Search in Google

Monday, January 30, 2012

गीता ग्रंथ आणि गांधी


             कालच गांधीचे आत्मचरित्र वाचून झाले, गांधीनी आपल्या आत्मकथनामध्ये  सत्याचे प्रयोग आणि विवध  धर्मांच्या विचारांची उत्तम रित्या सांगड घालत आपली जीवन शैली रेखाटली आहे. प्रथमतः त्यांनी ख्रिस्ती धर्माबद्दल जरा द्वेष दर्शवला असून हिंदू धर्माचे गोडवे गायले आहे, अर्थात तेव्हा गांधी इतर धर्माच्या जास्त परिचयात नसत. 'धर्माचे मंथन' या प्रकरणावरूनच त्यांनी विविध धर्म ग्रंथ वाचलेले सांगितले आहे. त्यात गांधींनी येशू ख्रिस्तांचे उत्तम उदाहरण दिले असून, अहिंसा आणि सहनशीलता या दोन गुणांना धरूनच त्यांनी 'एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करावा ' हे सूत्र जोपासले असावे, हेच  त्यांनी 'अहिन्सादेवीचा साक्षात्कार' या  प्रकरणात सांगितले आहे. ते विलायतेत असतानाहि ख्रिस्ती मित्रांशी बुद्ध चरित्र आणि जैन ग्रंथ जगाने का स्वीकारले हे त्यांनी पटवून दिले नाही. अर्थात हे ग्रंथ विश्वशांतीचा संदेश देतात. दया, क्षमा, शांती, अहिंसा, प्रेम, सत्य, विश्वास हेच गुण म्हणजे परमेश्वर असे सांगणाऱ्या गोतम बुद्धांचे विचार लोकांना इतके पटले कि परमेश्वराच्याहि पलीकडे बुद्धांनी बुद्धीष्टांच्या मनात घरे केली.

    ज्याप्रमाणे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ लार्ड यांनी अहिंसावादी गांधींनी हिंसा दर्शवणारी गीता या ग्रंथाचे कौतुक कसे केले असा प्रश्न उपस्थित केला आहे,याच वादावरून रशियामध्ये या ग्रंथावर बंदी आली आहे, तर याचे उत्तर देता येईल कि ज्ञान आणि आत्मा हे गुणधर्म  सांगण्यासाठी केवळ हिंदू धर्म ग्रंथचे वर्णन केले असावे, अर्थात त्यांनी अहिंसेचे गीता हे प्रतिक नाही असे नमूद केले नाही.  आणि अहिंसेसाठी ख्रिस्ती धर्म ग्रंथ आत्मसात करायला सागितले आहे.यावरून असे दिसून येते कि कोणत्याही धर्मियांचे मन दुखावले जाणार नाही, याची गांधीजींनी  दखल घेतली असावी. दुसरी बाजू पाहिली असता गीता हा धर्म ग्रंथ होऊ शकत नाही असेहि काही विचारवंत म्हणतात, याला भारतीय युद्धाची पार्श्वभूमी दिल्याने एक भावनिक स्वरूप मिळाले आहे.

Sunday, January 22, 2012

कर्मवीर

              दिवस कासराभर वर आला होता. तांदूळवाडीत सगळ्यांची सकाळची तयारी होऊन चहा- पाणी चालू होते. कोण शेतात तर कोण दुधाच्या डेअरीवर जात असताना दिसत होते. आबा हाताची घडी चालून अंगणात ये-जा करत होते, कदाचित त्यांना कसलीतरी चिंता असावी. शेजारचा गणपा हौदावर अंघोळ करत होता.   अंगावर साबणाचा कापसागत फेस करत लावणी गुणगुणत होता, हौदाच्या पलीकडून कोंबड्या ओरडलेला आवाज चालू होता. आबांच्या घरातून लसणाच्या फोडणीचा वास सुरु झाला. आबांना घराशेजारून जाणऱ्या रस्त्यारून हरिदास दुधाच्या दोन किटल्या घेऊन जाताना दिसला, दोघांची नजर भिडताच एकमेकांना  राssम-राम...!  असा आवाज दिला. आबांच्या दारात दावणीला बांदलेली बैलं शिंगाड हलवत होती, अधून-मधून त्यांच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज कानी पडायचा. आबांच्या चेहऱ्यावर मात्र रात्रीपासून बरीच चिंता दिसत होती. आबा ये-जा करत कोणता तरी मोठा विचार करत असल्यागत दिसत होते, मध्येच एका बैलान बारीकसा हंबरडा फोडला, आबांनी कडब्याच्या दोन पेंड्या बैलापुढ टाकल्या. पुन्हा आबांची ये- जा सुरु झाली, मधून आबांची नजर गावाकडून येणाऱ्या रस्त्यावर पडायची. आबा रात्री पासून बेचैन होते, लवकर झोप लागली नव्हती, या अंगावरून त्या अंगावर करत होते, दोन-तीनदा अन्थूरनातून उठून त्यांनी भिंतीवरचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो पाहिला होता.

