Search in Google

Wednesday, August 8, 2018

धोके तंत्रज्ञानाच्या वाटेवर

विज्ञानाने मानवी जीवनात खूप बदल घडवून आणले आहेत. 'विज्ञान शाप कि वरदान'  हे वाक्य आपण यापूर्वी बऱ्याच वेळा ऐकलं असेल. खरेतर, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण स्वतःला योग्य दिशेने घेऊन जात आहोत काय? याच वेळोवेळी आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. आपण जे मोबाईल, कॉम्पुटर किंवा इतर जी प्रोग्रामिंगद्वारे चालणारी उपकरणे वापरात आहोत त्यातून जे आत्मसात करत आहोत याचा वेळोवेळी विचार करण्याची गरज आहे. या उपकरणांचा आपल्याला आजच्या डिजिटल युगात जगत असल्याचा भलताच  कैफ चढला आहे. जवळ असणाऱ्या कुटुंबीय, नातेवाइकांपेक्षाही मोबाईल आपल्या आवडीचा  होऊन बसला आहे. उदाहरणार्थ. मानसतज्ज्ञांच्या मते, केवळ टाईमपास म्हणून व्यक्‍ती या गेम खेळायला सुरुवात करते. परंतु, याचे सवयीत रूपांतर कधी झाले आणि गेम हा जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनला, हे खेळणार्‍याला कळतसुद्धा नाही. गेम खेळण्याचे व्यसन काहीसे वेगळ्या स्वरूपाचे असते. हे गेम कधी व्हिडीओ गेम स्वरूपात असतात, तर कधी डिजिटल गेमच्या स्वरूपात.

आजचा तरुणवर्ग  सोशल मीडियाच्या प्रचंड आहारी गेलेला दिसत आहे. लोकांना  फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक  साईट्सचे वेड लागलेले आहे. खरे म्हणजे, प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. कोणीही उठतो आणि काहीही लिहितो. यात अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. तर काही समाजकंठकांच्या भावना भडकल्याही जातात. पण काहीही शेअर करत असताना आपल्या सत्सक विवेकबुद्धीला असे करणे पटते का? आपण भारतीय म्हणून योग्य करत आहोत का ?  या शंभरवेळा विचार करूनच असे पाऊल उचलावे, शब्द हे धार असलेल्या शास्त्रापेक्षा भयानक हत्यार आहे. बरेच लोक चॅटिंगच्याही नको तेवढे आहारी गेलेले दिसतात. यामध्येच फेक प्रोफाईलचा सुळसुळाट समोर आला आहे. आपली खरी ओळख लपवून कोणी तरी दुसऱ्याच्या नावाने प्रोफाइल बनवायचे आणि समाज भडकवणारे काही तरी शेअर करायचे किंवा ज्याचे फेक प्रोफाइल बनवले आहे, त्याची अश्लील फोटो शेअर करून बदनामी करायची. असे महाभयानक अनेक गुन्हे आज पोलीस स्टेशनमधल्या फाईल्समध्ये बंद आहेत.

हे झाले सोशल नेट्वर्किंग साईट्स वापराबद्दलचे, परंतु आपल्या इतर दैनंदिन व्यवहारासाठी आपण इंटरनेटचा वापर करत असतो. जसे की इंटरनेट बँकिंग, ओनलीन शॉपिंग, बिल भरणे इ. हे करत असताना आपण पायरेटेड सोफ्टवेअर न वापरणे, वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट करणे, यूजर आय-डी आणि पासवर्ड कधीही कोणाला न सांगणे, फेक ई-मेल्सला बळी न पडणे, आपल्या वैयक्‍तिक कॉम्प्युटरसाठी, मोबाईलसाठी अँटिव्हायरस वापरणे याकडेही प्रामुख्याने लक्ष्य दिले पाहिजे. एक्सकोड घोस्ट, यूमी, मोबिसेज, वॉनाक्राय, अर्व्हिलाच, बूटनेट, रॅनसमवेअर अ‍ॅडव्हायजरी, कोअर बूट, डोर्कबूट, मेलिसा, झीअस, मायडूम अशा महाभयानक व्हायरसेसमुळे आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो, आपला कॉम्पुटर, मोबाईल हॅक शकतो कालांतराने आपले बँक खाते हॅक होऊ शकते. हॅकिंगसाठी फेक ई-मेलचा वापर भयंकर वाढला आहे. ओळखीच्या नावाचा वापर करून काही आकर्षक लिंक्स पाठवल्या जातात आणि डमी वेबसाईटवर लॉगीन करायला भाग पाडून यूजर आय-डी आणि पासवर्ड चोरले जातात. मोबाईल क्लोनिंग हा एक भयंकर प्रकार पुढे येत आहे, यात तुमचा मोबाईल नंबर क्लोन केला जातो. तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व मेसेज, कॉल हे हॅकर्सकडे वळवले जातात आणि तुम्हाला येणारा बँकेचा ओटीपी किंवा अ‍ॅक्सेस कोड चोरीला जाऊ शकतो आणि तुम्हाला माहीत न पडता तुमच्या खात्यावरून आर्थिक व्यवहार होऊ शकतात.

