Sunday, May 13, 2018

आजची शिक्षणपद्धती आणि आपण

        नुकत्याच सर्व शाळा-कोलेजेंच्या परीक्षा पार पडल्या. प्रवेश परीक्षेची धांदल उडाली, विद्यार्थी अडमिशनची चौकशी करायला लागलेत. शिक्षणपद्धतीच नव्हे तर त्याबरोबर समाजव्यवस्थाही तितकीच चांगली पाहिजे. नाही तर, एखाद्या विचारधारेत आपण स्वतःला एकदा वाहतं केलं कि आपण त्याच प्रवाहाने विचार करत जातो. कधी विरुद्ध बाजूही बरोबर असते हे मान्य करायला आपण तयार होत नाही आणि अशा ओघात आपण काही चुकीचे तर करत नाही न? असा प्रश्न मनाला पडत नाही. मग अशा प्रवाहातून बाहेर पडणायचं तर लांबच राहून जातं आणि आपण आणखी दलदलीत अडकत जातो. एकदा टीव्हीवर नाना पाटेकरांनी ही चिंता व्यक्त केली होती. प्रसंग होता २६/११ चित्रपटाच्या रिलीजचा. निमत्त होतं अजमल कसाबची भूमिका. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याबद्दलची चिंता असतेच कि ते योग्य मार्गाने जावेत. आज इतक्या वर्षानंतरही आपल्या देशातील शिक्षण पद्धती सुधारलेय की ढासळतेय तेच कळायला काही मार्ग उरला नाही. शिक्षणाबरोबरच तयार झालेल्या विद्यार्थ्यांचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेणेही देशासाठी तितकेच महत्वाचे असते. विद्यार्थ्याचे शिक्षण फक्त शाळा-महाविद्यालयांत होत नसून भवतालच्या व्यवस्थेतुनही होत असते. एकंदरीत मुलांचा कच्चा माल शाळा-महाविद्यालये तयार करतात. ती शिकतात आणि घडतात खरं तर समाजव्यवस्थेतून, अनुभवातून. पण आपली चूक ही होते कि तोंडओळखीलाच आपण शिक्षण समजतो. त्यातील परिक्षेतील यशापयशावरच आपली बुद्धीमत्ता मोजतो. फसगत झाली आहे ती येथेच. 

         आम्ही कोणत्याही क्षेत्रात जागतीक पातळीवर दखल घेतले जाईल असे ज्ञान निर्माण न करू शकण्याचे कारण म्हणजे आम्ही मुळात शिक्षणपद्धतीच्या माध्यमातुनच आमूलाग्र बदल घडवणाऱ्या मनुष्यबळाच्या क्षमता मारून टाकत आलो आहोत. आपली शिक्षण व्यवस्था विध्यार्थ्याची अभिरुची ओळखते का? परीक्षेला पडणारी टक्केवारी म्हणजेच अस्सल गुणवत्ता नाही, हे समजावण्याचा प्रयत्न अनेक चित्रपटांनी केला आहे. म्हणजेच आपण विद्यर्थ्यांचे कुतुहल मारतो. त्यांच्या प्रश्नांना वेडगळ समजतो. पण अशाच वेडगळ लोकांनी क्रांत्या घडवल्यात. शिक्षकांची शिकवण्याची पद्धत कशी असते? विद्यार्थ्याची समजून घेण्याची क्षमता किती असते? त्याची अभिरुची कोणत्या विषयात असते? रोजगाराआधी या प्रश्नांची उत्तरे शोधूयात. शिक्षक केवळ दिलेला विषय शिकवत असतो. केवळ जे पुस्तकात आहे तेच रेटायचे आणि आपल्या महाविद्यालयाचे बरोबरच आपल्या क्लासचे नाव कसे प्रसिद्धीस येईल याचा प्रयत्न करायचा हेच आपण आजवर पाहिले आहे. अनेक चित्रपटांनी, पुस्तकांनी शिक्षकांना आणि पालकांना ओरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. पहिल्यांदा विद्यार्थ्याची शिक्षणाबद्दलची आणि परीक्षाबद्दलची भीती मारली पाहिजे. तो शंका विचारायला घाबरला नाही पाहिजे. शिक्षकांनी त्यांचा आत्मविश्वासही वाढवला पाहिजे. खरे तर विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त वेळ प्रत्येक्षिकात म्हणजेच प्रक्टिकल करण्यात कसा जाईल आणि त्यातूनच ते विद्यार्थ्याची आवड कशी ओळखतील आणि आवडीच्या विषयात विद्यार्थ्याची जिज्ञासा या पातळीपर्यंत कशी वाढवता येईल कि ते विद्यार्थी त्या क्षेत्रात काही नाविन्यपूर्ण बदल घडवून आणतील. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन कसे भेटेल, हे जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांनी शिक्षक बनावे. काही शिक्षक यावर जोर देतात हेही खरे आहे. आता इथे आणखी एक प्रश्न पुढे येतो कि विद्यार्थ्यांचा सोप्या विषयाकडे जास्त कल असतो अर्थात तिथे स्पर्धाही तशी जास्तच असणार, त्यामुळेच स्पर्धेत टिकणेही कठीण असणार. त्यासाठी आवडीने त्या क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण संशोधन होवून बदल घडवून आणला तर रोजगारचा प्रशही सुटतो. आज जितके संशोधन झाले त्यात भारतीय लोक किती आहेत? नेमके बोटावर मोजण्याइतकेच. तीच क्रांती अमेरिकेत पाहिली तर ती विलक्षण आहे. अमेरिकेची शिक्षण पद्धती नोकऱ्या तयार करते तर भारतची शिक्षण पद्धती नोकरदार तयार करते. आम्हाला जर विज्ञानवादी बनायचे असेल तर दुसरी-तिसरीलाच छान छान गोष्टी विषयाच्या अभ्यासक्रमातून भक्त-प्रल्हाद आणि नारायणाच्या दैववादी कथा बालपणातच आमच्या मनावर बिंबवल्या जातात तिथे शिक्षक तर काय करू शकणार. मग देशतर विज्ञानवादी बनणार कसा? 

