प्रत्येक वडिलांना वाटते, आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे आणि इतरांना आदर्श वाटावे, असे स्वतःचे वेगळे आपले अस्तित्व निर्माण करावे. फक्त शालेय शिक्षणा-व्यतिरिक्त आपल्या पाल्याने सामाजिक, व्यावहारिक ज्ञानही आत्मसात करावे. हे विश्व जितके सुंदर आहे तितका त्याचा आनंद घ्यावा, याला अनुसरून तशी प्रेरणा स्वतःमध्ये भरून घ्यावी. आयुष्यातील चढ-उतरांशी तोंड सर्वांनाच द्यावे लागते, याची जान करून देणारे आणि मला आवडणारे एक पत्र... हे पत्र अब्राहम लिंकन यांनी आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी हेड-मास्तरांना लिहिले होते...
प्रिय गुरूजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात; नसतात सगळीच सत्यनिष्ठ!
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी!
मात्र त्याला हे देखील शिकवा -
जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही!
स्वार्थी राजकारणी असतात जगात ,
तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही!
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही!
मला माहीत आहे;
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत…
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा ,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला!
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेष-मत्सरा-पासून दूर रहायला शिकवा.
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला.
गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं ,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !
जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अदभुत वैभव
मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा.
सॄष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला,
पाहू दे त्याला पक्ष्याची अस्मानभरारी…..
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर…
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर
डुलणारी चिमुकली फुलं,
शाळेत त्याला हा धडा मिळू दे.
फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.
आपल्या कल्पना, आपले विचार
यांच्यावर दॄढ विश्वास ठेवायला हवा.
त्यानं बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी
त्याला सांगा, त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्द्ल घडवावी.
माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा -
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणा-या भाऊगर्दीत
सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी .
पुढे हे ही सांगा त्याला,
ऎकावं जनांचं, अगदी सर्वांचं….
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपटं टाकून,
निकष सत्व तेवढं स्वीकारावं.
जमलं तर त्याच्य मनावर बिंबवा-
हसत राहावं उरातलं दुःख दाबून
पण म्हणावं त्याला.
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नकोस!
त्याला शिकवा,
तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.
त्याला हे पुरेपुर समजावा, की
करावी कमाल कमाई त्याने
ताकद आणि अक्कल विकून ….
पण कधीही विक्रय करू नये
हॄदयाचा आणि आत्म्याचा!
धिक्कार करणा-यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर
जे सत्य आणि न्याय्य वाटते
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेने वागवा पण
लाडावून ठेवू नका .
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य
पण धरला पाहीजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य!
आणखीही एक सांगत रहा त्याला,
आपला दॄढ विश्वास पाहीजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर.
माफ करा, गुरुजी! मी फार लिहितो आहे
खूप काही मागतो आहे….
पण पहा…… जमेल तेवढं अवश्य करा!
माझा मुलगा-
भलतंच गोड लेकरु आहे हो!
----अब्राहम लिंकन
(हे मुळ पत्र इंग्लीश आहे, त्याचे प्रथम मराठी भाषांतर वसंत बापट यांनी केले.)