इंटरनेट गेमच्या माध्यमातून ‘गेमिंग डिसऑर्डर’ नावाचा महाभयानक मानसिक आजार जडत असतो, हे गेम खेळणाऱ्यापैकी  बर्‍याच जणांना माहीत नाहीय; पण अलीकडच्या काही दिवसातच या आजाराचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजारांच्या यादीत केला आहे. गेमिंगमुळे आपल्या दिनचर्येत होणार्‍या बदलांकडे आपणच डोळसपणे पाहिले नाही, तर धोका अटळ आहे.  ‘डब्ल्यूएचओ’ आणि अन्य काही तज्ज्ञांच्या मते, सध्या गेमिंगच्या आजाराने ग्रस्त झालेल्यांचे प्रमाण अत्यल्प असून, सुमारे 3 टक्के गेमर्सना या व्याधीने ग्रासले आहे. परंतु, भविष्यात ही संख्या प्रचंड वाढणार आहे. जगभरातील लाखो गेमर्सना ‘गेमिंग डिसऑर्डर’ने ग्रस्त रुग्ण असे संबोधणे चुकीचे ठरेल. अगदी त्यांना गेमिंगचे अत्याधिक व्यसन असले तरी! काही व्यक्‍ती अगदी इच्छेविरुद्धही गेम खेळत राहतात. अशा व्यक्‍तींना ही अवस्था प्राप्‍त झाली आहे, असे मानायला हवे. या लक्षणावरूनच कुशल डॉक्टर या आजाराची ओळख पटवू शकतील. गेम खेळण्याचे व्यसन केवळ लहान मुलांमध्येच असते, असे नाही. मोठ-मोठ्या कार्यालयांमध्येही कर्मचारी अँग्री बर्ड, टेम्पल रन, कँडी क्रश, कॉन्ट्रा यासारखे मोबाईल गेम खेळत बसलेले दिसतात. डिजिटल दुनियेत राहत असल्याबद्दल आज आपण स्वतःची पाठ थोपटून घेतो आहोत. परंतु, या दुनियेत असणारी विविध गेमिंग अ‍ॅप्स व्यसन जडावे अशी महाभयंकर आहेत. या व्यसनाचा परिणाम म्हणून आवेग नियंत्रणाची यंत्रणा म्हणजे ‘इम्पल्स कन्ट्रोल मेकॅनिझम’वर परिणाम होतो. जेव्हा एखादी व्यक्‍ती गेम खेळत असते, तेव्हा मेंदूचा काही हिस्सा उद्दीपित होतो. ज्याप्रमाणे अमली पदार्थांच्या सेवनामुळे ही उद्दीपनाची प्रक्रिया घडते, तशीच हीसुद्धा प्रक्रिया असते. त्यामुळे कॉम्पुटरच्या, मोबाईल गेमच्या जास्त आहारी जानेही धोकादायक ठरू शकते.

अर्थात इंटरनेट हे वापरताना आपला हवारेपणा, आपली मानसिकता नडत असते हे इथं आवर्जून सांगावेसे वाटते. एखाद्या लोटरीच्या मेलच्या बळी पडणे, गेम खेळून जास्त स्कोर करण्याची आपली मानसिकता, स्वस्त दारात खरेदी करण्याची मानसिकता, इ. याबरोबरच सेफ पासवर्ड कसा तयार करावा, व्हायरसचे हल्ले, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्डचा सुरक्षित वापर, ऑनलाईन फसवणूक म्हणजे काय, सोशल नेट्वर्किंग साईट्सचा वापर करताना घ्यावयाची काळजी, सॉफ्टवेअर पायरसी, आयडेंटिटी थेफ्ट, ऑनलाईन छळ, एथिकल हॅकिंग, मोबाईलची सुरक्षितता या सर्व बाबींबद्दल आपण जागरूक राहिले पाहिजे.

