Search in Google

Thursday, December 13, 2012

केवळ संघर्ष करायचाय!

                 
        संथ पाण्यात सहजच मारलेला एक दगड आणि त्यामुळे पाण्यावर उठलेले असंख्य तरंग. आपल्या जीवनातही असंच असतं, येणारे एखादे दु:ख किंवा संकट हे एकटे न येता सोबत अनेक दु:खे, संकट घेऊन येतात, ज्यामुळे कित्येकदा आयुष्य ढवळुन निघते. अर्थात हे त्या पाण्यावरच्या तरंगासारखेच कायम न रहाता काही वेळानंतर निवांत होतात. आयुष्य किती क्षणभंगुर आहे. सुख-दुखांचा चढ-उतार कुणाला मुकला आहे? असो... बस्स.. दोन क्षण जगायचे असते..., अन हसऱ्या दुनियेला हसवून जायचे असते. आयुष्याची रीत जरा न्यारीच असते ना, गड्या? चालत राहणं एकमात्र पर्याय आहे इथं! लढायचं असतं, हरलो तरी पुन्हा लढायचं असतं, न्यायासाठी धडपडायचं असतं! प्रयत्नाच्या परिघात यशाचे नंदनवन करता येतं इथं. जगात दुसऱ्याला हसणं जितक सोपं असतं, तितकंच अवघड दुसऱ्यासाठी रडणं असतं!

             प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटेवर नेहमीच चढ उतार येतात, कधी चढ चढताना दमछाक होते, तर कधी उतारला गाडी जोरादार धावते! मीही कधी भिंत चढणाऱ्या मुंगीसारखं ध्येयाच्या मार्गावरून पडतोय, असाच अट्टाहास ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात करतोय! एकांत राती पापण्यांवर सुखमय स्वप्नांना पाहतोय! काही ध्येयवादी स्वप्न अशी कि ज्यामुळे झोपही टाळतोय! घरट्यातून भरारी घेणाऱ्या पाखराला पाहत, छातीत आणखी प्रेरणा भरतोय! या स्वार्थाच्या विश्वात मी समाधानासाठी धडपडतोय! कधी वास्तवात जगतोय तर कधी जाणूनही भासांच्या मागे धावतोय! दिवसाचा सूर्योदय अपेक्षांनी तर सूर्यास्त अनुभवाने पार पाडतोय! माझ्या बेसूर आवाजातच मी माझे जीवनगाणे गातोय! मनाचं दार वाजवणाऱ्या दु:खांना तिथच थांबवत आसवांना मी पापण्यातच आवरतोय! फुलांच्या वाटेकडे जाणाऱ्या.., काट्याच्या वाटेवरून, अलगद पाऊल टाकताना स्वतःला सावरतोय! आयुष्याच्या या खुळ्या खटाटोपालाच मी 'जगणं' म्हणतोय...

            या जगण्यात, मला दु:खांशी झुंज द्यायचीय. 'यश' कशाला म्हणतात, त्याला अलवार स्पर्श करायचायं, त्याला कवेत घेवून जगाला ओरडून सांगायचंय.! स्वप्नांना उराशी धरून चालायचंय! जीवनात आलेल्या संकटांशी मला केवळ संघर्ष करायचाय!!!