मी सातवीत होतो तेव्हाचा प्रसंग आहे. उद्या २ अक्टोबर असल्यामुळे गांधी जयंतीचा कार्यक्रम होणार होता. सुट्टी असूनही कार्यक्रमासाठी शाळेत जावे लागणार होते. कार्यक्रम झाल्यानंतर शिक्षकांची अन मोजक्या मुलांची भाषणे होणार होती. दोन-अडीच तासाचा कार्यक्रम झाल्यानंतर शाळा नव्हती त्यामुळे आम्ही जाम खुश होतो. सुपेकर सर आमचे मराठीचे शिक्षक होते. ज्यांनी काही मुलांना भाषण करायला प्रोत्साहित केल होत, त्यात मीही होतो. छोटा कार्यक्रम असल्याने आपल्याला कंटाळा येईल असे काही कुणाच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हते. नेहमीप्रमाणे वर्गानुसार रांगा बनत होत्या. मी सातवीच्या रांगेत पहिला होतो, मनात भाषणाच्या ओळी आठवणे चालू होते, माझ्या भाषणाला अजून अवकाश होता. त्या अगोदर जे नेहमी कार्यक्रमला असतात आणि आताही आलेले शाळेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. शे. भोसले प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.
कार्यक्रम सुरु झाला, गांधीच्या प्रतिमेचे पूजन झाले, पाहुण्याच्याआगोदर विद्यार्थ्यांची भाषणे सुरु झाली. सुपेकर सर यादीतून विद्यार्थ्यांचे एक-एक नाव घेत होते. माझ्या आगोदर महावीर लोखंडेचे भाषण होणार होते, त्याच्या तोंडावर बरीचशी प्रश्नचिन्ह नाचताना दिसत होती बहुदा त्याचे भाषण पाठ झाले नसावे.
अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो ..... वगैरे वगैरे... असे शब्द ओळखीच्या आवाजात कानावर पडत होते. माझं मन मात्र भाषणाचा गाभा आठवत होत. सरांनी महावीरच नाव घेतले अन तो कागद खिशात घालून पुढे गेला. त्याच्या चेहऱ्यावरचा घाम स्पष्ट दिसत होता. त्याने सुपेकर सरांकडे पाहिलं आणि शांत उभा राहिला...!
अध्यक्ष, महाशय.... अं.. एवढेच म्हणून तो थांबला मान खाली घातली. सुपेकर सर त्याच्याकडे पाहतच होते. त्याच्या मनातील चलबिचल दिसत होती. मान वर करून त्याने पुन्हा भाषण सुरु केले.
अध्यक्ष, महाशय, गुरुजनवर्ग आणि येथे उपसलेल्या माझ्या बालमित्रोंनो... आणि सगळा हास्यकल्लोळ झाला.., सगळी मुले हसू लागली. शिक्षकही खूप हसले. बराच वेळ हसण्याचाच प्रोग्राम चालू राहिला. महाविरला मात्र काय झाले हे क्षणभर कळलेच नाही. सुपेकर सर हसत त्याच्याजवळ आले आणि त्याच्या कानाला धरून ओढले आणि त्याला पुढेच बसवले. सरांनी आता माझे नाव घेतले आणि पळत पुढे जावून भाषणासाठी उभा राहिलो.. मीही सुरुवात केली.
अध्यक्ष, महाशय, पूज्यगुरुजन..! एवढे बोलताच सरांनी माझ्याकडे हसून पाहिले आणि थांबवले "असू दे, जा खाली बस.! " म्हणाले.
महावीरमुळे उरलेल्या सर्व मुलांची भाषणे रद्द झाली आणि फक्त पाहुण्यांचे भाषण होऊन कार्यक्रम संपला. उरलेला दिवस सुट्टी जाहीर झाली.