Pubished in Saptaik Chaprak , Pune. 6 to 12 Aug 2018 .
Pubished in Dainik Surajya, Solapur. 11 Aug 2018 .
Pubished in Masik Adhunik Sarthi, Solapur. Jan 2019. 

Thursday, July 5, 2018

इंटरनेटच्या जन्माची गोष्ट...

       आज आपण जे इंटरनेट वापरतो, चॅटींग करतो, नेट बँकिंग वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो आणि बऱ्याच कारणांसाठी आपण इंटरनेटवरून माहिती पाहतो, याची सुरुवात कशी झाली हे मात्र आपल्यामधल्या बऱ्याच लोकांना माहित नाही. इंटरनेटचे वय तसे फार वर्ष नाही. परंतु इंटरनेटच्या स्वरुपात जी उत्क्रांति होत गेली, ती विलक्षण आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका नेत्याने इंटरनेट महाभारताच्या काळात असल्याचे तारे तोडले होते. सुरुवातीला आपण इंटरनेट म्हणजे नेमके काय हे समजावून घेऊया. संवादासाठी कंप्यूटरने जोडले गेलेले जाळं म्हणजेच इंटरनेट. इंटरनेटचा शोध अगदी योगयोगाने लागला असे आपण म्हणू शकतो. जागतिक पातळीवर संवाद साधण्याकरता म्हणून खूप विचार करुन किंवा खूप संशोधन करून इंटरनेटला जन्म दिला असेही नाही. त्याला कारणीभूत ठरली ती दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आणि त्यावेळीची गरज.  

         १९४६ साली अमेरिकेच्या लष्करासाठी संदेशवहनाच काम करणाऱ्या लोकांना चंद्राच्या पृष्टभागावर बीनतारी लहरी अर्थात सिग्नल्स आदळून वॉशिंगटन ते हवाई बेट यांच्यामध्ये संदेश पाठवणे शक्य झाले होते. या सिग्नल्सचा वापर नेहमीच्या संदेशवहनासाठी अनेक अडचणी आल्यामुळे त्याचा व्यापारासाठी वापर शक्य होत नव्हता. याला आणखी एक संदर्भ होता तो म्हणजे  जॉन पीयर्सने लष्करासाठी कामाला पडणारे  सॅटेलाईटस् आणि त्यांचे सिग्नल्स यांवर लिहिलेल्या शोधनिबंधाचा. १९२६ साली  रॉबर्ट गोगार्ड या शास्त्रज्ञाने संशोधन करुन आपल्या आत्त्याच्या शेतातुन एक रॉकेट आकाशात सोडलं होतं,  त्यामुळे गोगार्डला 'आधुनिक रॉकेट तंत्रज्ञानाचा जनक' म्हणून ओळखले जाऊ लागले होते. या उपग्रहाच्या संशोधनाच्या शीतयुद्धात सोव्हिएत यूनियनन 'स्पुटनिक' नावाचा उपग्रह सोडला.  यात अमेरिका पराभूत झाल्याचे चित्र अमेरिकेचे राष्ट्रपती डवाईट आयसेनहॉवर यांनी मनावर घेतले. त्यातून त्यांनी अर्पा  (ARPA- Advance Research Project Agency) या संस्थेची स्थापना केली. अर्पाच मुख्य उद्दिष्ट होते संरक्षणासाठी दूरसंचार आणि संगणक यावर भर देणे. सुरुवातीच्या काळात अर्पाकडे अमेरिकेच्या अंतराळ मोहिमा, अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या नवनव्या घडामोडी असलेल्या संशोधनाची कामे होती.  १९९३ मध्ये 'स्पुटनिक'ला आव्हान समजून अमेरिकेने 'नॅशनल एरोनॉटिक्स एंड स्पेस अड्मिनीस्ट्रेशन' (NASA) नावाची आणखी एक संस्था स्थापन केली आणि त्यावेळी बंद पडत आलेल्या अर्पाही स्थीर झाली. त्यात ऑस्टिन बेट्स या लष्करी अधिकाऱ्याचा मोलाचा वाटा होता. अमेरिकेच्या हवाईदलाला मदत करण्यासाठी अर्पाच्या संगणकचा मोठा फायदा होत असे. त्यासाठी त्यावेळचे अर्पाचे संचालक जॅक रूईना यांनी जोसेफ लिकलायडर याची नियुक्ती केली. १ ओक्टोबर १९६२ साली अर्पात रुजू झाला. जोसेफ लिकलायडर लहानपणापासूनच खूप खोडकर आणि विचारी होता. कोणतंही यंत्र खोलून जोडण्याच त्याला वेड होतं. लीकलायडरने मानसशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात वॉशिंग्टन विद्यापीठातून पदव्या मिळवल्या होत्या. लीकलायडरचा नेहमीच मानव आणि संगणक याचा अभ्यास चालू असत. तो बीबीएन या कंपनीत काम करू लागला आणि काही करारानंतर १९६२ साली बीबीएन कंपनी अर्पात विलीनी झाली. पूर्वीच्या काळी एका संगणकावर एका वेळी एकच व्यक्ती काम करू शके. त्यावेळी लीकलायडरने 'टाइम शेअरिंग' नावाच्या तंत्रज्ञानावर काम सुरु केलं. एक संगणक खूप मोठा असल्यानं तो घेऊन फिरणंही शक्य नव्हतं. अर्पामध्ये खूप संगणक असूनसुद्धा एकमेकांशी संपर्क साधू शकत नसत. यासाठी लिकलायडरने बॉब टेलर या नासामधल्या  व्यक्तीला तंत्रज्ञान प्रमुख केलं. 