              मागच्याच महिन्यात त्यांनी आपल्या मुलीच लग्न उरकून तिला हसत सासरी पाठवलं. आबा तसे कठोर काळजाचे आणि धीराचे. त्यांचा मुलगा लक्ष्मण उजाडायच्या आत गावात गेला होता. तसा लक्ष्मणची हा वेळ नेहमीप्रमानं  वर्तमानपत्र आणून वाचत बसण्याची, पण आज तो कुठ गेला होता याची त्याच्या आईला कल्पना नव्हती. दोन महिन्याच्या सुट्टीत लक्ष्मणने शेत्तीतील कामात बराच हातभार लावला, लक्ष्मणाने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती.
                 आबा मात्र पुनःपुन्हा गावाकडून येणाऱ्या वाटेवर नजर टाकत होते. आता त्यांच्या कपाळावर आट्या पडलेल्या दिसत होत्या, मध्येच बैलाकड नजर तर कधी घड्याळाच्या काट्याकड! 
"आता रानात गेलं पाईजी...." ते स्वतःशी पुटपुटले.
त्यांनी पुन्हा बैलाच्या दावणीतील वैरण आहे का? बघीतली. खोऱ्या घेऊन ते थोड्या अंतरावर असलेल्या रानाकड गेले, मोटार चालू करून ते पाण्याकड कमी लक्ष्य आणि वाटेकड जास्त लक्ष्य देऊ लागले. ऊस चांगला कंबरेला आला होता.

            दोन वाफे भरत आले, आता दिवस डोक्यावर आला होता. न्याहारी करण्याची वेळ आली. त्यांच्या कपाळावर घाम काढत आबा मध्येच मोठ्या श्वासाचा व्हुसकारा टाकत.. वाफ्याचे एक-एक दार मोडायचे त्यांचे काम चालू होते... आबांना तेवढ्यात लक्षमण गावाहून पळत येताना दिसला, ऊसाच्या रानात त्याला आबा दिसले.

आबा उसातून बांधावर आले. आबा आणि लक्ष्मण एकमेकांच्या जवळ आले. लक्षमण थोड्या अंतरावर असताना तो आबांना म्हणाला
"आबा, मी जिल्ह्यात पहिला आलू..."
आबांचा चेहरा पटकन मोठा झाला, कपाळावरच्या आट्या दूर झाल्या, किती हसावं कळेना, चेहऱ्यावरची चिंता दूर झाली. आनंद पोटात मावेना. त्यांनी लक्ष्मणच्या चेहऱ्यावरून चिखलाचा हात फिरवला आणि घट्ट
मीठी मारत... 
"लै शिकं पोरा... लै मोठा हो...  भाऊराव पाटलांच्या वडायेवढा मोठा हो!"
टपकन आबांच्या डोळ्यातून अश्रू  ओघळले. आबांच्या तोंडात साखर घालून, लक्षमणाने त्यांचे चरण स्पर्श करत बोलला... "व्हय, आबा व्हय..!" आणि त्यान त्याच्या आईसाठी घराकड धाव घेतली.. त्याच्या फिरलेल्या पाठीकड बघत, आबा पुटपुटले "तू काय बी काळजी करू नगसं.. फकस्त लै शिकं.! "
  

Published in Dainik Pandhari Bhushan, Pandharpur. on the occasion of birth anniversary of Karmveer Bhaurao Patil (22 Sept. 2018).