    वर्तमानात मनुष्याच्या गरजा वाढल्या त्यामुळे संशोधन झाले, त्यामुळे शिक्षणाची क्षेत्रेही वाढली. नवीन तंत्रज्ञान आले. अनेक पर्याय उपलब्ध झाले. हल्ली इंटरनेट हे ज्ञानाचे भांडार आहे. आता विद्यार्थी विनाशिक्षकही शिकू शकतो. हा बदल आजच्या शिक्षणव्यवस्थेसाठी मोलाचा आहे. काही दिवसांनी दहावीनंतर शिक्षकाची गरज काय, हाही प्रश्न उद्भवेल? अर्थात शिक्षकाची गरज उरेल ती केवळ मार्गदर्शनासाठी. सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणेच विद्यार्थी भरकटला जाऊ न देण्यासाठी. कारण आपल्यासाठी हेच खरे कोडे आहे. आपल्यापुढे भावी पिढी विज्ञाननिष्ठ होत जागतिक ज्ञानात भर घालू शकेल इतकी सक्षम करणे, बेरोजगारीचा विस्फोट पाहता आपल्याला ताज्या दमाचे नवे लघु ते महाकाय उद्योग उभे करण्याची क्षमता व प्रेरणा असलेले उद्योजक, व्यावसायिकही निर्माण करणे, यासाठी लागणाऱ्या नवनवीन कल्पनांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, शोधक वृत्तीचे विद्यार्थी तयार करणे, हेही शिक्षक आणि शिक्षणव्यवस्थेसमोरील आव्हाने आहेत. शाळा-कॉलेजे केवळ मुलांचा कच्चा माल तयार करण्याचे कारखाने न होता सु-शिक्षित आणि आधुनिक ज्ञानार्थी मुलांचे भांडार बनले पाहिजे. शाळेत व त्यानंतर महाविद्यालयात जाणे असा जणु नियमच लादल्याने बहुदा सगळेच विद्यार्थी जास्त वेळ महाविद्यालयामध्ये घालवतात आणि अभ्यासक्रमाच्या भोव-यात अडकावले जात असतात. त्यांना ९०% अटेंडसची सक्तीही असते. यात शोधक वृत्तीचे विद्यार्थी तयार होणं अवघडच असते. कायम जोर हा प्रत्येक्षिकावरच दिला पाहिजे. एखाद्या गायकाला, संगीतकाराला, नृत्याकाला त्याचे यशाचे कारण विचारले असता, तो लहानपणापासून तो हे शिकत असल्याचे उत्तर देतो. त्यात त्याला तेव्हापासूनच रुची असते, आता इथे विरोधाभास हा आहे कि ज्यांना डॉक्टर बनायचे असते त्यांना सक्तीने इतिहासही शिकवला जातो आणि त्याला शिकावाही लागतो, त्यासाठी वेळ तर जातो आणि त्याचा तणाव तो वेगळाच, हीच आमची शोकांतिका आहे, अशासाठी बदल घडून यायले हवेत आणि या अशा शिक्षणव्यवस्थेत होणाऱ्या छोट्या छोट्या बदलातूनच उद्याचा भारत घडतानाचे चित्र दिसेल.

   शिक्षण सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी शाहू, फुले, आंबेडकर, भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांनी संघर्ष केला खरा परंतु तीच शिक्षणपद्धती आपण व्यवस्थित बांधता येवू शकत नसेल दोष तो कुणाला द्यायचा? सरकारे येतात - सरकारे जातात पण सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याचा पर्याय मात्र खुला होत नाही. त्यामुळे बरेच शिक्षण वाया गेलेले असते. हल्ली अनेक सरकारी उपक्रमही चालू झाले आहेत. स्किल इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा अनेक मोहिमा सध्या सरकार राबवत आहे. परंतु त्या ग्रामीण विद्यार्थ्यापर्यंत अजून तरी  पूर्णतः पोहचलेल्या दिसत नाहीत. यातून पुढे येणारे फायदे ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे, जसे स्किल डेवलपमेंट पॉलिसी, स्किल लोन योजना, स्किल डेवलपमेंट प्रोग्राम. आज महासत्ता होण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी धडपडणाऱ्या भारताची ही वाटचाल मुख्यत्वे शैक्षणिक क्षेत्रातील भक्कम पायांवरच आधारित आहे.

Published in Saptahik Chaprak, Pune. 14 May-20 May 2018.
And Dainik Surajya, Solapur. 16 May 2018.