        अर्पामधले एकमेकांना कसे जोडायचे या प्रश्नाने बॉबला भेडसावून सोडलं. त्यानं त्या ऑफिसमधले काही संगणक आणि काही कॅलिफोर्नियामधले संगणक जोडले. दुर्दैव म्हणजे काही संगणक मेनफ्रेमभाषेचे तर काही वेगवेगळ्या रचनेचे असल्यामुळे ते संपर्क साधू शकले नाहीत. त्या संगणकांना त्याने टर्मिनल असे नाव दिले होते. बॉबने हे सारे मुद्दे आपला सहकारी हर्जफेल्डसमोर मांडले, संगणकाच्या गरजा वाढत आहेत असा त्याने सूर धरला, हर्जफेल्डने मदत म्हणून बॉबला आणखी निधी मिळवून दिला. त्यावेळेचे संगणक खूप मोठे आणि महागडेही होते. प्रत्येकाला स्वतंत्र संगणक असावा असे वाटत असे. बॉबने आणि नवीन रुजू झालेल्या लॅरी रॉबर्टने  जोडलेल्या संगणकाच्या जाळ्याला अर्पा नेटवर्क (ARPA Network) असे नाव देण्यात आलं. या जाळ्यात डेटा कसा पाठवायचा हा यक्षप्रश्न पुढे उभा होता. यावर बरीच चर्चा झाली. त्यातून 'पॅकेट स्विचिंग'ची कल्पना पुढे आली. एखादं फर्निचरच सामान एका घरातून दुसऱ्या घरात नेण्यासाठी आपण त्याचे छोटे तुकडे करतो आणि नवीन घरात आपण ते पुन्हा जोडतो, असेम्बल करतो. अगदी अशीच ही कल्पना होती. याचप्रमाणे एका संगणकाकडून पाठवलेला मजकूर तुकड्या-तुकड्यात पाठवून योग्य क्रमाने दुसऱ्या संगणकाला पाठवला जाईल, तेव्हा दुसऱ्या संगणकाला मिळताच त्याने त्याच क्रमाने तो जोडावा अशी युक्ती आखली गेली. या संशोधनात काही पॅकेट्स हरवले जात होते तर काही योग्य क्रमाने पोहचत नव्हते. त्यासाठी वेस्ली क्लार्क, लिओनार्ड क्लेईनरॉक या सहकाऱ्यानी कॉम्पुटरमध्ये मेसेज प्रोसेसर बसवण्याचे सुचवले. यातूनच कॉम्पुटर नेटवर्क संकल्पनेचा जन्म झाला. यात बीबीएन कम्पनीचाही मोठा वाटा होता.  ७० च्या दशकात अर्पाने अमेरिकेच्या लष्करासाठी सीमेवर कॉम्पुटर जोडण्यास सुरुवात केली. गरजेच्या चाचण्या होऊ लागल्या. १९७३ साली इंग्लंड आणि नॉर्वेने प्रत्येकी एक कॉम्प्टर घेऊन नेटवर्कमध्ये सामील झाले. १९८२ लिओनार्ड क्लेईनरॉकने डेटा पॅकेट्स पाठवण्यासाठी काही नियम आखले, त्यालाच आपण आज इन्टरनेट प्रोटोकॉल म्हणतो, त्याच्याच नियमावरून कॉम्पुटरचा पत्ता कळतो, त्यालाच आपण आय. पी. ऍड्रेस म्हणतो. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल ही थेअरी आल्यानंतर नेटवर्कमध्ये कॉम्युटरची संख्या वाढू लागली. सहभागी झालेल्या वेगवेगळ्या देशातील संगणकाला आय. पी. ऍड्रेसने ओळखले जाऊ लागले. पीएसआय नेट, नेटकॉम, पोर्टल सॉफ्टवेअर, अल्टरनेट  या कम्पन्या ईंटरनेट सेवा देऊ लागल्या. ९० च्या दशकात संदेश पाठवण्यासाठी ई-मेल सारख्या कल्पनेचा जन्म झाला. हा संदेश पाठवण्यासाठीही आयपी ऍड्रेसचाच वापर होत असे. याबरोबरच एका मुख्य संगणकवरचा मजकूर मिळवण्यासाठी www हे शब्द वापरून  आणि आय. पी. ऍड्रेस वापरून मजकूर मिळवला जात असत. यात टीम बेरनर्स ली या संशोधकाचा मोलाचाही मोठा वाटा होता. 

