आहे आणि तंत्रज्ञानात घडून येणारी एक नवी क्रांती असेल. 

Pubished in Dainik Surajya. Solapur.

Tuesday, June 12, 2018

मनाचा ठाव घेणारी कादंबरी

काळीजकाटा           
                      मी माझ्या लेखांबद्दल चर्चा करण्यासाठी चपराकच्या ऑफिसला गेलो होतो. काही वेळ चर्चा झाल्यानंतर संपादकांनी मुद्दामहून माझ्या हातात काळीजकाटा टेकवली. मी थोडासा विरोधच केला. वाचायला वेळ कुणाकडं असतो? काही पुस्तकांसह मी घरी आलो. आणि मागच्या आठवड्यात काळीजकाटाची सहजच पाने चाळीत होतो आणि पाने चाळताचाळता  स्वतः ला हरवून बसलो. एकदाची ही कांदंबरी हातात आली, पुन्हा खाली ठेवलीच नाही. जरा वेळ वाटले मी वाचतोय कि एखादा सिनेमा पाहतोय, अशी जादू लेखकाच्या शब्दात आहे. अर्थात मी कोणी समीक्षक म्हणून नाही तर एक वाचक म्हणून मी येथे बोलत आहे. 

        कथेत प्रसंग साधून कवितेच्या ओळी, गावाकडील वातावरण, वयात येणाऱ्या प्रेमयुगलाचे निखळ प्रेम आणि कथेत मोजकी पात्रे ठेवल्याने वाचताना वाचकाचा गोंधळ उडत नाही. लेखकाने दुष्काळाची दाहकता उभेहूब मांडली आहे. प्रेम हा एक जिवंत मानवाचा गुणधर्म आहे. प्रेम माणसाच्या जीवनात आनंदही घेवून येतो आणि दुःखही. नायक-नायिकेचे व्यापक, उदात्त आणि तरीही शोकात्म प्रेमकथेबरोबरच या कादंबरीत अजून एका लेखकाची उपकथा आहे. त्यातच त्यांचा विद्रोह ठोसपणे मांडला आहे. तोही वाचकांच्या मनाला भिडतो, वाचकांना गुंतवून ठेवतो. पुढे काय घडेल याची ओढ लागते. प्रेमाने झालेली अवहेलना कोणाला सांगता येत नसते, आपण ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम करतो त्या एकमेकांनाच आपल्या भावना कळू शकतात. जेव्हा आपल्याला आपले प्रेम मिळत नाही, तरही आई वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या   प्रेमयुगलाच्या मनाची अवहेलना काळीजकाटात मांडली आहे आणि हे वाचताना डोळे पानावले नाही तरच नवल! असे आत्मिक प्रेम लेखक उभारण्यात यशस्वी झाला आहे.

        पंढरपुरचे जेष्ठ साहित्यिक द. ता. भोसले यांनी काळीजकाटाचा गौरव केला आहे कारण शब्दात तशी किमयाही आहे.  "काळजातला शब्द कागदावर आला कि काळीज हलकं वाटू लागतं आणि कागद जड होतो. कागदावरचा शब्द माणसात गेला कि कागद हलका होतो आणि माणूस जड! शब्दाच्या विचारानं जड झालेली माणसं समाजात धड वागू लागतात" अर्थातच अशा शब्दांनीच कादंबरी जड केलेली आहे. अर्थात तुम्ही वाचाल तर तुम्हीही विचाराने जड व्हाल. म्हणूनच नक्की वाचा. काळीजकाटा!

Published in Dainik Surajya, Solapur.