कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या पत्नीने त्यासाठी हातभार दिला. इथपर्यंत की, वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी त्यांनी आपले मंगळसूत्रही गहाण ठेवले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचेही शिक्षण क्षेत्रातले योगदान खूप मोठे आहे. खरचं, थोर ते महात्मे आणि थोर त्यांचे समाजकारण!
आजच्या शिक्षण पद्धतीत बदल करण्याबाबत नेहमीच आवाज उठत राहिला आहे, कारण विद्यार्थ्यांच्या अभिरुची ओळखून शिक्षण असावे. हे अनेकवेळा संगभूमीने समाजासमोर मांडले आहे.देश आणि राज्यात शिक्षणाचे धोरण ठरवणा-या राज्यकर्त्यांना याचा कधीच विचार का करावा वाटला नाही. माझ्या मते आपली शिक्षण पद्धती ही क्षमतेने मिळणा-या संधींना अडथळे निर्माण करणारी आहे. उदा. "सुंदर गाता तुम्ही पण पदवीधर आहात का ? त्याशिवाय तुम्हाला ही संधी आम्ही देवू शकत नाही". किंवा " आवाज अत्यंत वाईट आहे, गाणे सुद्धा बेसूर आहे,पण म्युझिक मध्ये डॉक्टरेट आहे,यांना संधी देवू या आपण ."
मुळात आपली शिक्षण पद्धतीच सदोष आहे यावर आंदोलन का होत नाही? मार्क म्हणजे गुणवत्ता हे कोणी सांगितले? प्रतिभा, उद्यमशीलता आणि निर्माणक्षमता यांचा मार्कांशी काहीएक संबंध नाही हे आपण अगदी आईन्स्टाईनपासुन पाहु शकतो. आपली शिक्षण पद्धती ही क्षमतेने मिळणा-या संधींना अडथळे निर्माण करणारी आहे.
अजून एक नमूद करण्यासारखी बाब म्हणजे शिक्षणाचे खाजगीकरण खूपच फोफावले आहे. आज शिक्षण हे गरिबांसाठी उरले नाही त्याला आजची राजकीय मानसिकता जबाबदार आहे, आजच्या राजकारण्यांच्या वडिलांनी, आजोबांनी शिक्षण चळवळी केल्या, त्यावर यांचा आजचा बिझिनेस चालू झाला आहे, इंजिनिअरिंग, मेडिकल कोलेजच्या फीज सामान्य माणसाला परवडणाऱ्या नाहीत….