      आज आपण जी इंटरनेटची उत्क्रांती बघत आहे याच अर्पानेटच हे बदलेलं रूप आहे. वेगवेळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स, ब्राऊझर्स, सोफ्टवेअर्स यांनी जोर धरला आहे. बहुदा सर्वच काम इंटरनेटवर होतात. सर्वच इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यामध्ये स्पर्धेच वातावरण आहे. इंटरनेटच्या स्पीडच्या जोरावर 4G, 5G ई. जनरेशनने इंटरनेट डेटा पुरवला जात आहे. 'इंटरनेट ऑफ दी थिंग्ज' या संकल्पनेखाली स्वयंचलित वाहणे चालवण्यासाठी सेन्सर बरोबरच, शहराचे सध्याच चित्र पाहण्यासाठी जास्त स्पीडसह इंटरनेट वापरले जाते. त्यामुळेच सगळी यंत्रणा एकमेकाशी संलगणित राहते. हवामानचा योग्य अंदाज, उपग्रहावरील बातम्या, बँकातील कामे, खेळाचे प्रेक्षेपण, शेअर मार्केट सर्वच क्षेत्रात आज इंटरनेट शिवाय काम शक्य नाही. कॉम्पुटर, मोबाईलच नव्हे तर इंटरनेटमुळे इतर उपकरणातून डेटा देवाणघेवाण करता येतो. इंटरनेटच्या वापरामुळे बुध्दीमान व्यक्तीना या प्रगतीचा उपयोग करणे शक्य झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने इंटरनेटमुळे दुहेरी परिणाम होणार आहेत. जागतिक व्यापरपेठ इंटरनेटमुळे खुली झाल्याने आपला माल सर्व जगभर पाठविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी स्थानिक उद्योजकांना बहुराष्ट्नीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. पर्यावरण क्षेत्रामध्ये इंटरनेट फार उपयुक्त ठरत आहे. इंटरनेट हे ज्ञानाचे भांडार ठरत आहे. थोडक्यात इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्वल भविष्याकडे नेईल अशी आशा आहे. वेगवेगळ्या सोफ्टवेअरमुळे, ऍपमुळे, उपकरणांमुळे बरेच मानवी जीवन सोयीस्कर बनत आहे. इंटरनेट हे शैक्षणिक प्रगतीचे अत्युत्तम  साधन बनले आहे . इंटरनेटची गरज व फायदे यांतील मुद्द्यांवरूनही शिक्षणातील इंटरनेटचे महत्त्व  स्पष्ट होते. जगात औद्योगिक, शैक्षणिक वाढ झाली आहे. माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी इंटरनेटची क्षमता अफाट आहे आणि यात भविष्यातही आणखी आमूलाग्र बदल होत राहतील. म्हणुन आजच्या माहिती तंत्र ज्ञानाच्या युगात इंटरनेट ही काळाची गरज बनली असून अमेरिकेत शोध लागलेल्या  इंटरनेटने दुनिया बदलली म्हणायला हरकत नाही. परंतु आज आमच्या देशात मात्र राजकारणासाठी महाभारतात इंटरनेटचा शोध लावणारे मंत्री होतात  ही आमची शोकांतिका आहे. 

Published in Masik Chaprak, July 18.
Published in Dainik Pudhari (Bahaar Supplement ) on 19 August.